नागपूर ः मागील सरकारच्या कार्यकाळात कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने नवीन वीजजोडण्या देणे बंद करण्यात आले होते. परिणामी कृषिपंपांसाठी अनधिकृत वीजवापर वाढला असून रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले. रोहित्र नादुरुस्त होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने सर्व्हेक्षण केले जाणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यासंदर्भात महावितरणला आदेश दिले आहेत.
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप पीक हातचे गेले असले तरीही न डगमगता शेतकरी रब्बी पिकाच्या मागे लागला आहे. पण, रोहित्रात बिघाड येऊन ते बंद पडत आहेत. अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. सरकारने ही बाब लक्षात घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
राऊत यांनी शुक्रवारी रब्बी हंगामातील वीजपुरवठ्याबाबत आढावा घेतला. सध्या रब्बी हंगाम महत्त्वाच्या टप्प्यात असून येत्या तीन महिन्यांत सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण विविध उपाययोजना करून रोखण्यात यावे तसेच रोहित्र, ऑईल आणि इतर साहित्य पुरेशा प्रमाणात अतिरिक्त स्वरूपात ठेवण्यात यावे व त्याचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
सोबतच प्रादेशिक कार्यालयस्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण, दुरुस्ती किंवा बदलण्यात आलेले रोहित्र, ऑईलचा पुरवठा आदींची संकलित माहिती दर आठवड्यात ऊर्जामंत्रालय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणच्या मुख्यालयात पाठविण्यात येणार आहे.
अहवाल ३१ पर्यंत सादर करणार
राज्य शासनाने नुकतेच नवीन कृषिपंप धोरण जाहीर केले असून त्याप्रमाणे लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांसह सौरद्वारे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याच्या दृष्टीने आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत रोहित्रांचे तातडीने सर्व्हेक्षण पूर्ण करीत ते नादुरुस्त होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्याचा अहवाल ऊर्जा विभागाला सादर करण्यात येणार आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.