विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Nashik News : गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या जिल्ह्यातील तब्बल १०६ गाव-वाड्यांवर आजतागायत टँकर सुरू आहे. या गाव-वाड्यांमधील एक लाख ३१ हजार लोकांची वर्षभरापासून तहान टॅंकरच्या पाण्याद्वारे भागविली जात आहे. (Nashik Water Scarcity)
यात जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातील १८ गाव-वाड्या आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यातील ४४ गाव-वाड्यांचा समावेश आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यात सरासरी १३४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या वर्षात फारशी दुष्काळी परिस्थिती जाणवली नाही. अगदी एप्रिल २०२३ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी नोंदविली गेली होती.
८ एप्रिल २०२३ ला पहिल्या टॅंकरची मागणी नोंदविली गेली. २० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ सात टॅंकर सुरू होते. २ मे २०२३ ला टॅंकरची ही संख्या २१ झाली. १४ जूनला टॅंकरची संख्या ६७ वर गेली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन वेळात झाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात टॅंकरची मागणी वाढली. जुलैमध्येही केवळ १८ दिवस ३३८ मिलिमीटर पाऊस झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही कमी पाऊस झाला.
यातच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरी केवळ ७० टक्के पाऊस झाला. कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. काही तालुक्यांत पाऊस झाला होता. त्यामुळे तेथे पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र, मालेगाव, येवला, बागलाण, चांदवड, नांदगाव, सिन्नर तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला. १ ऑगस्ट २०२३ ला जिल्ह्यात ६७ गावे व ३९ अशा एकूण १०६ गाव-वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू होते. (latest marathi news)
त्यानंतर टॅंकरची मागणी कमी होण्याऐवजी हळूहळू वाढत गेली. हिवाळ्यातही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हाभरात १७० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. २९ मार्च २०२४ ला १९५ गावे आणि ४३६ वाड्यांसाठी २०७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. २० मेस लोकसभेसाठी मतदान झाले. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाईची फारशी ओरड झाली नाही.
ग्रामीण भागात ओरड झाली मात्र राजकारणात ती बेदखल झाली. परंतु २० मेस मतदान झाल्यानंतर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले. धरणांनी तळ गाठला. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. टॅंकरची संख्या मे २०२४ अखेर ४०० वर येऊन पोचली. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले खरे. मात्र, अद्यापही टॅंकरची संख्या ही घटलेली नाही.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या गावांमध्ये आतापर्यंत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अशा गाव-वाड्यांची संख्या ही १०६ असून, तेथे वर्षभरापासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात (कंसात गाव-वाड्या) बागलाण (७) ३, चांदवड (२२) १०, देवळा (६) ३, मालेगाव (१८) १३, नांदगाव (५) ८, सिन्नर (४) २ व येवला (४४) १६ यांचा समावेश आहे. यातील नांदगाव, सिन्नर, मालेगाव तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. सद्यःस्थितीत सर्वाधिक टॅंकर नांदगाव, मालेगाव तालुक्यात सुरू आहेत.
"गाव तसे दुष्काळी आहे. यातच पाऊस नसल्याने वर्षभरापासून गावात टॅंकर सुरू आहे. गावात वेळेवर टॅंकर येत नाही. लोकसंख्या जास्त असल्याने दोन-तीन फेऱ्या माराव्या लागतात. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी." - संदीप आहेर (हिसवळ खुर्द, ता. नांदगाव)
"गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झाले. ते टॅंकर अद्याप सुरू आहेत. पाणीटंचाई भीषण असल्याने टॅंकरची संख्या यंदा वाढली. गावात मागताक्षणी टॅंकरद्वारा पाणीपुरवठा केला जात होता. टॅंकरच्या फेऱ्यांबाबत ग्रामीण भागातून कोठेही तक्रार नाही. जलजीवन मिशनअतंर्गत पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे. सप्टेंबरअखेर ही कामे पूर्ण होतील. त्यामुळे पुढील वर्षी टॅंकरची फारशी आवश्यकता भासणार नाही." - संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद
टॅंकरच्या फेऱ्यांचे गौडबंगाल
गेल्या आठवड्यातील ६ जून २०२४ च्या अहवालानुसार जिल्ह्यात ३६२ गावे, ९४१ वाड्या अशा एकूण एक हजार ३०३ गाव-वाड्यांना ३९८ टॅंकरच्या ८८९ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यासाठी तब्बल २१३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टॅंकर घोटाळा होत असल्याने टॅंकरला जीपीएस सिस्टिम लावल्याने टॅंकरच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. मात्र, गावातील टॅंकरच्या फेऱ्यांबाबत तक्रारीपाहता गौडबंगाल असल्याचे दिसून येत आहे.
काही गाव-वाड्यांची संख्या मोठी असल्याने गाव-वाड्यांवर दिवसातून अनेक फेऱ्या कराव्या लागतात. मात्र, गावांमध्ये टॅंकरच्या फेऱ्या होत नसल्याचे बोलले जाते. निश्चित केलेल्या पाण्याच्या स्त्रोतावरून टॅंकर भरला जातो. गावात एकदा, दोनदा येतो. त्यानंतर टॅंकरच्या फेऱ्या होत नसल्याची तक्रार काही गावांमध्ये आहे. जलस्त्रोतांवर टॅंकर भरला, की त्याची नोंद करण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे. या कर्मचाऱ्याकडे नोंद होते.
परंतु प्रत्यक्षात टॅंकर पोचत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. असे असले, तरी टॅंकर भरण्यास व वेळेत पोचण्यास वीजपुरवठा खंडित होणे, जलस्त्रोतांवरील मोटार ना दुरुस्त होणे, टॅंकर वाहन ना दुरुस्त होणे आदींचा फटका बसत असल्याने टॅंकरच्या फेऱ्या कमी होत असतील. अशा गावांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.