womens Corner
womens Corner sakal
वुमेन्स-कॉर्नर

नावापुरती ‘मिनी’ पण...

वैशाली पंडित

लग्नानंतरचा आयुष्याचा सगळा पटच बदलून गेला. एकीकडे वैवाहिक जीवनाचे हवेहवेसे रंग आणि दुसरीकडे माझ्या माहेरच्या माणसांची, माझ्या सरावातल्या वातावरणाची ताटातूट. माझ्या माहेरी मी मुलगी होते. आता एकदम विवाहित स्त्री. घरकामाची जुजबीच ओळख होती. आई, दोन्ही आज्या, काकू, आत्या या वडीलधाऱ्या मंडळींनी कामाचे संस्कार दिले होते; पण जबाबदारी नव्हती पडली. अशा अवघड मनःस्थितीत वरातीतून सासरघरी आले. नववधू असल्याने कोणी लगेच स्वयंपाकघरात पिटाळलं नव्हतं. पहिले काही दिवस तर घरात पाहुणे... म्हणजे जवळची नातेवाईक मंडळीच होती म्हणा. कोल्हापुरातल्या त्या तीन खोल्यांतही सगळी मजेनं जमवून घेत होती. हास्यविनोद, चिडवाचिडवी यांनी घर दणदणून गेलं होतं. आम्ही दोघं तर काय हवेतच तरंगत होतो. रोज कोणा ना कोणाकडे जेवणासाठी आमंत्रण असायचं. छान नटायचं आणि सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा झेलत नवऱ्यासोबत बाहेर जायचं, एवढंच मला काम असायचं.

चार-पाच दिवसांत जी-ती मंडळी आपापला बाडबिस्तार घेऊन हळूहळू स्वगृही रवाना झाली. घर अस्ताव्यस्त पसरलेलं. लगीनघर म्हटल्यावर जसं पसरायला हवं, तसं त्यानं ऐसपैस पसरून घेतलेलं स्वतःला. आम्हाला दोघांना एका स्नेह्यांनी दुपारच्या भोजनालाच बोलावलं होतं. म्हणून आम्ही साधारण अकरा वाजताच बाहेर पडलो होतो. माझे सासरे तेव्हा गटशिक्षणाधिकारी होते. ते परगावी असायचे. त्यांची रजा संपत आली होती, म्हणून ते आणि आमच्या आई, काही खरेदी आणि बँक व्यवहार करायला आमच्या मागोमागच बाहेर पडले होते.

घरात, माझी माझ्याहून दोन-तीन वर्षांनी लहान असलेली नणंदुली... मीना एकटीच होती. अजून तिची-माझी खूप जवळीक झाली नव्हती. पण बोलायला एक मैत्रीण आहे, इतपत भरवसा आला होता. तर, सांगायचं म्हणजे... आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी आलो, तेव्हा घराचा चेहरामोहरा साफ बदललेला होता. कपडे, अंथरुणं, पांघरुणं व्यवस्थित घड्या करून जागेवर शिस्तीत बसले होते, कानाकोपरा झाडून-पुसून लखलखीत दिसत होता.

आमचं तेव्हाचं ड्रेसिंग टेबल, म्हणजे भिंतीवर एक मध्यम आकाराचा आरसा आणि भिंतीलगत एका जाळीच्या कपाटावर पावडरचा डबा, कंगवे, जाई काजळ आणि दाटसर कुंकवाची लांबुळकी कुपी... हे प्रसाधन साहित्य... स्वच्छ पेपर अंथरून ओळीत लावून ठेवलेलं होतं. पलंगावर स्वच्छ धुपकी बेडशीट चुणीविरहित अंथरलेली होती. घरात पाऊल टाकताच माझ्यासारख्या घरकामात पस्तीस मार्क जेमतेम असणारीलाही हा बदल ठळकपणे जाणवला. देव असलेल्या कोपऱ्यातून येणारा उदबत्ती, फुलांचा दरवळ श्वासात भरून घेत मी आईंना विचारलं, ‘अय्या, एकटीनं सगळं आवरलंत हे?’

‘छेः गं! मिनीनं आवरलं घर. आम्हीही नुकतेच आलो.’

मी अक्षरशः थक्क झाले होते. मीनाने आवरलं? माझ्याहून लहान, नुकती दहावीची परीक्षा दिलेल्या मुलीनं, हा एवढा पसारा जागच्या जागी केला? इतकी स्वच्छता? इतका उरक?... मला लग्नानंतरचा पहिला गुरू मिळाला. तो क्षण मला बदलवणारा होता. मीना जात्याच नीटनेटकी. स्वच्छतेचा आणि प्रत्येक कामात परिपूर्णतेचा आग्रह असणारी लहानखुरी व्यक्ती. तिनं काढलेला केर पायांआधी डोळ्यांना जाणवायचा. इतकं झळझळीत झाडणं. फरशी हसायचीच मीनानं केर काढल्यावर. हसरी, बोलकी अशी ही माझी छोटी नणंद न बोलता मला घरकामाचा धडा देत होती. कामातूनच नव्हे; तर तिचं अंतरंगही निर्मळ होतं.

कोल्हापुरातल्या गुजरीत एक चांदीचा; पण सोन्याचा मुलामा दिलेला नेकलेस आमच्या दादांनी पाहिला होता. त्यांना तो फार आवडला होता. पण त्या दुकानात तो एकच पीस शिल्लक होता. ‘मीना, मी तो नेकलेस आणणार आहे. पण एकच आहे. तुला हवा की वहिनीला देऊ?’ मी हे ऐकत होते. मीना काय उत्तर देते, याची दादांबरोबर मलाही उत्सुकता होती. ‘बाबा, वहिनीलाच घेऊ की आपण. ती नवी नवरी आहे. तिला सणासमारंभात घालायला मिळेल. मला नंतर घ्या की दुसरं काहीतरी.’ मीना नितळपणे म्हणाली. माझे डोळे भरून आले होते तेव्हा.

ही मुलगी नकळत किती मोलाचं काही मला देत होती! त्यानंतरच्या आयुष्यात नेहमीच, घरकामं करताना माझ्या हातामागे मीना अदृश्यपणे उभी राहिली आहे. नावात ‘मिनी’ असणारी मुलगी ‘मेजर’ होऊन बसली माझ्यासाठी. आई-बाबांचे संस्कार आणि त्यात अधिकची स्वत्वाची भर, यामुळे लहान वयातही माणसाचा जगण्याचा पाया किती मजबूत होऊ शकतो, हे मीनासारखी मुलगीच सिद्ध करू शकते. आणि हो, गुरूपदाला वयाची अट नसते, हेही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT