भंडारा : महानुभाव पंथाचे थोर पुरुष चक्रधर स्वामींचे शहरात आगमन झाले होते. त्यांच्या पावन स्मृती जपणाऱ्या तीन ठिकाणांवर देशभर विखुरलेल्या अनुयायांची गाढ श्रद्धा आहे. यातील खांबतलावाच्या काठावर असलेले श्रीदत्त मंदिर आणि पंचदेवळी मंदिराचे गेल्या तीन वर्षांत जीर्णोद्धार करण्यात आले आहे. त्यामुळे या तीर्थस्थळांचे स्वरूप आकर्षक झाले असून भाविकांसाठी सोयीसुविधा करण्यात येत आहेत.
संत चक्रधर स्वामी भटकंती करताना 12 व्या शतकात भंडारा येथे आल्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांमध्ये आहे. त्याकाळी भंडारा शहर हे छोटे गाव होते. स्वामी गावात भिक्षा मागण्यासाठी निळोभट्ट भंडारेकर यांच्या वाड्यात गेले. हल्ली भंडारेकरांचा वाडा श्याम खुराणा यांच्या मालकीचा आहे. हे ठिकाण स्वामींचे शहरातील पहिले स्थान असून ते पाणीपात्र स्थान म्हणून ओळखले जाते. शहरात येणारे भाविक येथे सर्वप्रथम डोके टेकून नंतर पुढील ठिकाणी जातात.
चक्रधर स्वामी भिक्षा घेऊन तेव्हाच्या देवकी तलावाच्या काठावर (खांबतलाव) आले. तेथे त्यांनी काठावरील शिळेवर भिक्षा ग्रहण केली. तेथे पंचदेवळी मंदिर म्हणून छोटे देऊळ होते. कालांतराने तलावाचे स्वरूप बदलत गेले. शहरातील पंचकमिटीने भाविकांच्या सहकार्यातून येथे छोटेसे सुंदर मंदिर बांधले आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणात या मंदिरात जाण्यासाठी शीतला मंदिराच्या बाजूने रस्ता तयार केला आहे.
चक्रधर स्वामींनी तलावाच्या पश्चिम काठावर विश्राम केला. याचठिकाणी त्यांनी निळोभट्ट भंडारेकर यांना अध्यात्मिक ज्ञान व उपदेश दिला. यानंतर श्री. भंडारेकर यांनी स्वामींसोबत देशभर भटकंती केली. या ठिकाणी नंतर महानुभाव पंथीय भाविकांनी दत्तमंदिर बांधले. मंदिराच्या सभोवताल वस्ती वाढत गेली. त्याची बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना अडचण होत होती.
तीन वर्षांपूर्वी चंडीगड (अंबाला) येथील अनिल बन्सीलाल सहानी यांच्या सहकार्यातून दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पंचदेवळी मंदिर व श्रीदत्त मंदिराची देखरेख पंचकमिटीचे पदाधिकारी करतात. दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचकमेटी सदैव कार्यरत असते, अशी माहिती येथील भक्त प्रकाश डोंगरे व प्रवीण बडवाईक यांनी दिली.
चक्रधर स्वामी भिक्षा घेण्यास आले. त्यावेळी निळोभट्ट भंडारेकर पोथीचे वाचन करताना मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधत होते. अंगणात आलेल्या स्वामींनी त्यांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मागील पानांत आहे, असे सांगितले व भिक्षा घेऊन ते निघाले. आपल्या मनातील प्रश्न आणि त्याचे उत्तर ज्याला पोथी न पाहता समजले, तोच खरा सर्वज्ञ आहे, असा विचार करून निळोभट्ट स्वामींच्या मागे निघाले. तेव्हा त्यांच्या पत्नीने कुठे जाता? असे विचारले असता "ज्याचा आहे, त्याच्याकडे' जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे हेच भंडारेकर चक्रधर स्वामींचे प्रमुख शिष्य झाले. महानुभाव पंथीय भाविक या प्रसंगाकडे गुरुशिष्य भेट या दृष्टीने बघतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.