corona effect on bhulabai celebration in vidarbha  
विदर्भ

तोंडाला मास्क लाव गं सूनबाई, मग जा आपुल्या माहेरा!

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : आज आश्विन पौर्णिमा अर्थातच कोजागरी पौर्णिमा. यावेळी आठवण येते विदर्भातील भुलाबाईची अन्‌ तिच्या भुलोजीची. हे दोघे म्हणजे शंकरपार्वती. त्यांची मातीची, चटक रंगात रंगवलेली जोडमूर्ती, त्यात मातेच्या मांडीवर बसलेला बाळ गणेश, मूर्ती घरी येताच मुलींच्या भुलाबाईच्या गाण्यांना मोठी रंगत येत असे.

'पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा'

या गाण्याने सुरुवात झाली की, खिरापतीच्या गाण्यापर्यंत भुलाबाईच्या सुसाट गाण्यांची विदर्भ एक्‍स्प्रेस धावत असे. सुरुवातीला एक महिना चालणारा हा भुलाबाईचा सोहळा अलीकडे पाच दिवसांवर व आता तर एक दिवसावर सीमित झाला आहे. किंबहुना, कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. तथापि, गावखेड्यात भुलाबाईची संस्कृती जपण्याचा थोडाफार प्रयत्न दिसून येतो.

खरे पाहता, भुलाबाईची गाणी ही मुलींवरील संस्कार व संसाराची उत्स्फूर्त, अशी परंपरागत गाणी आहेत. या लोककाव्यामध्ये माहेर-सासर, चाली-रीती, व्यवहार-नीती अशा सर्वच मूल्यांचा उलगडा होतो. विशेष म्हणजे ही गाणी लहान मुलींपासून ते आजीपर्यंत तोंडपाठ असत. घरातील लहान मुलींना भुलाबाईच्या गाण्यांचे खूप वेड असते. मैत्रिणींसोबत घरोघरी भुलाबाईची गाणी म्हणताना दम लागेपर्यंत उंच आवाजातील गाण्यांचा आवाज अंगण दणाणून सोडत असे.

'आपे दुधी तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई
साखळ्यांचा जोड
कशी लेऊ दादा
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा'

भुलाबाईच्या प्रत्येक गाण्यात सासर व माहेर यातील गोडवा, कडवट अनुभव त्यांची सुंदर गुंफण पाहावयास मिळते.

"नंदा भावजया दोघी जणी
दोघी जणी...
घरात नाही तिसरं कोणी
तिसरं कोणी
शिक्‍यातलं लोणी खाल्लं कोणी
तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी
आता माझे दादा येतील गं येतील गं
दादाच्या मांडीवर बसील गं बसील गं
दादाची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव काठी
घरादाराची लक्ष्मी मोठी"

भुलाबाईच्या गाण्यांमधून नंदा-भावजया यांच्यातील 'मधुर' संबंधांवर नेमके भाष्य केलेले आढळते.

"गाई गाई दूध दे
दूध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
गोंडे माझ्या राजाला
तेच गोंडे लेऊ सासरला जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे" 

माहेरी आलेल्या मुलीला सासरला निघताना माहेर सोडवत नाही व सासरचा दुरावाही सहन होत नाही.

"नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेलं
बाई तोडून नेलं
सईच्या अंगणात टाकून दिलं
बाई टाकून दिलं"

ही गाणी जाताना मुलींमध्ये प्रचंड उत्साह असतो. सासर-माहेरच्या तुलना करताना संसाराचे रुपडे अधिकच गडद झालेले दिसते.

"कारल्याची बी पेर गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासूबाई
आता तरी धाडा ना धाडा ना"

या गाण्यातून सासू-सुनेच्या नात्याची वीण अधिक घट्ट झालेली दिसते. आजच्या कोरोनाचा प्रभावही सासूवर पडलेला दिसतो, तो असा-

"तोंडाला मास्क लाव गं सूनबाई
मग जा आपुल्या माहेरा, माहेरा"

गुलाबाच्या डोहाळ्यापासून, तर तिच्या बाळापर्यंत या गाण्यांमधून संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते.

"भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई
नेऊन टाका पलंगावरी 
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी"

शेवटच्या टप्प्यातील अडकित जाऊ... ते गीत गाताना लहान मुली अधिक मोठ्या आवाजात गाऊ लागतात.

"अडकित जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता"

खिरापतीची वेळ झालेली असते. अशावेळी लहान भाऊरायाही खिरापतीची मजा लुटताना दिसतात.

"बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा"

एकंदरीतच हा वैदर्भीय सोहळा अविट नात्यांचा गोडवा गातो, हेच खरे!

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT