नागपूर : पत्नीच्या विरहात पतीने आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत घडली. यासह शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळले.
एमआयडीसी हद्दीत पंचशीलनगर, हिंगणा रोड येथे राहणारे प्रमोद किशोरीलाल महतो (२६) यांनी घरी छताच्या बल्लीला नायलॉन दोरीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. सफाई कामगार असणाऱ्या प्रमोदच्या पत्नीने महिनाभरापूर्वी घरगुती कारणावरून आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच तो नैराश्यात होता. गिट्टीखदान हद्दीत संत जगनाडे सोसायटी, दाभा येथील रहिवासी अशोक सखाराम नितनवरे (६८) यांनी घरी सिलिंग फॅनला शर्टने बांधून गळफास लावला.
गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. इमामवाडा हद्दीतील रामबाग, मिलिंद बुद्धविहाराजवळील रहिवासी अनिल हरिभाऊ सोमकुंवर (४८) रा. यांनी गुरुवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारात घरी छताच्या लोखंडी हूकला दोरीने बांधून गळफास लावला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खाली उतरवून मेडिकल रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले. तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला.
भरलेल्या सिलेंडरमधील गॅस चोरण्यासह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या भावंडांना बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून भरलेले २६ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. रामविलास ऊर्फ रमेश बिष्णोई (२४) व श्रवण बिष्णोई (२५) दोन्ही रा. आनंद विहार, राधाकृष्णनगर, भवानी सभागृहामागे अशी आरोपी भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, ते डिलेव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून, घरोघरी सिलेंडर पोहोचवून देण्याचे काम करतात. भरलेल्या सिलेंडरमधील गॅस चोरून रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायची आणि त्या सिलेंडरची ब्लॅकमध्ये विक्री करायची असा उपद्व्याप ते करायचे. एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरणे धोकादायक आहे. याची माहिती असतानाही ते भर वसाहतीत गॅसचोरी करीत होते. ही बाब गस्तीवरील पोलिसांच्या लक्षात आली. यावेळी आरोपींकडे २६ भरलेले व दोन रिकामे सिलेंडर असलेले ॲपे वाहन आढळून आले. रामविलासकडून ४ हजार ५९० रुपये रोख आढळले. आरोपींकडून दोन लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तडीपार करण्यात आल्यानंतरही सर्रासपणे शहरात वावरणारा कुख्यात गुन्हेगार मक्का ऊर्फ संदीप कांबळे (२८) याला बेलतरोडी पोलिसांनी खापरी येथील जबलपूर-हैदराबद हायवे परिसरातून सिनेस्टाईल पाठलाग करीत अटक केली. पोलिस पथक गस्त घालत असताना मक्का हायवेवर दुचाकी घेऊन फिरत असल्याचे दिसले. पोलिस आल्याची चाहूल लागताच तो गाडीसह पळून जाऊ लागला. पोलिसांनी घेराव घालून त्याला शिताफीने अटक केली. अंगझडतीत त्याने कंबरेत खोचून ठेवलेला चाकू आढळून आला. मनाई आदेशाचे उल्लंघन व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला अटक केली.
शहरातील विविध घटनांमध्ये तिघांनी प्राण गमावले. अंबाझरी, प्रतापनगर, लकडगंज हद्दीत या घटना घडल्या. गिट्टीखदान येथील रहिवासी सतीश सप्रे (५२) यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी फुटाळा तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. संघ बिल्डिंगजवळ, महाल येथील रहिवासी वृंदा गायधने (६३) या १३ फेब्रुवारी रोजी सकाळी मुलगा मनीष याच्या दुचाकीवरून हिंगणा येथून घरी परतत होत्या. सुभाषनगर मोट्रोस्टेशनजवळ ऑटोने घडक दिल्याने वृंदा दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मिनीमातानगर येथील रहिवासी धनराज श्रीवास (२८) लकडगंज हद्दीतील हल्दीराम कंपनीमागील नाल्यावरील पाईपवरून जात असताना पाय घसरून नाल्यात पडला. गाळात फसून त्याचा मृत्यू झाला. तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.