मस्ती... दीदीची आणि माझी

आशा भोसले
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

लता मंगेशकर नावाच्या दैवी व्यक्तिमत्त्वाचे वय वाढत गेले तरी त्यांच्या सुराला मात्र वयाची कसलीही बंधने असल्यासारखी वाटत नाहीत. या सूरसम्राज्ञीने आज ९१ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या भगिनी व सुहृदयांनी व्यक्त केलेल्या भावना.

दीदी...लतादीदी माझी सख्खी बहीण असली, तरी आमचं नातं वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळं आहे. आम्ही भावंडं आहोतच; पण ती कधी आमची पालक आहे, कधी समव्यावसायिक आहे, कधी मैत्रीण आहे तर कधी खूप खूप प्रेमळ आई...

लता मंगेशकर नावाच्या दैवी व्यक्तिमत्त्वाचे वय वाढत गेले तरी त्यांच्या सुराला मात्र वयाची कसलीही बंधने असल्यासारखी वाटत नाहीत. या सूरसम्राज्ञीने आज ९१ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या भगिनी व सुहृदयांनी व्यक्त केलेल्या भावना.

दीदी...लतादीदी माझी सख्खी बहीण असली, तरी आमचं नातं वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळं आहे. आम्ही भावंडं आहोतच; पण ती कधी आमची पालक आहे, कधी समव्यावसायिक आहे, कधी मैत्रीण आहे तर कधी खूप खूप प्रेमळ आई...

आम्ही लहान असताना खूप मस्ती करायचो. दीदी मात्र पहिल्यापासूनच प्रौढ झाल्यासारखी वागायची. अगदी लहान असताना आम्ही एकत्र खेळलोही. पण, आमच्या तुलनेत ती खूपच शांत असे. तशी कधी रंगात आली, तर कुणाच्याही अतिशय सुंदर नकलाही करील. पण, परिस्थितीनं तिला खूप लवकर प्रौढ केलं. पण, आम्हा लहान भावंडांचे तिनं खूप लाड केले आहेत. आमचं कधी चुकलं तर ती ओरडेही. तिचा धाक होताच. मी तर तिचा मारही खाल्लाय!

दीदीला फोटोग्राफीची आवड असल्यानं ती अनेक ठिकाणी फिरायची. मीही खूप फिरलेय तिच्याबरोबर. आम्ही दोघीही सिनेमासाठी गाणी म्हणायला लागल्यावर कधी कधी एकाच स्टुडियोत रेकॉर्डिंगसाठीही सोबत गेलोय कधी कधी. आणि हो, आम्ही एकत्र रेकॉर्डिंगही केलंय. कमी आहे त्यांची संख्या; पण त्यांची मजा वेगळीच.

लतादीदींची निवडक गाणी सांगणं ही खूप अवघड गोष्ट. कारण, खरं सांगायचं तर मला तिची बहुतेक सगळीच गाणी आवडतात. ‘मोगरा फुलला’, ‘लग जा गले’ यांसारखी दीदींची बरीच गाणी मला माझ्या जवळची वाटतात. ईश्‍वरी आवाज लाभलेल्या दीदीचं लक्ष केंद्रित करून अगदी हृदयापासून गाणं ही खासियत आहे. हो, माझ्या दृष्टीनं दीदींचा आवाज हा खरोखरंच स्वर्गीय आवाज आहे. देणगी आहे ती ईश्वरानं तिला दिलेली. कारण, गाणं तुम्हाला शिकता येतं. तुमचा आवाज कसाही असला तरी. पण, शिकलेलं गाणं तुम्हाला तुमच्याच आवाजात सादर करावं लागतं. ते गाणं तुमच्या अंगभूत आवाजातून सादर होतं तेव्हा ते सच्चं असतं, त्याचा गोडवा वेगळाच असतो. दीदीच्या आवाजात तो गोडवा आहे. बाकी साऱ्यांची नक्कल होऊ शकते. पण, अंतरंगातून आलेल्या त्या गोडव्याची नक्कल कशी होणार?

दीदींच्या फक्त आवाजातच नव्हे, तर स्वभावातही गोडवा आहे. परिस्थितीनं तिला काही वेळा खूप कठोर बनवलं. काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पण, त्या वेळची परिस्थिती आणि तिची स्थिती पाहता ती चुकीची होती, असं नाहीच म्हणून शकत.

दीदीला अनेक गोष्टींची आवड आहे. खाण्याचीही आहेच. विशेष म्हणजे, तिला मांसाहारी खाणं खूप आवडतं. खरंतर कट्टर मांसाहारी आहे ती. मी केलेली बिर्याणी तिच्या विशेष आवडीची. आमच्या बाबांनाही (दीनानाथ मंगेशकर) मांसाहारी पदार्थ खूप आवडायचे. त्यामुळे आम्हा बहिणींनाही ते पदार्थ आवडतात.

आजही दीदी आणि मी जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा अगदी मनमोकळ्या गप्पा मारतो, हसतो, मस्ती करतो. कौटुंबिक चर्चाही आमच्यामध्ये होतात. विषयाचं बंधन नसतं त्या गप्पांना. पण, अगदी गंभीर विषयांवर म्हणजे सांगायचंच झालं तर राजकारण वगैरेवर नाही करत आम्ही चर्चा. पण, दोघी एकत्र भेटलो, की त्या गप्पांना बंधन उरत नाही. मनमोकळेपणानं बोलतो. तो एक वेगळाच आनंद असतो.

आमच्या लहानपणीच्याही बऱ्याच आठवणी आहेत. लहान असताना दीदींनी मला मारलं हे तर मी सांगितलंच. तिचा रागही तसाच जोरदार होता. माझ्यावर खूप रागावलीही ती. पण, दीदींनी तितकंच प्रेम माझ्यावर केलंय. आजही ती माझ्यावर रागावते. पण, आता तिचा राग थोडा कमी झाला आहे.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. खूपच रागावली ती माझ्यावर. त्याचं झालं असं, की माझ्या घरी एक छोटंसा कुत्रा आहे. आणि दीदीच्या घरीही त्यांचा एक कुत्रा आहे. मुक्‍या प्राण्यांवर तिचं प्रचंड प्रेम आहे. दीदींनी तिच्या कुत्र्याचं नाव सोनू ठेवलंय. या सोनूचे ती खूपच लाड करते. मला मात्र प्राण्यांची फार आवड नाही. त्यामुळेच मी मुक्‍या प्राण्यांचे तेवढे लाड करीत नाही. कुत्रं गादीवर वा सोफ्यावर बसलेलं मला आवडत नाही. मी त्यांना उठवते लगेच. यावरून दीदी माझ्यावर प्रचंड रागावल्या. कुत्रं आवडत नाही, तर पाळता कशाला, असं मला त्या रागात म्हणाल्या. दीदी खरंच रागावल्या होत्या आणि मी मात्र हसत होते!

चित्रपट पाहण्याची दीदीला प्रचंड आवड. आता मालिकाही तिला आवडतात. ‘सीआयडी’ हा कार्यक्रमही त्या आवडीनं पाहायच्या. आणि हो क्रिकेट हाही तिच्या जिव्हाळ्याचा विषय. खूप मॅच पाहत असते ती.

मी आजही वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाते. बरीच फिरते. पण, दीदींचं तसं नाही. ती फार कमी बोलते. कमी ओळखीच्या लोकांशी फार बोलणं हा स्वभावच नाही तिचा.

दीदीला सगळ्या सुंदर गोष्टींची आवड आहे. फोटोग्राफी तर खूप सुंदर करायची ती. आम्ही कुठं कुठं हिंडायचो त्यासाठी. फार आधी खूप सुंदर फोटो काढले आहेत तिनं. त्यासाठी तिनं खास कॅमेराही घेतला होता. कुटुंबातील लोकांना मॉडेल बनवून तिनं खूप फोटो काढले आहेत. पण, नंतर तिनं सोडूनच दिलं ते.

तिनं मनावर घेतलं असतं, तर अनेक गोष्टींत प्रावीण्य मिळवलं असतं. पण, तिच्यावर अनेकांची जबाबदारी होती. त्यांचं पालन करण्यासाठी तिनं स्वतःला फार मोकळं सोडलंच नाही कधी..!

***************************************

Happy Birthday Lata Mangeshkar : विश्‍वकुटुंबिनी

Happy Birthday Lata Mangeshkar : एक शाश्वत स्वर

Happy Birthday Lata Mangeshkar : कृपाप्रसाद 

Happy Birthday Lata Mangeshkar : अलौकिक 

Happy Birthday Lata Mangeshkar : विद्यापीठ

Happy Birthday Lata Mangeshkar : चमत्कारच!

***************************************

इतर ब्लॉग्स