Nandabai Rajput became women Idol Inspirational News nashik
Nandabai Rajput became women Idol Inspirational News nashik  
नाशिक

Inspirational News : नंदाताई राजपूत बनल्या महिलांच्या ‘आयडॉल’

विजयकुमार इंगळे: सकाळ वृत्तसेवा

Inspirational News : आयुष्य जगताना दुःख कोणाला नाहीय... परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलते... परिस्थिती तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेली असते, या सकारात्मक विचारांवर ती आयुष्य पुढे नेत राहिली... आयुष्यात जणू संकटांची मालिकाच तिच्या नशिबी लिहिली होती, मात्र नियतीचा पाश कितीही अवघड असला तरी तिने प्रयत्न सुरूच ठेवले.

परिस्थितीमुळे शाळेची पायरीही चढू शकली नाही. (Nandabai Rajput became women Idol Inspirational News nashik )

पतीचा रोजगार गेल्यावर घरोघरी धुणीभांडीची कामे करतानाच स्वतःमधील आत्मविश्वासातून रिक्षा चालवायला शिकत तीच कुटुंबासाठी आधार बनली... नाशिकमधील पहिली रिक्षाचालक म्हणून स्वतःची ओळख उभी करतानाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या, त्या कामगारनगरमधील नंदाताई राजपूत...

भाकरीची भूक भागविण्यासाठी खानदेशातील नगरदेवळा (ता. पाचोरा) गावातील मुक्काम हलवत कौतिक चव्हाण यांनी नाशिक गाठलं... जुन्या नाशिकमध्ये भाड्याच्या घरात राहतानाच हमालीकामातून कुटुंबासाठी पत्नी जनाबाई चव्हाण यांचा त्यांना आधार होता.

पत्नी जनाबाई यांच्यासह दोन मुली व मुलगा असं कुटुंब... चव्हाण कुटुंबात नंदाताई सर्वांत लहान कन्या... जगण्याचा रोजचा संघर्ष कुटुंबाला दोन वेळचं पोटभर जेवण मिळावं, एवढ्यापुरताच सीमित होता. कुटुंबाला आधार म्हणून जनाबाई विड्या वळण्याचे काम करीत होत्या.

संघर्ष जणू पाचवीलाच पूजलेला

दोन वेळ खायची भ्रांत असलेल्या कुटुंबात तीन भावंडांच्याही वाट्याला संघर्षाची ही लढाई पूर्वापार चालत आलेली... नंदाताई सहा वर्षांच्या असतानाच आपल्या भावंडांबरोबर कामाच्या शोधात बाहेर पडल्या. भाऊ कोंडाजी चिवडा येथे कांदे चिरण्यासाठी जात असे; तर नंदाताई व त्यांची बहीण जुन्या नाशिकमधील मालवीय चौकात दंतमंजन तयार करणाऱ्या उद्योगात कोळसा दळण्यासाठी आणि धुणीभांडी करण्यासाठी जात असत.

रोजच्या कष्टमय आयुष्यात कुटुंबातील चिमुकल्यांना शाळेचा जणू विसरच पडला. रोजचा उगवणारा दिवस म्हणजे नंदाताई यांच्यासह चव्हाण परिवाराला आव्हान घेऊन येणारा होता. त्यातच त्यांचा विवाह झाला.

जगण्याची वाट बिकटच

कुटुंबाची जबाबदारी म्हणून वडिलांनी नंदाताई यांचा विवाह अशोक स्तंभ परिसरातील मिठूलाल राजपूत यांच्याशी करून दिला. सासरीही संकटांची मालिका जणू पाचवीलाच पूजलेली होती. पती मिठूलाल हे राठी रोलिंग मिलमध्ये कामाला होते. मात्र, पगार तुटपुंजा... कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नंदाताई यांची धडपड सुरू होती.

यातूनच परिसरातील ओळखीच्या महिलांकडून त्या शिवणकाम शिकल्या. शिवणकामातून त्यांना एका ब्लाउजची मजुरी दोन रुपये मिळत होती. मात्र, ही रक्कम या कुटुंबासाठी हातभार लावणारी होती. याच काळात मुलगी नीलमचे कुटुंबात आगमन झाले. परिस्थितीमुळे शाळेची पायरीही न चढलेल्या नंदाताई यांनी मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष पुरविले.

कुटुंबाची सूत्रे घेतली हातात

पोटाला चिमटा देऊन नंदाताई यांनी मुलगी नीलमला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविले. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच मिल बंद पडल्याने पती मिठूलाल बेरोजगार झाले. त्यातच त्यांच्या आजाराने डोके वर काढले. राजपूत कुटुंबाला पुढे न्यायचे असेल तर त्यांना काहीतरी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

शिवणकामातून तुटपुंजी कमाई होत असल्याने याच काळात त्यांनी नाशिक मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेत रिक्षा चालवायला सुरवात केली. पतीला आधार देत असतानाच दिवसभर रिक्षा चाललितानाच मुलीच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले.

नाशिकमध्ये उभी राहिली ओळख

नाशिकमध्ये दोन रुपये प्रतिशीट रिक्षाभाडे असताना त्यांनी रिक्षाचे स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतले. पहिल्याच दिवशी दिवसभर रिक्षा चालवत भाड्यापोटी १०० रुपये कमाई नंदाताई यांना झाली. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढत असतानाच आयुष्यात वेगळी वाट उभी करू शकल्याचे समाधान खूप मोठे असल्याचे सांगताना त्यांचे डोळे भरून आले.

शहरातील रिक्षांची कमी संख्या... त्यातच महिला रिक्षाचालक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख उभी केली. प्रादेशिक परिवहन मंडळानेही नाशिक शहरातील पहिली रिक्षाचालक म्हणून त्यांचा सत्कार करतानाच स्वमालकीची रिक्षा घेण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मदत केली. महिला रिक्षाचालक म्हणून केवळ शहरातच नव्हे, तर थेट परिसरातील देवदर्शनासाठी त्यांच्या रिक्षाला मागणी वाढत गेली.

स्वाभिमानाची लढाई

पतीची मिल बंद पडल्यानंतरचा काळ संयमाने पुढे नेतानाच या काळात पतीचे निधन झाले. मात्र, मुलीच्या लग्नानंतर वैवाहिक समस्यांमध्येही त्या मुलगी नीलमच्या मागे भक्कम उभ्या राहिल्या. मुलीला शिक्षणातून स्वतःच्या पायावर उभे करतानाच नातवांच्या शिक्षणाकडेही कुटुंबप्रमुख म्हणून नंदाताई भक्कमपणे उभ्या राहिल्या. एक नातू बारावीत, तर दुसरा हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतोय. आज ६४ वर्षांच्या नंदाताई महिलांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT