Ancient Wainganga Ghat on the verge of extinction
Ancient Wainganga Ghat on the verge of extinction 
विदर्भ

ऐतिहासिक घाट देतात संपन्नतेची साक्ष, जाणून घ्या वैनगंगेच्या काठावरील या वारशाबाबत...

नीतेश बावनकर

पवनी : दोन हजार वर्षांपूर्वीचे धार्मिक, ऐतिहासिक व प्राचीन पद्‌मावतीनगर म्हणजेच आजचे पवनी शहर होय. येथील शेकडो मंदिरे, अभेद्य परकोट, गरुड खांब, सम्राट अशोककालीन बौद्धस्तूप या नगराच्या भव्यदिव्यतेची व संपन्नतेची साक्ष देतात. या वैभवशाली वारशात भर पाडणारे वैनगंगा नदीकाठावरील इतिहासकालीन सहा घाट आज आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत.

पवनी नगरावर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथीयन, वाकाटक, गोंडराजे, भोसले राज्यांनी राज्य केले. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या राजाच्या कालखंडात या घाटांचे बांधकाम झाले हे सांगणे कठीण आहे. नगरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या दक्षिण काठावर वैजेश्‍वर घाट, पाटे घाट, ताराबाईचा घाट, घोडेघाट, पान खिडकी घाट, दिवाण घाट पवनीच्या इतिहासाची साक्ष देतात.

घाट होते आरक्षित

राजेमहाराजांच्या काळात समाजातील विविध जाती, वर्गाच्या लोकांसाठी तसेच प्राण्यांसाठी नदीघाट आरक्षित होते. यातील अनेक घाट आजही चांगल्या स्थितीत आहेत. तर काहींची पडझड झाली आहे. घोड्यांना पाणी पिण्यासाठी घोडेघाट. राज्यातील दिवाणासाठी दिवाण घाट होते. तर वैजेश्‍वर घाटाला धार्मिक महत्त्व आहे. या घाटावर नदीपात्रात असे एक ठिकाण आहे, जिथे बेलाचे पान टाकल्यानंतर ते तळाशी जाते आणि इतरत्र टाकले तर तरंगते. येथे वैजेश्‍वर महादेव व बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमा असणारे मंदिर आहे. याच घाटावर विदर्भातील विविध ठिकाणाहून लोक अस्थिविसर्जनासाठी येतात. तसेच येथे दशक्रिया केली जाते. पाटेघाटावर फक्त अंत्यसंस्कार केले जातात.

ऋषीपंचमीच्या स्नानाचे महात्म्य...

वैजेश्‍वर घाटाला लागूनच ताराबाईचा घाट आहे. या ठिकाणी पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे. ऋषीपंचमीच्या दिवशी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक स्त्रिया स्नानाकरिता वैजेश्‍वर मंदिरालगतच्या वैजेश्‍वर घाट, ताराबाईच्या घाटावर येतात. नदीत पवित्र स्नान व पूजाविधी, स्वयंपाक करून ऋषीपंचमीच्या व्रताची सांगता करतात. कार्तिकी पौर्णिमेला रात्रीला वैजेश्‍वर, ताराबाईच्या घाटावरून नदीपात्रात दिवे सोडले जातात. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने हा घाट उजळून निघतो. हे दृश्‍य मनोहारी आणि नयनरम्य असते. जणू आकाशातील लुकलुकणारे चांदणेच नदीत अवतरल्याचा भास होतो. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी त्यांच्या पवनी वास्तव्यादरम्यान येथील वैनगंगा नदीवर 'वैन्यास्तोत्र' रचले. ते दत्तमंदिर परिसरातीलच पान खिडकीच्या घाटावर दररोजस्नानाला जात.

रूपेरी वाळू अन्‌शंख-शिंपले

पवनीच्या बाजूने वाळू असणारा परिसर फक्त घोडेघाटावरच असल्याने घोडेघाट अतिशय छोटा आहे. या घाटावर आजही गावातील लोक आपल्या घरची जनावरे अंघोळीसाठी नेतात. लहान मुलेसुद्धा अंघोळीसह वाळूच्या गालिच्यावर खेळण्याचा, शंख-शिंपले, वेचण्याचा आनंद लुटतात. घाटांच्या ठराविक अंतरावर बुरूज बांधले आहेत. त्या उंच बुरुजावर चढून पोहणारे वरून नदीत सूर मारून पोहण्याचा आनंद घेतात.

दिवाण घाट, पान खिडकी दुर्लक्षित

पान खिडकी घाट दुर्गा मंदिराजवळ आहे. या घाटावर राजा, राणी स्नान करायचे. येथे शिवलिंग (पिंड) आहे. नदीच्या पुलाच्या पश्‍चिमेकडे हत्तीच्या आकाराचा गोटा आहे. त्याला हत्तीगोटा असे म्हटले जाते. पान खिडकीकडे जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. काही जीर्णावस्थेत आहेत. जाण्याचा मार्गावरील दगड खाली पडले आहेत. भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु कालौघात या घाटांच्या वैभवाला उतरती कळा लागली आहे. चिरेबंदी दगड उखडले असून, बुरूजसुद्धा ढासळले आहेत. एका दरवाज्याची भिंत पडली असून तेथे झाडे झुडपे वाढली. त्यामुळे हा दरवाजा बंद आहे. काही जण येथे ओल्या पार्ट्याही करतात.

पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण अपेक्षित

पवनी प्राचीन ऐतिहासिक शहर आहे. येथील वैभव पाहण्यासाठी पर्यटक व इतिहासप्रेमी येतात. पुरातत्त्ववादी व इतिहास संशोधकांनी येथे अभ्यास व संशोधन केले. त्यातून या नगराचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अनेक बाबी समोर आल्या. परंतु, लोकप्रतिनिधी, प्रशासनाला या गोष्टींचे महत्त्व अद्याप उमगलेले नाही. कालौघात नष्ट होऊ पाहणारे, दृष्टीआड होणारे हे वैभव जपण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन, सौंदर्यीकरण व विकासकामे होणे अनिवार्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT