सातपूर (नाशिक) : कोरोनाग्रस्तांप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत चालल्याने महिन्यापूर्वी लागणाऱ्या ऑक्सिजनमध्ये दहापट वाढ झाली. त्याच वेळी लिक्विड ऑक्सिजनची उपलब्धता मागणीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांवर आली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र ‘व्हेन्टीलेटर’वर पोचला. ऑक्सिजन उपलब्धतेचा गंभीर प्रश्न तयार झाला. त्यावर उपाय म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांची बैठक घेतली. त्यामध्ये नाशिकचे उत्पादन दिवसाला ५० टनांवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीयसाठी ९५ टक्केऑक्सिजन
बैठकीमध्ये उद्योगासाठी ५ टक्के आणि वैद्यकीयसाठी ९५ टक्के ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची खात्री करण्यात आली. त्याचबरोबर तीन उत्पादकांच्या विस्ताराप्रमाणे एका उत्पादकाला एअर ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी लगेच परवानगी देण्यात येईल, त्यासाठी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांच्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यात येणार आहे. बैठकीनंतर सहआयुक्त माधुरी पवार यांनी ही माहिती दिली.
‘सिव्हिल’ला ४५० सिलिंडरची व्यवस्था
जिल्हा रुग्णालयासोबत दिवसाला ४० सिलिंडर पुरवठ्याचा करार झाला आहे. तरीही दोनशे ते अडीचशे सिलिंडर दिले जायचे. बैठकीमध्ये पुरवठादारांच्या सहकार्यातून दिवसाला ४५० सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आल्याचेही सहआयुक्तांनी सांगितले. सद्यःस्थितीत नाशिकला दिवसाला पुरवठा होणाऱ्या २२ टन ऑक्सिजनमध्ये जिल्ह्यात तयार होणाऱ्या पाच ते आठ टन ऑक्सिजनचा समावेश होता. १७ टन ऑक्सिजन बाहेरून यायचा. मात्र पुणे, मुंबई, मुरबाड या भागाची गरज भागल्याने कंपन्यांकडून नाशिकला येणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचे प्रमाण निम्म्याने कमी झाले. दरम्यान, बैठकीसाठी सहा उत्पादक, चार पुरवठा आणि प्रतिनिधी उपस्थित होते. पिनॅकल, रवींद्रन्, सनी इन्स्पायर, नाशिक ऑक्सिजन आदींचा समावेश होता. नाशिकची वाढलेली ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन इन्व्हाॅस कंपनीतर्फे उत्तर महाराष्ट्रातील छोट्या पुरवठादारांना ऑक्सिजन दिल्यास पुरवठा सुरळीत होईल, अशी चर्चा बैठकीत झाली.
सिलिंडरच्या दरात भरमसाट वाढ
कंपन्यांच्या ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत तीन प्रकारच्या सिलिंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. रुग्णवाहिका अथवा दम्याच्या रुग्णासाठी घरगुती स्वरूपात वापरण्यात येणाऱ्या छोट्या सिलिंडरची सरकारी किंमत ८० रुपये आहे. पण सद्यःस्थितीत रुग्णालयाला दीडशे, तर बाजारात पाचशे रुपयांना विकले जाते. त्यापेक्षा मोठ्या सिलिंडरची सरकारी किंमत १२० रुपये आहे. ते रुग्णालयासाठी २१० आणि बाजारात एक हजार रुपयांना दिले जाते. मोठ्या सिलिंडरची सरकारी किंमत १३० रुपये आहे. जीएसटीसह ती १४० रुपये होते. रुग्णालयासाठी २४० ते २५० आणि बाजारात दोन हजार रुपयांना दिले जाते.
नगरसह खानदेशसाठी ६० टन
जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यासाठी दिवसाला २८ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात ६० टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाचे प्रयत्न असतील. सहआयुक्तांनी उत्पादक आणि पुरवठादारांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासाठी साडेचारशे आणि महापालिकेच्या रुग्णालयासाठी साडेतीनशे सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी पिनॅकल कंपनीला आणखी दहा टन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सहआयुक्तांनी इन्व्हॉस कंपनीला तयार केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित मागणीच्या पूर्ततेसाठी नागपूरच्या कंपनीकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
कोरोनासोबत पावसाळ्यात दमा व इतर आजारांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली. ही वाढती मागणी लक्षात घेऊन नाशिकसोबत नगर आणि खानदेशातील मागणीची पूर्तता होण्यासाठी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून वरिष्ठांना विनंती करणार आहे.
-माधुरी पवार, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन
जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी इतर व्यावसायिकांनी सहकार्य करायला हवे. याशिवाय जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेडे स्वतःची मोठी जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी एअर ऑक्सिजनचा प्रकल्प उभारला जावा.
-अमोल जाधव, संचालक, पिनॅकल
कोरोना विषाणू संसर्गापूर्वी आम्ही सिलिंडर १३० व १४० रुपयांना देत होतो. कोरोना संसर्गात डिझेल, विजेसह कच्च्या मालाचे दर वाढल्याने २४० रुपये दर करण्यात आला आहे. अधिकचा लिक्विड ऑक्सिजन मिळाल्यास इतर मागणी पूर्ण होऊ शकते. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
-गिरीश पंगे, व्यवस्थापक, नाशिक ऑक्सिजन
संपादन- रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.