नागपूर : शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरले आहे. रस्ते बांधकामाच्या दर्जाचे पितळ काही वर्षातच उघडे पडत आहे. शहराच्या हद्दीतील मानेवाडा चौक ते ओंकारनगरपर्यंतच्या सिमेंट रस्त्यात मध्यभागी लावण्यात आलेले आयब्लॉक जमिनीत घुसत आहेत. परिणामी मोठ्या ट्रेलरपासून ते कारपर्यंत सर्वच वाहनांवर अपघाताची टांगती तलवार आहे.
वर्धा मार्ग ते भंडारा मार्गाला जोडलेल्या रिंग रोडचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. वजनी साहित्य वाहून नेणारे ट्रेलर, ट्रक, ट्रॅक्टर, बससह असंख्य कार, दुचाकी सतत या रस्त्यावर ये-जा करीत असते. या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. अद्यापही काही कामे सुरू आहेत. मानेवाडा चौक ते ओंकारनगरपर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी आयब्लॉक लावण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेले हे आयब्लॉक आता जमिनीत घुसत आहेत.
सिमेंट रस्त्याला जोडून असलेला आयब्लॉकचा भाग खड्ड्याप्रमाणे दिवसेंदिवस खोल होताना दिसून येत आहे. त्यामुळे वेगाने येणारी चारचाकी वाहने येथे उसळतात. नेहमी या रस्त्याने ये-जा करणारे हा खड्डा टाळून बाजूने वाहने काढतात. परंतु, आयब्लॉक लावलेला भाग खोल गेल्याबाबत अनभिज्ञ असलेल्यांची वाहने उसळून कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे.
ओव्हरलोड ट्रकमुळे हे आयब्लॉक आणखी खोल जात आहेत. एवढेच नव्हे आयब्लॉक बसविलेल्या पंधरा फूट भागाला तडेही गेले असून हा निकृष्ट बांधकामाचा उत्तम नमुना असल्याचे दिसून येत आहे.
मानेवाडा चौकातून ओंकारनगरकडे जाताना अनेकजण चौकातून वेगाने वाहने काढतात. मात्र, चौकापासून दोनशे मीटर अंतरावर अचानक हा खड्डा दिसल्याने अनेकजण वेगवान वाहने बाजूने वळविण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. एखादेवेळी वाहनधारकांचा ताबा सुटल्यास वाहन बाजूच्याच पुलाखाली किंवा एखाद्याच्या अंगावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वेगाने असलेले ट्रेलर या खड्ड्यातून उसळल्याने त्यातील वजनी साहित्य मागे असलेल्या वाहनावर किंवा वाहनधारकांवर पडण्याची भीती परिसरातील व्यावसायिकांनी व्यक्त केली. ट्रेलरमधून लोखंडी सळाखी, कधी कंटेनर व इतर वाहनेही वाहून नेली जातात. या खड्ड्यामुळे बसणाऱ्या धक्क्यामुळे ट्रेलरमधील लोखंडी सळाखी, कंटेनर व वाहून नेणाऱ्या इतर वाहनांची पकड सैल होऊन ते पडल्यास जीवहानीची शक्यता, काहींनी व्यक्त केली.
सात वर्षांपूर्वी नरेंद्रनगर येथे रस्त्यांवर पडलेल्या अशाच खड्ड्यातून ट्रेलर उसळले होते. ट्रेलरवर असलेले कंटनेर बाजूने जात असलेल्या एका कारवर पडले. परिणामी कारचे नुकसान झालेच, शिवाय एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले होते. मानेवाडा चौक ते ओंकारनगर रस्त्यांवरही आयब्लॉकच्या खड्ड्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बळावली आहे.
या रस्त्यावर यापूर्वी एसएनडीएलने अनेकदा खोदकाम केले. विनापरवानगी खोदकाम करून त्याचे पूर्ण भरण न केल्याने
आयब्लॉक सैल झाले. यासंदर्भात एसएनडीएल कार्यरत असताना अनेकदा नोटीस दिली. परंतु रीतसर रस्त्याचे पुनर्भरण करण्यात आले नाही. महापालिकेकडे हा रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ सूत्राने सांगितले आहे.
सहा महिन्यापूर्वी या खड्ड्यातून उसळलेल्या दुचाकीमुळे त्यावरील एका महिलेला प्राण गमवावा लागला होता. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सा. बां. विभागाने या खड्ड्याकडे सध्या दुर्लक्षच केले आहे. मनपा आयुक्तांना याबाबत फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.