नागपूर : "आज्या, आई-बाबा तं गावलेच अटकले. त्यायचा थंब कुठून आणणार. माझ्या थंबवर नाही भेटणार का गहू-तांदूळ? भात निस्ताच खायाचा का? भाजी नाही भेटत का कंटोलात?'' तिसरीतील महिमाच्या या प्रश्नांवर तिचे आजोबा परसराम यांच्याकडे उत्तर नव्हते.
अचानक "लॉकडाउन' झाले आणि मजुरीसाठी गेलेले महिमाचे वडील नरेन आणि आई सिरोमा राजपूत नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील धोत्रा-मोहदी येथेच अडकले. त्यांची चार मुले काटोल तालुक्यातील मसखापरा गावात म्हाताऱ्या आजी-आजोबांसोबत आहेत. त्यांच्या घरातले धान्य संपत आले. रेशनच्या दुकानात गेले तर "थंब नाही त्यामुळे गहू-तांदूळ काहीच मिळणार नाही', असे सांगण्यात आले. "आता या चार लेकरांच्या तोंडात घास कसा टाकावं?' असा प्रश्न नरेनचे वडील परसराम रामेश्वर राजपूत यांना पडला आहे.
मसखापरा गावालगत 250 लोकवस्तीचा पारधी बेडा आहे. सर्वच कुटुंबांकडे आबादीची शेतजमीन आहे. परंतु, शेती आतबट्ट्याचा व्यवहार. हाती काहीच लागत नाही. त्यामुळे लोक मजुरीला जातात. धोत्रा-मोहदीला रस्ते बांधकामासाठी ठेकेदाराला मजूर हवे होते. नरेनसह कुलसनबाई, हिरोकुमार, सर्वन, राजलाल, रूपराव, संजयलाल, अमिन मजुरीसाठी गेले. कोरोनामुळे अचानक "लॉकडाउन'चा निर्णय घेतला गेला आणि ते तिथेच अडकले. या सर्वांची कुटुंबे मसखापरा बेड्यावरच आहेत. रेशनसाठी "बायोमेट्रिक' प्रणाली आहे. त्यामुळे बोटाचे ठसे घेतल्याशिवाय रेशन मिळत नाही.
येथील सामाजिक कार्यकर्ते विजय राजपूत यांनी या बेड्यातील आपबीती कथन केली. ""सव्वाशे व्होटिंग आहे बेड्यावर. या बेड्याचे महत्त्व व्होटिंगपुरतेच. इलेक्शन नसलं का कोणी ढुंकूनही पाहात नाही. हातावर आणून पानावर खाणारे लोक आहोत आमी. लय वर्षांपासून वावरं उठवले लोकायनं. एसडीओकडे सहा वर्षांपासून पट्ट्यासाठी खेटा मारणं सुरू आहे. सात-बारा नावानं नाही तं कर्ज बी घेता येत नाही. नुकसान झालं तं भरपाईबी भेटत नाही. शेती परवडत नायी म्हणून हातजमुरीले जातो. रस्त्याचं काम भेटलं तं गिट्टी फोडाले, रेती टाकाले, चुरा फेकाले, डांबर ओताले जातो.
पह्यले पारधी लोकायचा दारूचा धंदा होता. आमच्या बेड्यावर आमी तो बंद केला. त्या धंद्यातून पैसे भेटे तं भागे कसंबसं. आता तर बिकट परिस्थिती झाली आहे. सारे लोकं घरात बंद झाले. धान्य सरलं. एका-एका घरात खाणारे लय तोंड आहेत. कंट्रोलच्या धान्यात भागत नाही. कार्ड नसणाऱ्याले तं थोडं थोडकंच देल्लं. सांगा आमी आता जगावं कसं?''
"व्होटिंग'च्या टायमाले लय लिडर फिरते. आता चंद्रशेखरभाऊबी नाही आले. सलीलभाऊले फोन केला होता. तर थे हो म्हणाले. आमचा बेडा आता त्यायचीच वाट पाहात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.