Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २०) सकाळ सत्रात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. तापमानातील वाढीमुळे सकाळ सत्रात मतदान करण्याचा प्रयत्न झाला. मतदारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीदेखील सकाळी मतदान झाले. सकाळी सात ते अकरा कालावधीत अकरा टक्के मतदान झाले. ( Nashik exercise their sacred right to vote )
सर्वाधिक गर्दी सिन्नर विधानसभेतील मतदान केंद्रावर दिसून आली, तर सत्रात सर्वात कमी मतदान देवळाली विधानसभा मतदारसंघात झाले. शहरी भागातील मतदान केंद्रांवर सकाळी सातपासून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी शहरी मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भद्रकालीतील मतदान केंद्रांवर सर्वाधिक गर्दी दिसून आली. त्यापाठोपाठ बजरंगवाडी वडाळागाव, इंदिरानगर व गंगापूर रोड भागातील मतदान केंद्रांवर गर्दी झाली.
सकाळी पंचवटी भागातील मेरी भागातील आकाश पेट्रोलपंप येथील मतदान केंद्रावर जय बाबाजी परिवारातील मतदान प्रतिनिधींनी जय बाबाजी व जनार्दनाय नमः असे अक्षर लिहिलेले टी-शर्ट परिधान केल्याने पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत समज दिली. सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू हायस्कूल येथे आतापर्यंतच्या मतदानाचा विक्रम मोडला गेला. नॅशनल उर्दू हायस्कूल, भालेकर हायस्कूल, रंगारवाडा, सावित्रीबाई फुले या मतदान केंद्रांवर शक्यतो संध्याकाळी गर्दी होते, मात्र यंदा सकाळपासूनच गर्दी दिसून आली.
सातपूर औद्योगिक व कामगार वसाहतीमध्येदेखील सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी झाली. गणेशवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालय केंद्रात सकाळी पाच ते सहा टक्के मतदान झाले. पाथर्डी फाटा येथील आयुष्यमान आरोग्य मतदान केंद्रावर सावलीसाठी आसरा नसल्याने भर उन्हात मतदारांना ताटकळत उभे राहावे लागल्याने मतदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला हीच परिस्थिती सिडकोतील बहुतांशी मतदान केंद्रांवर दिसून आली. (latest marathi news)
मीनाताई ठाकरे शाळा, धन्वंतरी मेडिकल कॉलेज व उंटवाडी शाळा येथे मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. नाशिक रोड येथील तक्षशिला विद्यालयात मतदानासाठी आलेल्या नागरिकांना असल्याने झाडाखाली थांबण्याची वेळ आली. द्वारका येथील काठे गल्लीतील रवींद्र विद्यालयात दुपारी गर्दी झाल्याने मतदारांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. मतदारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन संवेदनशील मतदान केंद्रांवर राज्यातील विशेष पोलिस पथक तैनात केले होते.
सिडकोतील पेठे विद्यालय मतदान केंद्रांवर महिलांनी फेटे घालून उत्साहात मतदान केले. हाके रोडवरील बूथवर मतदार स्लीप संपल्याने गोंधळ उडाला. यातून वाद निर्माण झाला अशी अफवा पसरल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सिडको परिसरात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांचे पोलिसांशी वाद झाले. मतदान केंद्रात कार्यकर्ते जेवण घेऊन जात असताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
कामटवाडे येथील विखे पाटील मेमोरिअल स्कूलमध्ये महायुतीच्या दोन कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातला गेला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माजी नगरसेविकेकडून पोलिसांना दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला. जेल रोड येथील हनुमंतानगर येथे पैसे वाटताना एकाला मारहाण झाल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
इंदिरानगरमध्ये एका माजी नगरसेवकाला निवडणूक भरारी पथकाने पैसे वाटप करताना ताब्यात घेतले. उपनगर येथे शांतीगिरी महाराजांच्या बूथवरील कार्यकर्त्यांना उपनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. उपनगर भागामध्ये आधार कार्ड दाखवा व ५०० रुपये याप्रमाणे मतदानाची पैसे घ्या असे प्रकार झाल्याने महाआघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
वादावादीचे प्रकार
मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेण्यास बंदी असल्याने पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच मतदारांमध्ये अनेक ठिकाणी वाद झाले.
बंद मशिनमुळे मनस्ताप
सातपूर भागातील मॉडर्न शाळेतील केंद्रावर अर्धा तास ईव्हीएम मशिन बंद असल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी दीड ते दोन मिनिटांचा कालावधी लागल्याने मतदानासाठी रांगा लागल्या. नाशिक रोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये मशिन बंद पडल्याने काही काळ मतदान प्रक्रिया बंद करावी लागली.
मतदार यादीमधील गोंधळ कायम
मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरास बंदी केल्याने मतदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. मतदार यादीमधील सदोषपणा पुन्हा एकदा समोर आला. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मतदारांचे नाव कमी केल्याचे आढळले, तर पत्नीचे नाव आहे तर पतीचे नाव नाही असे प्रकारदेखील समोर आले. मतदार यादी पूर्ण परिवाराचे नाव एकाच भागात असणे गरजेचे होते, मात्र ते विभागले गेले. दुबार व मयत मतदारांची नावे मतदार यादीत असल्याने गोंधळ उडाला.
यांनी बजावला मतदानाचा हक्क
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सपत्निक संसरी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सपत्निक सिन्नर येथे मतदान केले. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पंचवटीतील गणेशवाडी मतदान केंद्रावर मतदान केले. प्रा. देवयानी फरांदे यांनी गंगापूर रोडवरील मतदान केंद्रात, तर आमदार सीमा हिरे यांनी आनंदवली शाळेत मतदान केले.
मखमलाबाद येथील मतदान केंद्रावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी फ्रान्सिस हायस्कूलमध्ये तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सहकुटुंब बॉईज टाऊन स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.