नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा तंतोतंत खरा ठरला. शुक्रवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाने उपराजधानीला जोरदार तडाखा दिला. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, बत्तीही गुल झाली. काही भागांत गारादेखील पडल्या.
दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ चालल्यानंतर सायंकाळी आठच्या सुमारास अचानक धूळमिश्रित वादळ सुटले. अर्ध्या -पाऊण तासानंतर विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. रामदासपेठ, धंतोलीसह शहरातील अनेक भागांत जोरदार सरी बरसल्या. जवळपास तास-दीड तास पावसाच्या सरींवर सरी सुरू होत्या.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस थांबेपर्यंत आडोशाचा आधार घ्यावा लागला. छत्र्या व रेनकोट नसल्याने अनेकांना ओल्या अंगाने घर गाठावे लागले. हिंगण्यासह काही भागांत बोराएवढ्या गारा पडल्याचे वृत्त आहे.
वादळामुळे जागोजागी झाडेही उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडे व फांद्या रस्त्यावर आडव्या झाल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सिव्हिल लाइन्ससह काही भागांत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना बराच वेळपर्यंत अंधारात राहावे लागले.
वादळामुळे अनेकांना मनस्ताप झाला असला तरी, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासाही मिळाला. ढगाळ वातावरण आणखी चोविस तास राहणार असून, शनिवारनंतर पुन्हा उन्हाचे तीव्र चटके जाणवणार आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.