Happy Birthday Lata Mangeshkar : अलौकिक

sadhana-sargam
sadhana-sargam

लता मंगेशकर एवढ्या मोठ्या आणि महान गायिका आपल्याला लाभल्या ही फार भाग्याची गोष्ट आहे. त्यांना लाभलेला संगीताचा वारसा, तसेच त्यांच्या गाण्यावर पोसलेल्या पिढ्यान पिढ्या म्हणजे संगीतक्षेत्राचा इतिहास आहे. ही एक अद्भुत गोष्ट आहे. लतादीदींची कारकीर्द एवढी मोठी आहे, की त्याबद्दल संपूर्ण जगाला काही नव्याने सांगायला नकोच. त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली, शिवाय त्यांनी वेगवेगळ्या आणि नव्या-जुन्या संगीतकारांबरोबर गायली आहेत.

अगदी सांगायचेच झाले तर गुलाम हैदरजींपासून ते आजच्या  पिढीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबतही त्यांनी काम केले. त्यांच्या गाण्याची महती आज संपूर्ण जगभरात पसरली आहे. त्यांचं गाणं मला अलौकिक वाटतं. त्यांच्या गायकीमधील सर्वच गोष्टी मला खूप आवडतात. त्यांचा आवाज, त्यांचे शब्दोच्चार, सुरांवर असेलली त्यांची पकड, शास्त्रीय संगीताविषयी त्यांचं असलेलं ज्ञान आणि विशेष म्हणजे गाण्यातून प्रकट होणाऱ्या सर्वोत्तम भावना या गोष्टी केवळ अनुभवाव्या अशाच. त्यांचे कोणत्याही भाषेतील गाण्याचे शब्दोच्चार आणि त्यातले भाव इतके स्पष्ट असतात, की ती भाषा जरी आपल्याला ज्ञात नसली तरी त्यामागची भावना आपल्याला सहजच कळते. वरच्या पट्टीतह त्यांच्या स्वरातला ठहेराव अवाक करणारा. त्यांची गाणी ऐकून मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या गायकीकडे मी मार्गदर्शक म्हणूनच पाहते. 

चित्रपट संगीत, गझल, भक्तिसंगीत, शास्त्रीय संगीत या सर्व प्रकारांतील गाणी त्या गायल्या आहेत आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यात एक परिपूर्णता पाहायला मिळते. खरं सांगायचं तर लतादीदींची सर्वच गाणी मला आवडतात. त्यातील एखादं आवडीचं गाणं सांगणं फारच कठीण आहे. पण, त्यांचं एक गाणं मला आवडतं आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे ते गाणं म्हणजे ‘मनमोहना बडे झुठे’. या गाण्यातील त्यांनी घेतलेल्या ताना या खूपच अप्रतिम आहेत. त्या काळात व्हॉइस डबिंग हा प्रकार नव्हता, त्या वेळी सर्व वादक कलाकारांसोबत एकत्रितरीत्या ते गाणं रेकॉर्ड केलं जात असे. असं असूनही त्या गाण्यातली मेलडी आणि ती पेलणारा लता मंगेशकर यांचा स्वर केवळ अप्रतिम. आजच्या अनेक गाण्यांहून ती नक्कीच वरचढ आहेत. खरंतर त्यांची सर्वच गाणी इतकी छान आहेत, की त्या प्रत्येक गाण्याबद्दल काही ना काही तरी सांगण्यासारखं आहे.  

- साधना सरगम, गायिका

***************************************

***************************************

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com