Nashik News : ऐटबाज, तुरेबाज, ठेका धरून नृत्य करणारे, उंच अन् धिप्पाड, रंगाने लालभडक अन् पांढरे शुभ्र, असे देशभरातून आलेले हजारो घोड्यांनी येथील लोकप्रिय घोडेबाजार मंगळवारी (ता. १७) फुलला होता.
घोडे खरेदी-विक्रीसाठी पंजाब, राजस्थानसह देशभरातील व्यापारी व शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे सहा लाखापर्यंत घोड्यांची खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.
हौसेला मोल नसते, म्हणूनच कितीही लाख किंमत असली, तरी देखण्या, ऐटबाज अन् ताकदवान घोडे खरेदी करणाऱ्यांची आणि सांभाळणाऱ्यांची संख्या देशभरात कमी नाही, याचा प्रत्यय येथील बाजार समितीत मंगळवारी भरणाऱ्या घोडेबाजारात आला. (Horses for sale in Yeola at 800 horse trade at 150 nashik news)
येथील घोडेबाजार इतिहासकालीन असून, सुमारे ४०० वर्षांपूर्वी शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा शिंदे यांनी शहर बसविल्यानंतर घोडेबाजाराला सुरवात केली. तेव्हापासून घोडेबाजार महाराष्ट्रसह देशभरात प्रसिद्ध आहे. येवल्यात मंगळवारच्या आठवडेबाजाराच्या दिवशी भरणारा घोडेबाजार वर्षभर अगदी अव्याहतपणे सुरू असतो, ही मोठी खासियत आहे. त्यात दसरा सणाअगोदर मंगळवारी येथे देशव्यापी घोडाबाजार भरतो.
एरवी आठवडेबाजारात जवळपास १०० च्या आसपास घोडे दाखल होतात. मात्र, दसऱ्याच्या अगोदरच्या खास घोडाबाजारात ७०० ते ८०० घोडे दाखल झाले होते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजार समितीचे आवार देखण्या घोड्यांसह व्यापारी व शौकिनांच्या गर्दीने फुलले होते.
मंगळवारी घोडेबाजारात पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तसेच राज्यातील माथेरान, नेरळ, मुंबई, सारंखेडा, लातूर, पुणे, बारामती आदी भागांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून घोड्याचे व्यापारी व खरेदीदार आले होते. पंजाब, मारवाड, शिरपूर, काठेवाड, सिंधी, गावरान आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, मुकरा, अशा अनेक गुणांचे घोडे बाजारात आले होते. १५ हजारांपासून ते ६ लाखापर्यंतच्या घोडे विक्रीला आसल्याचे सचिव कैलास व्यापारे यांनी सांगितले.
अनेकांनी ऐटबाज घोड्यांचे नृत्य दाखवत आपल्या आश्वाचे वेगळेपण सिद्ध केले. किंबहुना घोडागाडीही अनेकांनी बाजारात विक्रीला आणलेल्या होत्या. बाजारात लाखांच्या आसपास किमतीच्या १५० वर घोड्यांची खरेदी-विक्री झाली. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
विशेष म्हणजे अतिशय ऐटबाज व देखणे घोडे विक्रीला आले होते, पण त्यांच्या खरेदीसाठी अनेक व्यापाऱ्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून शौकीनही आले होते. अनेक प्रतिष्ठितही घोडे खरेदीसाठी आले होते. बारामती येथील उद्योजक रणजित पवार यांची उपस्थिती होती. विविध प्रतिष्ठित व व्यापाऱ्यांचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, बाजार समितीचे सभापती किसन धनगे आदींनी स्वागत केले.
"राजे रघुजीबाबा यांनी शहर स्थापनेपासून येथे घोडेबाजार भरविण्याला सुरवात केली. दसऱ्याच्या आदल्या मंगळवारी ४०० हून अधिक वर्षांपूर्वी केलेल्या या बाजाराचे महत्त्व व क्रेज वाढत आहेत. मंगळवारी देशभरातून व्यापारी आले होते. ऐतिहासिक घोडेबाजाराला शासनाने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात त्याची माहिती अश्वप्रेमीपर्यंत पोहोचविण्याची गरज असून, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." -ॲड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला
"बाजार समितीत मंगळवारी देशव्यापी घोडेबाजार भरला होता. देशभरातून येथे घोडे व्यापारी व प्रेमी खरेदी-विक्रीला आले होते. ८०० च्या आसपास घोडे विक्रीला आले होते. बाजारात विक्रमी गर्दी झाली होती, तर १५० च्या आसपास खरेदी-विक्री झाली. या माध्यमातून बाजार समितीला मोठे उत्पन्नही वर्षभर मिळत असते." -कैलास व्यापारे, सचिव, बाजार समिती, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.