नागपूर : मृत पावलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यावरून मृताच्या नातेवाइकांनी अहवाल फेटाळून लावत मेयो रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे आधीच तणावात असलेल्या डॉक्टरांनीही संताप व्यक्त केला.
कुशीनगर परिसरात आत्याकडे राहणारा तरुण हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. त्याला दारुचेही व्यसन होते. शनिवारी तो मद्य प्राशन करून घरी आला. घरी प्रसाधनगृहात गेल्यानंतर तो पाय घसरून पडला. नातेवाइकांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डाक्टरांच्या निदर्शनास आले. दरम्यान शासनाच्या नवीन निकषानुसार त्याचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत तरुणाचा मृतदेह चार पदरी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून शवागरात सुरक्षित ठेवण्यात आला.
आज सकाळी या तरुणाला कोरोना असल्याचा अहवाल आल्यावर नातेवाइकांना सूचना देत महापालिकेला कळवण्यात आले. या प्रसंगी मृतदेह नातेवाइकांना देण्यास मेयो प्रशासनाने नकार देत महापालिकेचे अधिकारी आल्यावरच नियमानुसार प्रक्रिया करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर नातेवाइकांनी संताप व्यक्त करत तरुणाला साधी सर्दीही नसताना त्याला कोरोना कसा? असा प्रश्न उपस्थित केला. अहवालच चुकीचा असल्याचे सांगत नातेवाइकांनी गोंधळ घालणे सुरू केले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी बंदोबस्त वाढवल्याने मोठी अनुचित घटना टाळली. दरम्यान शहरात बाधितांची संख्या वाढल्याने मेडिकल, मेयो रुग्णालयावर कामाचा ताण वाढत आहे. या कामाच्या भरात मोठ्या संख्येने डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारीही बाधित होत आहे. त्यानंतरही नातेवाईक असे वागत असल्याने डॉक्टरांमध्ये प्रचंड संताप वाढत आहे. त्यामुळे आता नातेवाइकांनी जबाबदरीने वागण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी खुद्द पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपुरात काही प्रमाणात समूह संसर्ग झाल्याचे मान्य केले होते. त्यामुळे कुणीही दगावलेला व्यक्ती बाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर असा गोंधळ घालणे योग्य नसल्याचे मेयोच्या एका डॉक्टरने सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे रविवारी मेयो रुग्णालयात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी अचानक पोचले. या प्रसंगी मेयोच्या अधिकाऱ्यांनी बाधित रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेल्या गोंधळाची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मेयोत बंदोबस्त वाढवण्यासह गर्दी असलेल्या कोव्हिडं रुग्णालये इतर ठिकारी सुरक्षा कठडे लावण्याचा सूचना केल्या.
(संपादन : प्रशांत राॅय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.