नागपूर : प्रेमासाठी घराचा उंबरठा ओलांडला. लग्न झाले. मात्र, तिसऱ्याच दिवशी प्रियकराला पोलिसांनी बेड्या घातल्या. घरी परतण्याचा मार्ग बंद झाला. ऑटोचालकाने बसस्थानकावर सोडण्याऐवजी गंगा जमनात आणले. पोटाची भूक भागवण्यासाठी शरीराचे लचके तुटताना बघू लागले. नियतीने आयुष्यंच उद्ध्वस्त केले. मात्र, त्याचवेळी नैराश्यातून जीव द्यायला निघालेल्या भल्या माणसाशी गाठ पडली आणि अश्रूंची फुले झाली. पदरातील लेकरांसह त्याने स्वीकार केला. वारांगणेला त्यांनी पतिव्रता केले. स्वतःचे नाव दिले. घर दिले आणि दशकापासून राजा-राणीचा सुखी संसार सुरू आहे. ही सत्यकथा आहे एका संयुक्ताची!
ती मुळची वर्धा जिल्ह्यातील. अवघं १५ वर्षांचं कोवळं वय असताना घराजवळच्या तरुणाशी प्रेम जुळलं. घरच्यांचा विरोध असल्याने या प्रेमासाठी तीने घर सोडले. तो दिवस होता २६ जून १९९६. एका मंदिरात लग्न केले. मात्र, आयुष्यात नियतीने वेगळंच लिहून ठेवलं. तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी नवऱ्याला अटक केली. संयुक्ताचा आधारच कोसळला. पतीच्या नातेवाइकांकडे गेली. पती सुटला की, त्याच्यासोबत राहायचे असे मनाशी ठरवले. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते.
एक दिवस पतीला भेटण्यासाठी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आली आणि आयुष्य यातनांनी भरून गेले. एक ऑटोचालक याला कारणीभूत ठरला. गावी परत जाताना बस सुटली. रात्री बसस्थानकावर असहाय्यतेचा फायदा ऑटोचालकाने घेतला. गंगा जमुनात आणून सोडले. नाही नाही म्हणत असताना देहविक्री व्यवसायात आणले. तेथे एका तरुणाने साथ दिली. त्याच्यापासून एक गोंडस बाळं झालं. नंतर त्यानेही त्रास दिला. अखेर आयुष्य संपवायला निघाले.
नशीबांनी पावलांना धुळे येथे नेले. तेथे नैराश्यात अडकलेल्या एका व्यक्तीशी भेट झाली. तो व्यवसायाने शिक्षक होता. चेहऱ्यावर आलेले अश्रू बघून सहज विचारणा केली. दोघांनी एकमेकांच्या दुःखाने भरलेल्या कथा सांगितल्या. दोघांच्याही आयुष्यातील दुःखी आयुष्य बदलण्याचा निर्धार केला. मात्र, अडसर शरीर विकण्याचा होता. ती नागपूरला परतली.
शिक्षक वेळात वेळ काढून नागपुरात भेटायसाठी येऊ लागला. रेडक्रॉस संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक हेमलता लोहवे यांना ही बाब समजली. त्यांनी दोघांना लग्नाचा सल्ला दिला. दोघांचेही लग्न झाले. गेल्या दशकापासून दोघेही गुजरातमध्ये संयुक्त कुटुंबात आनंदाने संसार करीत आहेत. संयुक्ताला त्रास होऊ नये म्हणून त्या शिक्षकाने काळजावर दगड ठेवून घरच्यांना तिची खरी ओळख सांगितली नाही, हे विशेष.
लेकरासहित माझा स्वीकार दुसऱ्या पतीने (शिक्षकाने) केला. त्याला स्वत:चे नाव दिले. चांगल्या शाळेत प्रवेश दिला. एवढेच नव्हे तर मला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगितले. दुसरे अपत्य नको असा निर्णय घेतला. दोघेही आम्ही लेकराले शिकवत आहोत. पोरगा १२ वर्षांचा झाला. माझ्यासाठी नुसते पती नाहीत, सारे देवळात जातात, मात्र माझा ‘देव...’ माझ्यासोबत आहे.
इच्छा तेथे मार्ग निघतो
देहविक्रीच्या काळोख्या गुहेकडे जाणारे रस्ते अनेक आहेत. पण बाहेर पडण्यासाठी मार्ग नाही. शरीरविक्रीच्या भोवऱ्यातून काढण्यासाठी परिस्थिती कारणीभूत ठरते. आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे, याची जाणीव करून देण्याची गरज आहे. इच्छा तेथे मार्ग निघतो.
- हेमलता लोहवे,
प्रकल्प अधिकारी, रेडक्रॉस, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.