चंद्रपूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या गुरवारपासून चंद्रपूर शहरात चार दिवस जनता कर्फ्यू लावला जाणार आहे. यासंदर्भात महानगरपालिकेत बैठक पार पडली. परंतु मनपाचे उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनाच कोरोनाचे फारसे गांभीर्य नसल्याचे आता समोर आले.
आपला वाढदिवस पावडे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवीत साजरा केला. त्याचे छायाचित्रही समाजमाध्यमावरही टाकले. या छायाचित्रावर आता नेटकरी तुटून पडले आहे. सामान्यांना कायदा. यांना सूट.. हे सुधारणार कधी? असा सवाल ते करीत आहे.
जिल्हाभरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. चार हजारांवर कोरोनाची रुग्णसंख्या गेली आहे. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासमोर प्रशासन पुरते हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता जनता कर्फ्यूचा उपाय समोर आला आहे. यासंदर्भात सोमवारला व्यापारी असोसिएशन आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक मनपात पार पडली.
कोरोना संसर्ग वाढत आहे. सामाजिक अंतर राखणे, मास्क आणि सॅनिटायझर हीच सध्या कोरोनावर मात करण्याची औषध असल्याचे सर्वांचे एकमत झाले. याच बैठकीत जनता कर्फ्यूवरही शिक्कामोर्तब करण्यात आले. निर्धारित वेळेत दुकान बंद केली नाहीतर कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्यांवरही दंड ठोठावला जातो. परंतु शहराचे उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापतिपद पावडे यांना उपरोक्त नियमातून सूट देण्यात आली का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पावडे यांचा मंगळवारला वाढदिवस होता.
त्यांचा वाढदिवस साजरा करायला कुणालाही हरकत नाही. तो त्यांचा अधिकारच आहे. परंतु तो साजरा करताना शहरवासींसाठी मनपाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचना आपणच पायदळी तुडवीत असल्याचे भान पावडे यांना राहिले नाही. एकीकडे मनपा मास्क न लावलेल्या लोकांवर कारवाई करीत आहे. दुसरीकडे उपमहापौर मास्क आणि सामाजिक अंतर न पाळता लोकांची गळा भेट घेत आहे.
त्यांच्या वाढदिवसाच्या उत्सवाचे छायाचित्र आता समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊसही पडत आहे. यापूर्वीही भाजपच्या उत्साही पदाधिकाऱ्यांनी हाच प्रकार केला होता. त्यात राहुल पावडे यांचाही समावेश होता. आता तर पावडे एक पाऊल पुढे गेले. एकीकडे कोरोनाची साखळी तुटावी यासाठी नागरिकांना प्रशासन घरीच राहा सुरक्षित रहा ,असे आवाहन करीत आहे. याउलट पावडे यांची वर्तणूक आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.