नाशिक रोड : एकीकडे महिलादिनानिमित्त स्त्रीशक्तीचा सन्मान होत असतानाच दुसरीकडे अत्यंत भयानक व क्रूर घडना समोर आली आहे. एखाद्या जीवाला नऊ महिने पोटात वाढवून ती जगात आल्यावर स्वत:चे जन्मदातेच तिला डोळे उघडून जग पाहण्याआधीच जीवावर उठतात. यापेक्षा दु:खदायक बाब कुठलीच असू शकत नाही. असाच एक संतापजनक तसेच अंगावर काटा आणणारी बाब प्रकार समोर आला आहे. काय घडले नेमके?
या प्रकारामुळे परिसरात खळबळ
परिसरातील आनंदेश्वर महादेव मंदिर, दशक्रिया शेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मंगळवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास गावातील मासे पकडणारी मुले नदीवर जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला ड्रेनेज चेंबरमधून लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या ठिकाणी भूषण परदेशी यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, परदेशी आणि जंगम बर्डे यांनीदेखील हा आवाज ऐकला. त्यांनी तत्काळ ही बाब माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांच्या मदतीने बाळाला बाहेर काढले.
माता-पित्यांनी प्लॅस्टिकच्या गोणीत बांधून ड्रेनेज चेंबरमध्ये टाकले
या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनी बाळाला स्वच्छ करून कपडे घातले. त्यानंतर ॲड. बोराडे आणि परिसरातील नागरिकांनी बाळाला पंचक येथील दवाखान्यात नेले. त्या वेळी, तेथील नर्सने बाळाला तपासले व या बाळाच्या आईची प्रसूती येथेच झाली असून, आजच सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज दिल्याचे सांगितले. ॲड. बोराडे यांनी रुग्णालयातील रेकॉर्ड तपासले असता, मातेचे नाव स्वाती जाधव असून, जय भगवती लॉन्स, मोरे मळा असा पत्ता असल्याचे समजते. याबाबत नाशिक रोड पोलिसांना माहिती कळविण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत.
आईविरुद्ध गुन्हा दाखल, घृणास्पद व संतापजनक प्रकार
दुसरी मुलगी झाली म्हणून एका दिवसाच्या अर्भकाला निर्दयीपणे फेकून देणाऱ्या आईविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुदैवाने नागरिकांनी एका दिवसाच्या स्त्री अर्भकास त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने ते सुखरूप आहे. रुग्णालयाच्या नोंदीवरून एक दिवसाच्या स्त्री जातीच्या जिवंत अर्भकास फेकून देणाऱ्या जेल रोड, मोरे मळा, भगवती लॉन्स येथील स्वाती जाधव या मातेला पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांनी त्या अर्भकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात जिवंत अर्भकास फेकून देणाऱ्या स्वाती जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस तपासात दुसरी मुलगी झाल्याने तिला फेकून दिल्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.