मे महिन्यात डेट फंडात ६३,६६५ कोटींची गुंतवणूक, नोंदवली ४६ टक्क्यांची वाढ

Debt-Funds
Debt-Funds

मे महिन्यात डेट म्युच्युअल फंड प्रकारात ६३,६६५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये डेट फंडात ४३,४३१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (ॲम्फी) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने उचललेल्या पावलांमुळे आणि लिक्विड फंडातील गुंतवणूकीत वाढ झाल्यामुळे डेट फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. मात्र मध्यम कालावधीसाठीचे फंड, ओव्हरनाईट फंड, क्रेडिट रिस्क आणि डायनामिक बॉंड फंड यामधील गुंतवणूक काढण्याकडे गुंतवणुकदारांचा कल दिसून आला आहे.

मार्च महिन्यात डेट म्युच्युअल फंडाला मोठा फटका बसला होता. या प्रकारातून गुंतवणूकदारांनी १.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. तर डेट फंडात फेब्रुवारी २०२० मध्ये २८,००० कोटी रुपयांची आणि जानेवारी २०२० मध्ये १.०९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 

मागील महिन्यात करण्यात आलेल्या गुंतवणुकीत  ट्रेझरी बिल, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स आणि छोट्या कालावधीसाठीचे कमर्शियल पेपर यामध्ये गुंतवणूक असणाऱ्या लिक्विड फंडात ६१,८७० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 

रिझर्व्ह बॅंकेने डेट फंडांसंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम होत मे महिन्यात पूर्वीप्रमाणेच डेट फंडात गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

'गुंतवणूकदार व्याजदरांच्या ट्रेंडचा लाभ उठवत आहेत. एएए पतमानांकडे मोठ्या प्रमाणावर वळल्याचाही मोठा लाभ डेट प्रकारातील योजनांना झाला आहे. गुंतवणूकदार उच्च पतमानांकन असलेल्या डेट प्रकारात गुंतवणूक करत आहेत.', असे मत ॲम्फीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस वेंकटेश यांनी व्यक्त केले आहे.  

एप्रिलच्या शेवटी रिझर्व्ह बॅंकेने म्युच्युअल फंडांसाठी ५०,००० कोटी रुपयांच्या विशेष चलन तरलतेची घोषणा केली होती. या क्षेत्रावरील रोकड उपलब्धतेसंदर्भातील दबावाला दूर करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले होते.

ओव्हरनाईट फंडातून मागील महिन्यात १५,८८० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती तर क्रेडिट रिस्क फंडातून ५,१७३ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. 

याशिवाय मे महिन्यात गुंतवणूकदारांनी मध्यम कालावधीच्या फंडातून १,५२० कोटी रुपये आणि डायनामिक बॉंड फंडातून ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्याउलट गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये ५,२५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

मे महिन्यात म्युच्युअल फंड योजनांमध्ये सर्वसाधारणपणे ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक सर्व प्रकारात मिळून झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com