अमेरिकी क्रूड ऑइल 'कटिंग' चहापेक्षा स्वस्त

पीटीआय
Wednesday, 22 April 2020

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाच्या मागणीत झालेली ऐतिहासिक घट आणि दुसरीकडे उत्पादनात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे क्रूड ऑईलच्या किंमती मागील 21 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचल्या आहेत.

वाशिंग्टन - कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाच्या मागणीत झालेली ऐतिहासिक घट आणि दुसरीकडे उत्पादनात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे क्रूड ऑईलच्या किंमती मागील 21 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारी अमेरिकी मानक टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ऑइल तब्बल 37 टक्क्यांनी घसरून 11.45 डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली घसरले होते. परिणामी अमेरिकी टेक्सास क्रूड ऑइलचे भाव वर्ष 1999 च्या म्हणजेच 21 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचले आहे. तर आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड  6 टक्क्यांनी घसरून 26.42 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

कोरोनाने बदलले शिष्टाचार

कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून जगभरातील उद्योगव्यवसाय आणि नागरी जनजीवन ठप्प व्हायला सुरुवात होऊन सद्यस्थितीत संपूर्ण जग ठप्प झाले आहे. परिणामी क्रूड ऑईलचे दर देखील घसरत आहेत. दरम्यान घसरत्या दराचा तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने प्रमुख तेल उत्पादक देश अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया आणि सौदीच्या नेतृत्वाखालील ओपेक संघटनेने तेलाचे उत्पादन तब्बल 10 टक्क्यांनी म्हणजेच प्रतिदिन 1 कोटी बॅरल घटविण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाचा विळखा वाढतच चालल्याने आणि तेल उत्पादक देशांमधील कटशहाच्या राजकारणामुळे क्रूडच्या किंमती सातत्याने घसरतच आहेत.

फेसबुकची जिओमध्ये 43 हजार कोटींची गुंतवणूक 

अमेरिकी क्रूड ऑइल कटिंग चहाच्या दरात
एक लिटर अमेरिकी क्रूड ऑईलचे दर कटिंग चहाच्या दरापेक्षा खाली आले आहेत. सध्याच्या दरानुसार, क्रूड ऑईलच्या एका बॅरलची किंमत 11.45 बॅरल प्रति डॉलर म्हणजेच रुपयाचा आजचा विनिमयाचा दर 76.50 रुपये गृहीत धरल्यास  875 रुपये प्रति बॅरल इतका खाली आला आहे. एका बॅरलमध्ये 159 लीटर क्रूड ऑइल असते. म्हणजेच एक लिटर कच्च्या तेलाचे दर हे 5.50 रुपयांवर पोचले आहेत. म्हणजेच कटिंग चहासाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांच्या दरात 1 लिटर क्रूड ऑइल मिळत आहे.

Coronavirus : औवेसींनी पहिल्यांदाच केले मोदी सरकारचे कौतुक; म्हणाले...

क्रूड ऑईलच्या दरात घसरण होण्यामागील प्रमुख कारणे -
तेल उत्पादक देशांमधील एकमेकांप्रती अविश्वास आणि सौदीचे बाजारपेठ काबीज करण्याचे 'अर्थ'कारण 

एकीकडे क्रूड ऑईलचा किंमती स्थिर राहाव्यात म्हणून ओपेक संघटना आणि रशियासारखे सहकारी देश उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेत असले तरी एकमेकांवरील अविश्वासाच्या भावनेतून उत्पादन कपातीचा निर्णय प्रभावीपणे राबविला जात नाही. परिणामी मागील आठवड्यात अमेरिकी शेल उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली. दुसरीकडे नॉन ओपेक देश असलेल्या ओमानने मार्च महिन्यात फेब्रुवारीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी उत्पादन वाढविल्याचे समोर आले आहे. तर क्रूडची मागणी घटलेली असताना रशिया आणि इतर तेल उत्पादक देशांना आशियातील बाजारपेठ मिळू नये म्हणून मे महिन्यासाठी आशिया विभागात विक्री केल्या जाणाऱ्या क्रूड ऑइलच्या किंमतीत सौदी अरेबियाने तब्बल 10 टक्क्यांनी घट केली आहे. रशियाने देखील याप्रकारची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रूडच्या किंमती घसरण्यात मदत झाली आहे.

उत्पादन कपात पुरेशी नाही
तेल उत्पादक देशांनी 10 टक्क्यांनी उत्पादन कपातीचा घेतलेला निर्णय पुरेसा नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने म्हटले आहे. जगभरातील उद्योगधंदे, वाहने बंद असल्याने इंधनाची, पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे तेल उत्पादक देशांना तेल उत्पादनात 10 टक्क्यांपेक्षा अधिक कपात करणे गरजेचे आहे. यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे ऊर्जा संस्थेचे मत आहे.

भारताला मोठा फायदा -
भारत जगातील दुसरा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. देशाला लागणाऱ्या एकूण तेलापैकी 80 टक्के तेल भारत आयात करतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असल्याने ही संधी भारत गमावू इच्छित नाही. परिणामी भारताने कच्च्या तेलाचा अधिकाधिक साठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या वित्तीय तुटीमध्ये देखीक मोठी घट होणार असून आयात बिल कमी होण्यास मदत होणार आहे.

शेअर बाजारात 'या' कंपन्यांना फायदा -
रंग तयार करणाऱ्या एशियन पेंट सारख्या कंपन्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण रंग उत्पादन क्षेत्रात तेलाचा मोठ्या प्रमाणावर कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो. क्रूड ऑइलवर आधारित असलेल्या पेंट्स, विमान कंपन्या, तेल वितरण कंपन्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र रंग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन आणि मागणीत
झाली आहे. तसेच विमान वाहतूक सेवा बंद असल्याने विमान कंपन्यांना देखील कमी झालेल्या दराचा फायदा घेता येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us crude oil price lowest 21 years reasons information marathi