नागपूर : महापालिकेच्या कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राला पुराचा चांगलाच फटका बसला. पुरामुळे गेल्या तेरा वर्षात प्रथमच कन्हान नदीची पातळी २८४ मीटरपर्यंत गेली होती. आजही पूरस्थिती कायम असून नदीतील पाण्याची पातळी केवळ सहा मीटरने कमी झाली. पुरामुळे पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असून, जलशुद्धीकरण केंद्र निम्म्या क्षमतेने काम करीत आहे. परिणामी शहरातील काही भागातील नागरिकांना पुढील चार ते पाच दिवस पाणी वापरात काटकसर करावी लागणार आहे.
कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कच्च्या पाण्याची विहीर नदीमध्ये आहे. या विहिरीवरून नदीतील पाण्याची निश्चित पातळी दर्शविली जाते. मध्यप्रदेशात कन्हान नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. परिणामी कन्हान नदी दुथडी भरून वाहिली. त्यात तोतलाडोह धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातील पाणीही कन्हान नदीत सोडण्यात आले. तोतलाडोह धरणाचे पूर्ण दरवाजे खुले करण्यात आल्याने कन्हान नदीने गेल्या दोन दशकापूर्वी आलेल्या पुराचाही विक्रम मागे टाकला.
त्यात कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीवरून नदीतील पाण्याची पातळी २८४ मीटरपर्यंत गेली होती. नदीतील पाण्याने ही पातळी तेरा वर्षानंतर गाठल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने नमुद केले. रविवारी यात केवळ सहा मीटरने घट झाली. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीतून आवश्यक कच्च्या पाण्याचा साठा गाळामुळे घेणे शक्य होणार नाही. परिणामी शहरातील आशीनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व नेहरूनगर झोनमधील शेकडो वस्त्यांंना मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे.
आशीनगर झोनमध्ये प्रभाग २, ३, ६ व ७, सतरंजीपुरा झोनमध्ये ५, २०, २१, लकडगंज झोनमध्ये ४, २३, २४, २५ तर नेहरूनगर झोनमध्ये २६, २७, २८, ३० या प्रभागांचा समावेश आहे. या एकूण १५ प्रभागात मर्यादित पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाण्याच्या वापरात काटकसर करावी लागणार आहे. आजपासूनच या प्रभागांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी ओरड सुरू झाली. काही ठिकाणी महापालिकेने टॅंकरनेही पाणीपुरवठा केला. पुढील चार ते पाच दिवस अशीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी वापरताना काटकसर करावी लागणार आहे.
पुरामुळे जलशुद्धीकरण केंद्राची सध्याची क्षमता, नदीला आलेला पूर याबाबत पाहणी करण्यासाठी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष व जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक भगवान मेंढे यांनी रविवारी दौरा केला. यावेळी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद गणवीर उपस्थित होते. स्थायी समिती अध्यक्षांनी आवश्यक उपाययोजना करून चारही झोनचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले.
पाणीपुरवठा खंडित राहणार
कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे या चारही झोनचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पुरामुळे नदीलगतची अनेक झाडे कोलमडली. वाहून आलेली झाडे आणि कचरा जलशुध्दीकरण केंद्र परिसरात अडकल्याने पम्पिंग करणे अशक्य झाले आहे. अडकलेली झाडे आणि संपूर्ण कचरा हटविण्यासाठी पोकलेन लावणेही शक्य नाही. त्यामुळे उद्या सोमवारी (ता. ३१) सुद्धा हा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
पिंटू झलके, सभापती, स्थायी समिती व जलप्रदाय समिती, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.