नागपूर : अंकगणित(Arithmetic) म्हटले की, भल्याभल्यांच्या हृदयात धडकी भरते; अंगावर काटे येतात. मात्र काही व्यक्ती असेही असतात जे या कठीण विषयाला अतिशय सोपे करून विद्यार्थी व पर्यायाने समाजाचे भले करतात. अंकगणितज्ज्ञ सुभाष दाभिरकर असेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. दैवी देणगी लाभलेले दाभिरकर चुटकीसरशी आकडेमोड करतात. जन्मतारखेवरून क्षणार्धात वार (दिवस) सांगतात. या कलागुणांमुळे ते वरुड तालुक्यात आकड्यांचे जादूगर व ‘मेमरी मास्टर’ म्हणून लोकप्रिय ठरले आहेत. त्यांना तब्बल तीन हजार वर्षांचे कॅलेंडर व दोन हजारांवर मोबाईल नंबर्स तोंडपाठ आहेत.
धनी असलेल्या दाभिरकर यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती. आकडेमोड करीत असताना अल्पावधीतच ते या विषयात तज्ज्ञ बनले. तल्लख बुद्धी व दांडग्या स्मरणशक्तीमुळे मोठमोठे आकडे त्यांच्या मुखोद्गत होऊ लागले. कोणतीही जन्मतारीख सांगितल्यास अवघ्या काही सेकंदात ते त्या व्यक्तीचा जन्मदिवस बिनचूक सांगतात. तीन हजार वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) आणि जवळपास दोन हजार मोबाईल नंबर्स त्यांच्या जिभेवर आहेत. शिवाय देशभरातील विविध शहरांचे एसटीडी कोडही त्यांना तोंडपाठ आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मोबाईल नंबर उलटे सांगण्यातही त्यांचा हातखंडा आहे. या गुणवैशिष्ट्यांमुळे ते पंचक्रोशीत लोकप्रिय व चर्चेत आहेत. त्यांनी विशिष्ट डिजिटल सरकुलर पद्धती विकसित केली आहे. दररोज तासनतास सराव करतात. त्यामुळेच हे सर्व शक्य होत असल्याचे दाभिरकर म्हणाले. अनेक विक्रमांचे धनी असलेले दाभिरकर यांनी लवकरच प्रतिष्ठेच्या गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
‘क्षणार्धात गणित’चा विद्यार्थ्यांना फायदा
महात्मा फुले महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक डॉ. रमेश वाढबुद्धे यांना गुरू मानणारे ४३ वर्षीय दाभिरकर मुळात ग्रंथपाल असून, फावल्या वेळेत शिकवणी वर्ग घेतात. याशिवाय विविध बुक स्टॉल्सवर ते पुस्तकेही विकतात. दाभिरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘क्षणार्धात गणित’ हे पुस्तक लिहिले असून, त्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. या पुस्तकाच्या आतापर्यंत एक लाख प्रती विकल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांमध्ये देतात व्याख्याने
एमए व एमबीए शिक्षण घेतलेले दाभिरकर यांनी आतापर्यंत असंख्य शाळा व महाविद्यालयांमध्ये गणितावर व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करीत त्यांना गणितासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांना ठिकठिकाणी आमंत्रित केले जाते. गणिताच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतही सहभागी होण्याची त्यांना संधी मिळालेली आहे.
लंडनला पाठविले संशोधन
दाभिरकर यांनी २०११ मध्ये भूमितीतील ‘पाय’ची अचूक व्हॅल्यू (किंमत) शोधून काढली होती. काही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी ते संशोधन नंतर इंग्लंडमधील रॉयल सोसायटी ऑफ लंडनमध्ये पाठविले होते. त्यावर संशोधन सुरू असून, मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात देशभरातील जाणकारांनी दाभिरकर यांना पत्र पाठवून, कठीण गणिताची उकल केल्याबद्दल कौतुक केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.