कोविड-१९, बेरोजगारी आणि आत्महत्या...

विजय तावडे
Tuesday, 2 June 2020

आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. जीव वाचवायचा की  उपजीविकेचा बचाव करायचा अशा कात्रीत जग सापडले आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखील झाला आहे.  

मानसोपचार सेवांची वाढती आवश्यकता हे कोविड-१९ काळातील नवे संकट

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. हे संकट अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. कोविड-१९चा प्रसार रोखणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. जीव वाचवायचा की उपजीविकेचा बचाव करायचा अशा कात्रीत जग सापडले आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखील झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ संगठन (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) (आयएलओ) यांनी यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार जाण्याची माहिती देण्यात आली आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. 

म्युच्युअल फंड एसआयपी : छोटा पॅकेट, बडा धमाका

अमेरिकेतील विविध संस्थांदेखील कोविड-१९मुळे निर्माण झालेली बेरोजगारी आणि त्यामुळे होत असलेल्या आत्महत्या यांचा अभ्यास करत आहेत. यासाठी आतापर्यत ६३ देशांमधील आकडेवारीचा अभ्यास केला गेला आहे. यातून असे दिसून आले आहे की कोविड-१९च्या संकटामुळे, बेरोजगारीमुळे होणाऱ्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात मागील पंधरा ते वीस वर्षांच्या कालावधीत (यात २००८च्या जागतिक वित्तीय संकटाचाही समावेश आहे) बेरोजगारीमुळे होत असलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीची तुलना सद्यपरिस्थितीत बेरोजगारीमुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या आकडेवारी करण्यात आली आहे. त्यात असे दिसून आले आहे की कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे होणाऱ्या आत्महत्या होण्याची शक्यतेत किंवा जोखमीत आधीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. याच मॉडेलचा वापर करून या संस्था आता सद्यपरिस्थितीत वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे आत्महत्येच्या प्रमाणात किती वाढ होईल याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

दरवर्षी जगभरातून साधारणपणे ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा अभ्यास करताना विविध वयोगट, लिंग, बेरोजगारी इत्यादी घटकांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले आहे. जागतिक बॅंकेच्या रोजगारासंदर्भात उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेनशनच्या आकडेवारीचाही वापर यासाठी होतो आहे. 

१८ मार्च २०२०च्या आपल्या प्रसिद्धीपत्रकात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने (आयएलओ) बेरोजगारीसंदर्भातील आकडेवारी आणि अंदाज व्यक्त केले आहेत. आयएलओनुसार परिस्थिती फारच गंभीर झाल्यास २.४७ कोटी रोजगार आणि तर परिस्थिती मर्यादित राहिल्यास ५३ लाख रोजगार जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जगभरातील आर्थिक परिस्थिती गंभीर होत गेल्यास बेरोजगारीच्या दरात ४.९३ टक्के ते ५.६४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा गंभीर परिणाम होत आत्महत्यांची संख्या वार्षिक पातळीवर ९७५० ने वाढण्याची शक्यता आहे. तर जर परिस्थिती खूप गंभीर झाली नाही तर बेरोजगारी दर ५.०८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्या स्थितीत आत्महत्यांची संख्या वार्षिक पातळीवर २१३५ ने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) कोणत्याही समाजात किंवा देशात झालेल्या एका आत्महत्येमागे, आत्महत्येचे २० पेक्षा जास्त प्रयत्न असतात. 

आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक, 'आरोग्य विमा'

कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटकाळात, ताणतणावाखाली असलेल्या लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या मानसिक आरोग्य किंवा मानसिक उपचार सेवांच्या मागणी मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. २००८च्या जागतिक वित्तीय संकटाच्या काळातील आकडेवारीनुसार बेरोजगारी वाढल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणातदेखील वाढ झाली होती. कोविड-१९मुळे आधीच तणावात आणि दबावात असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेसमोर यामुळे आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. आरोग्य यंत्रणांवरील ताण त्यामुळे वाढणार आहे.  

श्रीमंत होत रिटायर होण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स

त्यामुळेच मानसिक आरोग्य किंवा मानसोपचार सेवांशी निगडीत असणाऱ्यांनी विविध सरकारांसमोर आणि समाजांसमोर वाढत्या बेरोजगारीमुळे वाढणाऱ्या आत्महत्येंच्या प्रमाणासंदर्भात जागृती निर्माण केली पाहिजे. याचे गांभीर्य यंत्रणांसमोर आणि समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे. त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर होणार आहे. त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact of coronavirus on unemployment & suiside