Water supply by tankers which continues in October itself. esakal
नाशिक

Nashik Drought News: जिल्ह्यात अर्धा डझन तालुक्यांत यंदा दुष्काळाचे ‘दीप’; टंचाई आराखड्याला लागेना मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे/ विकास गामणे

जायकवाडीला पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्रात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झालेली असताना नाशिक जिल्ह्यातील अर्धा डझन तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे.

दिवाळीपूर्वीच टँकरची सेंच्युरी पूर्ण होण्यावर आल्याने पिकांना पाणी, गुरांना चारा कसा पुरवायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. खरीप व रब्बी हंगाम हातातून गेल्यानंतर आता शासकीय मदतीवरच संपूर्ण भिस्त आहे.

शहरी भागातही परिस्थिती म्हणावी तशी समाधानकारक नाही. यंदाच्या दीपावलीत शासकीय मदतीचे ‘दीप’ दुष्काळग्रस्तांच्या घरी पेटतील, अशी अपेक्षा लागून आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागणार असल्याने उन्हाळ्यात नाशिक शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नोव्हेंबरपासूनच टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने दुष्काळाचे वास्तव वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सकाळ’चा विशेष रिपोर्ट... (Severe drought conditions in 6 taluks of Nashik district news)

जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर जिल्ह्यात ६७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ३३ टक्के पावसाची तूट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवाळीनंतर पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. या टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी टंचाई निवारणार्थ आराखडा नोव्हेंबर उजाडूनदेखील तयार झालेला नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे १५ तालुक्यांपैकी केवळ सात तालुक्यांचे टंचाई आराखडे प्राप्त झाले आहेत.

जळगाव, अहमदनगर जिल्ह्याने टंचाई आराखडे मंजुरीसाठी सादर केलेले असताना नाशिक जिल्ह्याचा आराखडा अद्यापही तयार झालेला नाही. यंदा पावसाने जूनपासूनच ओढ दिली होती. त्यामुळे पहिल्या साडेतीन महिन्यांत फक्त सरासरी १९३ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसात जेमतेम खरीप पेरणी झाली. परंतु जुलै व ऑगस्टमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला. त्यामुळे ७१ महसूल मंडलातील जवळपास एक हजार गावांतील खरीप पिकांच्या उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे यंदा खरीप हंगाम वाया गेलेला आहे.

सप्टेंबरअखेर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ९०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा सप्टेंबरअखेर केवळ ६०७ मिलिमीटर म्हणजे ६६. ७ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात हे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १३० टक्के होते. संपूर्ण जिल्ह्यात दिंडोरी या एकमेव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे (११८ टक्के) पाऊस झाला आहे.

उर्वरित सर्व तालुके अखेरपर्यंत पावसाच्या प्रतिक्षेत राहिले. परतीच्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे भूजलपातळी डिसेंबरपासूनच खोलवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा दिवाळीनंतरच तीव्र होण्याची शक्यता आहे.

सात तालुक्यांचे आराखडे प्राप्त

गतवर्षी सुरू झालेले टँकर अद्याप सुरू आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर, १५ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन टंचाई आराखडा बनविला जातो. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यासाठी तालुकानिहाय आराखडे मागवितात.

त्यानंतर, जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला जातो. यंदा मात्र, नोव्हेंबर सुरू झालेला असला तरी, अद्याप आराखडा तयार झालेला नाही. विभागाने आतापर्यंत तालुका गटविकास अधिकारी यांना दोनदा पत्र दिले आहेत. यात, चांदवड, देवळा, निफाड, सुरगाणा, येवला, नाशिक, इगतपुरी या ७ तालुक्यांचे आराखडे प्राप्त झालेले आहे.

उर्वरित नांदगाव, मालेगाव, सिन्नर, कळवण, दिंडोरी, बागलाण, पेठ व त्र्यंबकेश्वर या ८ तालुक्यांचे आराखडे प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे टंचाई आराखड्यास विलंब होत आहे. सर्व आराखडे आठवड्यापर्यंत प्राप्त होतील. त्यानंतर, दिवाळीची सुटी असल्याने दिवाळी झाल्यानंतर साधारणः हा आराखडा तयार होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर होण्याची शक्यता आहे.

टंचाईची तीव्रता

साधारण टंचाई आराखडा तीन टप्प्यांत बनविला जातो. ऑक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा तर, एप्रिल ते जून असा तिसरा टप्पा असतो. दरवर्षी पावसाचे प्रमाण पुरेसे असल्याने पहिल्या टप्यांत फारसा दुष्काळ नसतो. यंदा मात्र, पावसाळ्यातदेखील टँकर सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन लवकर आराखडा तयार करणे अपेक्षित होते.

नांदगावला सर्वाधिक टँकर; दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता

जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने आतापासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नोव्हेंबरमध्येच जिल्ह्यातील ३४० गावे, वाड्यांना ९८ टँकरच्या २४२ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगावला सर्वाधिक ३५ टँकर सुरू आहे. सद्यःस्थितीत १०० टँकरची संख्या दिवाळीनंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीचे जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. यातच ‘अल निनो’चे संकट जिल्ह्यावर आले. यातच जिल्हयात पुरेसा पाऊस झाला नाही.

करपलेली व अर्धवट वाढ झालेल्या मक्याची कापणी करताना शेतकरी.

परतीच्या पावसाने जिल्ह्याला ओढ दिली. परिणामी भरपावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवलेली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील १०४ गावे व २३६ अशा एकूण ३४० गावे- वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ९३ खासगी व ५ शासकीय अशा एकूण ९८ टँकरद्वारे हा पाणीपुरवठा सुरू आहे.

टंचाई असल्याने प्रशासनाने २१ गावांसाठी २० टँकरसाठी अशा एकूण ४१ विहिरी अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत. सध्या ९८ टँकरच्या २४२ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुकानिहाय विचार करता दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. मात्र, बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तीनच तालुक्यांच्या पाणी पातळीत घट

गेल्या दहा वर्षांतील भूजल पातळीच्या आधारे मालेगाव, येवला व चांदवड या तीनच तालुक्यांत यंदा दुष्काळसदृश स्थिती असल्याचे भूजल विकास व सर्वेक्षण विभागाच्या पाहणीतून निदर्शनास आले आहे. गेल्या दहा वर्षांत चांदवड तालुक्याची पाणी पातळी ७.१६ आहे. तर ऑक्टोबरमध्ये ५.४३ नोंदवली गेल्याने सरासरी पातळीत १.२८ ची घट झाल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्याची असून दहा वर्षाची सरासरी ७. ७८ आहे.

त्यात १.९३ ची घट होऊन ६.७७ पर्यंत पाणी पातळी घसरली आहे. येवला तालुक्याची दहा वर्षांची सरासरी ६. ४० असून त्यामध्ये १.०४ ने घट होऊन ४.०५ पर्यंत स्थिरावल्याने सौम्य स्वरूपाचा दुष्काळ या तालुक्यांमध्ये असल्याची नोंद भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी घोषित झाली आहे.

तालुकानिहाय सुरू असलेले टँकर

तालुका गावे, वाड्या सुरू असलेले टँकर विहीर अधिग्रहण

बागलाण ७ ३ ४

चांदवड २८ १० १

देवळा २३ ०६ ३

मालेगाव २७ १५ १८

नांदगाव १९६ ३५ १४

सिन्नर ९ ६ -

येवला ५० २३ १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT