Wrestling competition to help Beti Bachao beti padhao mission in yavatmal
Wrestling competition to help Beti Bachao beti padhao mission in yavatmal  
विदर्भ

कुस्त्यांची दंगल ठरली मंगल! निधीतून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाला हातभार लावणार 

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : लाल मातीत रंगणाऱ्या कुस्ती दंगलची परंपरा जपणाऱ्या माळपठारावरील मोप गावात यंदा कोरोनामुळे मोठ्या पैलवानांची दंगल भरविली नाही. मात्र, या दंगलच्या निधीतून 'बेटी बचाव-बेटी पढाव' या चळवळीला हातभार लावण्यात आला. यासाठी दिवंगत पुंजाराव रावजी मस्के व्यायाम शाळेने पुढाकार घेतला.

पैनगंगेच्या काठावर वसलेल्या मोपची कथाच आगळीवेगळी आहे. मोपच्या लाल मातीत जुन्या काळापासून कुस्त्यांची दंगल रंगत आलेली आहे. कुस्तीचे दर्दी डावपेचांनी भरलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करतात. मराठवाडा व विदर्भातील अनेक पैलवान या मातीत आपला रग आजमवतात. इनामांची लयलूट होते. गावातील पुंजाराव मस्के हे पट्टीचे पैलवान होते. 

अनेक पैलवानांची मस्ती त्यांनी लाल मातीत जिरवली व शास्त्रशुद्ध डावपेच शिकवीत त्यांनी माळपठारावर पैलवानांची फौज तयार केली. त्यांच्या स्मरणार्थ आनंद मस्के, पंडित मस्के यांनी पुढाकार घेत व्यायाम शाळा सुरू केली. व्यसनाधिनतेत वळणारी पिढी बलसंवर्धन करू लागली. त्यामुळे गावकऱ्यांचा उत्साह अधिक वाढला. या गावात प्रत्येक घरात पैलवान निपजतो, अशी आख्यायिका तयार झाली.

केवळ बलसंवर्धन हाच एकमेव हेतू न ठेवता दिवंगत पुंजाराव मस्के व्यायाम शाळेने 'बेटी बचाव' अभियान अंमलबजावणी करण्यात प्रत्यक्ष कृतीतून सहभाग घेतला. आर्थिक विपन्नतेमुळे गावखेड्यात मुलींच्या जन्मावर संक्रांत आली. गर्भावस्थेतच तिची कळी खुडल्या जाण्याचे प्रकार घडू लागले. त्यामुळे मुलींची समाजातील संख्या कमी होऊ लागली. या प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने 'बेटी बचाव-बेटी पढाव' सुकन्या योजना कार्यान्वित केली. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी मोपच्या व्यायाम शाळेने पुढाकार घेतला. दरवर्षी कुस्ती दंगलमध्ये प्रबोधन केले. यंदा कुस्ती दंगल कोरोनामुळे रद्द केल्यानंतर व्यायाम शाळेने आपल्या निधीतून मोपमधील 30 चिमुकल्या मुलींचे पोस्ट ऑफिसमध्ये 250 रुपयांची राशी भरून खाते काढले. या खात्यात दर महिन्याला पैसे भरण्यासाठी पालकांचे प्रबोधन केले. या राशीतून मुलींचे शिक्षण व लग्नासाठी खर्च करता येणार आहे. व्यायाम शाळेच्या उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे.

मोपची कुस्ती परंपरा खंडित होऊ नये, म्हणून यावेळी शुक्रवारी (ता.22) छोट्या प्रमाणात लहान पैलवानांची कुस्ती भरविण्यात आली. चपळाई व डावपेचांनी भरलेली कुस्ती दंगल नावीन्यपूर्ण ठरली. जवळपास 50 छोट्या पैलवानांनी सहभाग घेत 'कुस्तीची पाठशाला' गावकऱ्यांचे आकर्षण ठरली. विशेष म्हणजे बजरंग सवळे व जय कुऱ्हाडे या छोट्या पैलवानांनी एकमेकांवर डाव मारत कुस्तीची उत्कंठा वाढविली. बजरंग पैलवानाने 'डूब' डाव मारला. पैलवान पूर्णपणे चित झाला किंवा नाही, अर्थात पैलवानाची पाठ मातीला टेकली किंवा नाही हे पाहण्यासाठी मारोतराव जराड व धर्मपाल पैलवान या पंचांनी खाली वाकून लाल मातीला समांतर पाहत निरीक्षण केले. हा क्षण उत्कंठा वाढविणारा व तितकाच मजेशीर होता. कुस्तीप्रेमींनी तो मनात साठवून ठेवला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT