नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनाबाधित मृताच्या प्लॅस्टिकच्या आवरणाचे निर्जंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने अतिनील किरणावर आधारित एक उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे त्यातून होणारा संक्रमणाचा धोका टाळता येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे अंत्यसंस्काराला फक्त सरकारी कर्मचारी किंवा समाजसेवक अथवा तीन ते चार व्यक्ती करीत आहेत. अचानक कोरोनामुळे मृत्यू होतो तेव्हा संबंधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला कोणीच उपस्थित राहत नाही. यामुळे समाजात विषमता वाढत चाललेली आहे. कोरोनाबाधित मृत व्यक्तीजवळ जाणे योग्य नाही. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
यावर उपाय म्हणून भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय जानराव ढोबळे, दादासाहेब बालपांडे कॉलेजचे (फार्मसी) प्राध्यापक डॉ. नीलेश महाजन व सेवादल महिला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. निरूपमा संजय ढोबळे यांनी एकत्र येऊन अतिनील किरणावर आधारीत एक उपकरण तयार केले आहे. उपकरणाद्वारे मृत कोरोनाबाधित व्यक्तीला ज्या प्लॅस्टिकच्या आवरणात ठेवले जाते त्याचे निर्जंतुकीकरण करून पूर्णपणे कोरोना व्हायरस फ्री होण्याचा दावा करण्यात आला आहे.
यामुळे त्या मृतदेहाजवळ नातेवाईक, मित्र ठराविक अंतरापर्यंत जाऊन नमस्कार करू शकतात तसेच फुले अर्पण करू शकतात. एवढेच नव्हे तर जे व्यक्ती कर्तव्याने अंत्यसंस्कारासाठी पुढे येतात त्यांचा सुद्धा कोरोनापासून बचाव होतो. हे उपकरण त्यांनी डिझाईन करून पेटंटसुद्घा प्रकाशित केले आहे. उपकरणाची निर्मिती अमरावती येथील निशाद इंडस्ट्री येथे झाली आहे. हे उपकरण नागपूर येथील मेडिकलला दिले आहे. जेणेकरून याचा योग्य वापर होईल.
कोरोनाबाधित मृतदेहावरील प्लॅस्टिक आवरणाचे निर्जंतुकीकरण अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानाचा वापर करून किमान पाच मिनिटात होते. मृत व्यक्तीच्या प्लॅस्टिक आवरणावर किरणे पडल्यामुळे कोणत्याच प्रकारची हानी होत नाही. मृत शरीर उपकरणातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा उपकरणाचे निर्जंतुकीकरण केले जाते. यापूर्वी डॉ. संजय ढोबळे यांनी सात उपकरणांची निर्मिती करून त्यांचे पेटंट प्रकाशित केले आहे. हे त्यांचे आठवे पेटंट आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.