Brass factories are closed due to corona 
विदर्भ

पितळ उद्योग कारखान्यांना टाळे; 10 हजारावर कामगार बेरोजगार

उदय राउत

भंडारा : सोन्याहूनही पिवळ्या असलेल्या पितळ धातुचा उद्योग ही शहराची खरी ओळख. इतकेच नव्हे तर पॉलिशबंद हातोड्यांनी ठोकून ठोकून तयार होणाऱ्या पितळी भांड्यांच्या भण..भण अशा आवाजामुळेच "भंडारा" या नावाची देणसुद्धा मिळालेली. भंडाऱ्याला समृद्धी, वैभव व रोजगार मिळवून देणारा हा उद्योग सध्या कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे संकटाच्या गर्तेत सापडला आहे. महिनाभरापासून टाळेबंदीमुळे धातू उद्योगाला कुलूप लागले असून कामगार व उद्योजकही समस्येचा सामना करीत आहेत.

भंडारा शहर हे पितळेपासून तयार होणाऱ्या धातू उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कालौघात अनेक मोठ्या मेटल्स बंद झाल्या. तरीही आजच्या घडीला चालू असलेल्या धातूउद्योगातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या व्यवसायाशी संबंध येणाऱ्या दहा हजारावर लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. कुशल व अकुशल कामगारांसह मजुरांना रोजगार देण्याची क्षमता असणारा हा उद्योग आहे. परंतु, कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, संचारबंदी यामुळे मोठा फटका पितळ उद्योगाला बसला आहे.
भंडारा शहरात मोठे व लहान असे एकूण 30 पितळी भांड्यांचे कारखाने आहेत. यात काम करणारे कारागीर, घरोघरी कच्चा माल नेऊन भांडी तयार करणारे कुशल, अकुशल कामगार, पग्गे तयार करणारे, वाहतूक करणारे रिक्षाचालक असे मिळून सुमारे दहा हजार व्यक्ती या व्यवसायाशी निगडित आहेत.


शहरातील वेगवेगळ्या मेटलमध्ये विविध प्रकारची धातूची भांडी तयार होतात. यात घागर, गंज, परात, गुंड, घंगाळ, थाळ्या, लोटे, कळशी, बादल्या, ग्लास, परात अशा तांबा व पितळेपासून तयार वस्तूंचा समावेश आहे. प्रामुख्याने या भांड्यांना इतर राज्यात मोठी मागणी आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलगंणा, पं. बंगाल या राज्यांत येथे निर्मित झालेली पितळी व तांब्याची भांडी निर्यात केली जातात. विशेषत: लग्नसराईच्या हंगामात या वस्तूंची मागणी असते. या राज्यांमध्ये नववधूला तांबे पितळेची भांडी भेट देण्याची प्रथा आहे. प्लॅस्टिक आणि स्टीलच्या वस्तू खराब झाल्यानंतर भंगारातही जात नाही. तुलनेत धातूच्या भांड्यांना मोडीतही चांगली किंमत मिळते. परंतु, यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे वादळ दाखल झाले. परंतु, संचारबंदी व लॉकडाऊन घोषित झाल्यापासून सद्यस्थितीत कारखान्यांना कुलूप लागले आहे.

कारखान्यात प्रत्यक्ष काम करणारे कामगार व व्यवसायाशी निगडित असलेल्या दहा हजारावर लोकांना बेरोजगारीमुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांचा माल प्रत्येक मोठ्या उद्योजकांकडे पडून आहे. त्यासाठी गुंतविलेले भांडवलसुद्धा निघाले नाही. दिवाळीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल, तेव्हा आता पुन्हा कारखाने सुरू करून करायचे काय? अशी अनेकांची भूमिका आहे. दुसरीकडे प्रशिक्षित कारागीरसुद्धा आपल्या राज्यात परतले आहेत. एकूणच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कामगारांची साखळीसुद्धा खंडित झाली आहे. त्यामुळे उद्योजक टाळेबंदीतून सवलत प्राप्त होऊनही सध्या कारखाने सुरू करण्यास उदासीन असल्याची प्रतिक्रिया एका कारखानदाराने व्यक्त केली. याशिवाय ट्रान्सपोर्टींगला परवानगी असली तरी परप्रांतातील व्यापारीसुद्धा सध्या लग्नहंगाम बुडाल्याने माल मागविण्यास इच्छुक नाहीत. अनेकांवर आधीच उधारी असताना पुन्हा माल पाठविण्याची जोखीम पत्करण्यास उद्योजक तयार नाहीत. या सर्व बाबींचा परिणाम असंबंधरित्या कामगार व मजूर घटकांवर पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कारखाना चालविताना सिमित कामगार, त्यांचे आरोग्य व स्वच्छतेची सुरक्षा, काही प्रादुर्भाव झाल्यास उद्योजकांनाच जबाबदार धरले जाणार आहे. यामुळेही तूर्तास उद्योजकांनी सावध भूमिका घेतली आहे.

शिथिलता मिळूनही कारखाने बंदच

जिल्हाधिकारी यांनी शिथिलता प्रदान करण्यासंदर्भात नुकत्याच जारी केलेल्या एका सुधारित आदेशाप्रमाणे पितळ उद्योग सुरू करण्यास काही नियम व अटींच्या आधीन राहून परवानगी दिली आहे. परंतु, अद्याप एकही कारखाना सुरू झालेला नाही. मार्च ते जून या लग्नसराईच्या हंगामात पितळी भांड्यांना मागणी असते. परंतु, कोरोनामुळे लग्नसोहळ्यांवरच बंदी असल्याने निर्यात ठप्प झाली आहे.

जागतिक संकट
कोरोनामुळे डळमळीत झालेली अर्थव्यवस्था हे जागतिक संकट आहे. त्यामुळे साहाजिकच पितळ उद्योगालासुद्धा त्याची झळ बसली आहे. येणाऱ्या काही महिन्यांपर्यंत ही समस्या असणार आहे. तेव्हा या परिस्थितीला घाबरून न जाता धैर्याने तोंड द्यावे. या क्षेत्रातील कामगार वर्गाची फरपट होऊ नये, यासाठी सर्व पितळ उद्योजकांनी त्यांची काळजी घ्यावी. सरकारच्या आवाहनाला साद देत योग्य ती दक्षता, सुरक्षा व उपाययोजना करून उद्योग सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.
पंकज सारडा, अध्यक्ष, मेटल असोसिएशन, भंडारा.

रोजगार हिरावला
पावसाळ्यातील तीन महिने वगळता उर्वरित 8 महिने कारखान्यात रोजगार उपलब्ध होत होता. परंतु, ऐन कामाच्या हंगामात कोरोनामुळे कारखान्यांना कुलूप लागले. या महिन्यात मालकांनी अन्नधान्य पुरवून आर्थिक मदत केली. परंतु, पुढच्या महिन्यात कारखाने चालू होण्याचे चिन्ह नसल्याने आमचा रोजगार हिरावला जाणार आहे.
-राजू तरारे, कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT