मालेगाव (नाशिक) : तळवाडे (ता. मालेगाव) शिवारातील शर्मा वस्ती येथील प्रयोगशील शेतकरी नीलेश शर्मा यांनी वडिलोपार्जित शेतीत प्लॅस्टिक बॅगमध्ये सेंद्रिय पालेभाज्या, फळभाज्यांचा लक्षवेधी प्रयोग केला आहे. पाच एकर क्षेत्रांत त्यांनी पंधरा विविध प्रकारच्या फळ व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले. एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्चातून वर्षाला सुमारे सहा लाखांचे उत्पन्न येते.
शेती पाहण्यासाठी शेतकऱ्यांची हजेरी
एरवी गच्चीवर व परसबागेत होणारा हा प्रयोग थेट शेतात करण्याचा राज्यातील बहुधा हा पहिलाच प्रयत्न आहे. पाच वर्षांत आलेल्या विविध नैसर्गिक संकटांचा या शेतीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. विविध भागांतील शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी हजेरी लावतात.
सेंद्रीय शेती ती देखील कमी खर्चात
सेंद्रिय शेती पारंपरिक पद्धतीने करावयाची झाल्यास मोठा खर्च व तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. त्या वेळी खऱ्या अर्थाने शेती सेंद्रियसाठी पात्र ठरते. हा वेळ व खर्चही परवडण्यासारखा नसल्याने प्लॅस्टिक बॅग फार्मिंगचा विचार डोक्यात आला. स्वत:च सोशल मीडियावर विविध माध्यमातून शर्मा यांनी संशोधन केले. इन्डोथिनच्या प्लॅस्टिक बॅग भंगारातून आणून त्यात विविध फळ व पाल्याभाज्यांचे रोप लावले. बॅग शेतीला दहा टक्के पाणी पुरेसे आहे. रोगराईचा प्रादुर्भाव कमी, जमिनीतील बदल, गारपीटचाही परिणाम नाही. तणही अत्यल्प. नियमित गोणीतील तण काढावे. शेतातील तण वर्षातून काढले तरी चालते. इन्डोथिन बॅग ओलाव्यामुळे पाच वर्षे टिकते. बॅगमध्ये गांढूळखत, शेणखत, पालापाचोळा तीस टक्के व ७० टक्के काळी व ऊन दाखविलेली माती वापरून फळ व पालेभाज्यांची लागवड केली जाते.
सध्या विक्रीसाठी माल पुरत नाही
प्रारंभी खर्च जास्त असला तरी कालांतराने खर्च कमी होतो. श्री. शर्मा यांनी दोन ते अडीच एकर क्षेत्रांत फॉगिंग सिस्टिमने पाणी दिले आहे. उर्वरित क्षेत्र ठिबक असल्याने आधुनिक सेंद्रिय शेती कमी खर्चात होते. शेतीसाठी ते बाजारातून कुठलीही वस्तू आणत नाहीत. रोप, गांढूळखत, कीटकनाशके स्वत: तयार करतात. प्लॅस्टिक बॅग, ठिबक साहित्य, नळी व अन्य साहित्यही भंगारातील. रोज किमान ५० ते ७० किलो विविध पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन ३६५ दिवस मिळते. सेंद्रिय भाजीपाला म्हणून जादा दर न लावता नैमित्तिक दरातच ते विक्री करतात. थेट ग्राहकाला विक्री करूनही माल पुरत नाही. ग्राहकाला एकदा या फळ व पालेभाज्यांची चव लागली, तर तो रासायनिक फळ व पालेभाज्यांना हातच लावत नाही. शर्मा यांनी नव्याने दोन एकर क्षेत्रांत टरबूज, खरबूज व पपईलागवड केली आहे. सध्या विक्रीसाठी माल पुरत नाही. ड्रममधील डाळिंब लागवडीसाठी त्यांचे संशोधन सुरू आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतात सर्वाधिक फुलपाखरू व पक्ष्यांचा थवा असतो.
बॅग फार्मिंगचे फायदे
* दिलेली सर्व सेंद्रिय खते व किटकनाशके थेट पिकाला मिळतात
* दर्जेदार, चवदार फळ, पालेभाज्या
* पीक काढणीनंतर लगेच दुसऱ्या पिकाची लागवड
* वेळ, मजुरीच्या खर्चात बचत
* ९० टक्के पाणीबचत
* रोगांचा अत्यल्प प्रादुर्भाव
किटकनाशके व फवारणीसाठी वापरण्यात येणारी द्रव्ये
* निंबोळी व पाला उकळलेला काढा
* लसूण, मिरची, कांदा काढा
* तांदळापासूनचे ह्युमिक ॲसिड
* कोरपड
* तांबे टाकून दहीचा वापर
ही घेतली पिके
बॅग फार्मिंगमध्ये चेरी टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, पुदिना, वांगे, भेंडी, भोपळा, कारले, गिलके, दोडके, बटाटे, बीट, चवळी, गवार, ब्रोकर्ली, मुळा, काकडी, पालक लागवड केली आहे. कीड नियंत्रणासाठी त्यांनी झेंडू, विविध फुलझाडे, तुळशी, लसूण, कांदा अशी लागवड केली आहे. शेतात सातत्याने ते मिश्र भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.
सेंद्रिय शेती महाग व परवडणारी नाही, हा गैरसमज शेतकऱ्यांनी प्रथम दूर केला पाहिजे. शेडनेटच्या तुलनत बॅग फार्मिंगचा खर्च कमी आहे. एकदा प्रारंभी खर्च केल्यानंतर फारसा खर्च नसतो. तसेच आपले उत्पादन सेंद्रिय आहे म्हणून ते दुप्पट दरानेच गेले पाहिजे, अशी अपेक्षा न बाळगल्यास सेंद्रिय शेती फायदेशीर व आरोग्यदायी आहे. शेतात मन प्रसन्न असते.
-नीलेश शर्मा,
प्रयोगशील शेतकरी, तळवाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.