जाब विचारणाऱ्या महिलांवर लाठीमार
आमदार फरांदे यांचा आरोप; पोलिसांकडून इन्कार
इंदिरानगर (जि.नाशिक) : वडाळा येथील महिला छेडछाड, तसेच संबंधित डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलिस ठाण्यात आलेल्या सुमारे दोनशे महिलांवर लाठीमार करून पोलिसांनी पिटाळून लावल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते आणि वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी हा आरोप फेटाळून लावला. बेकायदेशीररीत्या जमा झालेल्या महिलांना शांततेच्या मार्गाने परत पाठविल्याचे सांगितले.
पोलीसांनी आरोप फेटाळले
डॉक्टर मुश्ताक शेख यांचे सादिकनगर येथील गल्ली नंबर चारमध्ये क्लिनिक आहे. क्लिनिकच्या भिंतीवर इरफान शेख यांच्या बातम्यांचे लावलेले कात्रण त्यांनी काढून टाकले. त्याचा जाब विचारून मारहाण केल्याची फिर्याद संबंधित डॉक्टरने दिली. या डॉक्टरकडे एक महिला गेली असता, इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार महिलेने कुटुंबीयांकडे केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फैजल शेख आणि शोएब शेख गेले असता, डॉक्टरने त्यांच्यावरही हल्ला केला, अशा आशयाची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टरविरुद्धही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पीडित महिलेची बाजू न ऐकता पोलिसांनी गुन्हा दाखल केला
या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी सकाळी उमटले. पीडित महिलेची बाजू ऐकून न घेता तिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला हे अन्यायकारक आहे, असे या महिलांचे म्हणणे होते. याबाबतच चर्चा करण्यासाठी सादिकनगर आणि मेहबूबनगर भागातील सुमारे दोनशे महिला आमदार फरांदे यांच्यासह पोलिस ठाण्यात आल्या. पोलिसांनी बेकायदेशीररीत्या जमाव केला, असे सांगत त्यांना माघारी पाठवले. महिलांशी संवाद साधावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली. मात्र सध्याच्या परिस्थितीत असा जमाव करण्यास कायद्यानुसार बंदी असल्याने पोलिसांनी ऐकले नाही. संबंधित महिलांनी तातडीने मागे हटावे अन्यथा पोलिस बळाचा वापर करून त्यांना हटविण्यात येईल, अशी उद्घोषणा वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांनी स्पीकरद्वारे केली. या काळात आवश्यक फौजफाटाही आला आणि महिलांना परत पाठविण्यात आले.
कायद्याचा धाक गुन्हेगारांना दाखविण्याऐवजी म्हणणे मांडण्यासाठी आलेल्या महिलांवरच पोलिसांनी लाठीमार केला. खरा गुन्हेगार कोण हे शोधून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. भविष्यात अशा घटना झाल्या, तर सर्वसामान्य माणूस पोलिस अधिकाऱ्याशी संवाद करू शकत नाही. -देवयानी फरांदे, आमदार
जमाव बेकायदेशीर होता. कोणत्याही महिलेवर लाठीमार झालेला नाही. त्यांना समज देत परत पाठविले. एकमेकांविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संबंधित डॉक्टर, तसेच इरफान शेख आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सर्वांना ताब्यात घेतले आहे.
-नीलेश माईनकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.