'इन्फोसिस'ची नवी डोकेदुखी : सीईओ कोणाला करावे?

रॉयटर्स
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

'रॉयटर्स' वृत्तसंस्थेने तीन विश्वासू व्यक्तींशी चर्चा केली. या तिन्ही व्यक्तींना संस्थेमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींची जवळून माहिती आहे. या व्यक्तींच्या माहितीनुसार, सध्याचे संस्थेतील आव्हान हे 2014 पेक्षा जास्त गंभीर आहे.

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे. सिक्का यांच्या जागी कोणाला आणायचे, हा गंभीर प्रश्न कंपनीसमोर आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन सीईओ तातडीने शोधणे ही डोकेदुखीची बाब ठरते आहे.

कंपनीने 2014 मध्ये सीईओ शोधण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केला होता. त्यातून विशाल सिक्का हाती लागले. कंपनीच्या संस्थापकांबाहेरील पहिली व्यक्ती म्हणून सिक्का 'SAP' या जगप्रसिद्ध कंपनीतून इन्फोसिसमध्ये दाखल झाले. कंपनीचा घसरणारा व्यवसाय सावरण्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर होती.

'रॉयटर्स' वृत्तसंस्थेने तीन विश्वासू व्यक्तींशी चर्चा केली. या तिन्ही व्यक्तींना संस्थेमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींची जवळून माहिती आहे. या व्यक्तींच्या माहितीनुसार, सध्याचे संस्थेतील आव्हान हे 2014 पेक्षा जास्त गंभीर आहे.

'संस्थेबाहेरील व्यक्ती घेणे ही 2014 मधील अतिशय अवघड गोष्ट होती. आज त्याहून गंभीर परिस्थिती आहे, कारण संचालक मंडळामध्ये वाद सुरू आहे. यावेळी बाहेरून कोणी व्यक्ती सीईओ म्हणून येईल, अशी शक्यता खूप कमी वाटते,' असे या सूत्रांनी 'रॉयटर्स'ला सांगितले.  

अर्थात, 2014 पेक्षा संस्थेची एकूण परिस्थिती आज चांगली आहे. सिक्का यांनी आऊटसोर्सिंगवर अवलंबून असलेल्या 'इन्फोसिस'ला क्लाऊड, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे नेले आहे. सिक्का 1 ऑगस्ट 2014 रोजी कंपनीत रुजू झाले. तेव्हापासून ते त्यांनी कंपनी सोडेपर्यंत इन्फोसिसचा शेअर 22 टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, 150 अब्ज डॉलर्सच्या कंपनीसमोर आज ब्रेक्झिट, युरोपियन मार्केट, अमेरिकेतील अस्थितरता अशी नवी आव्हानेही आहेत.

कंपनीने सीईओ पदासाठी प्रभारी सीईओ प्रवीण राव, चीफ फायनान्स ऑफिसर रंगनाथ डी मविनकेरे, डेप्युटी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रवी कुमार एस आणि बँकींग, फायनान्शियल आणि इन्श्यूरन्स सेवा विभागाचे प्रमुख मोहित जोशी यांची नावे विचारात घेतली आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business news in Marathi Infosys hunting for new CEO