Happy Birthday Lata Mangeshkar : एक शाश्वत स्वर 

lata mangeshkar
lata mangeshkar

लताने गायलेली आवडती गाणी निवडायची कामगिरी खूप म्हणजे खूपच मुष्किल. निवडलेल्या गाण्यांबद्दल शंका नसते, पण त्या यादीत ते गाणं हवं होतं आणि हेही, असं प्रत्येकाला वाटत रहातं. हीच कामगिरी मुमकीन करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्यासमोर मांडलंय ते अतिशय निवडक गाण्यांचं हे रसग्रहण, तेही निवडक शब्दात. 

लताबाईंनी आजवर अनेक संगीतकारांकडे हजारो गाणी गायली... संगीतकारांची शैली, त्यांचा स्वरविचार स्वतःच्या गळ्यातून अभिव्यक्त करताना, वेगवेगळ्या कवींच्या शब्दांचा विचार, अर्थाचा विचार त्या कवीच्या भूमिकेत जाऊन करताना, त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा किती कस लागला असेल? वरकरणी, बारा स्वर आणि भाषेतले सगळे मिळून काही हजार शब्द, यांच्या पलीकडे काय असतं या गाण्यात? संगीतकार कितीही प्रतिभाशाली असला तरी स्वरांबाहेर तो जाऊ शकत नाही... आणि कवीच्या हाती असलेल्या अक्षरांचाच क्रम बदलतो फक्त...  

पण हा झाला सामान्य लोकांचा विचार... जिथे आपली बुद्धी संपते, तिथे प्रतिभावान कलाकारांचा प्रांत सुरू होतो... ते समजून घेण्याचीसुद्धा पात्रता अंगी बाणवावी लागते. पण एकदा त्या चरमसुखाला पोचलो की स्वतःचा हेवा करावा असंच ते सुख. 

लताबाई ज्या संगीतकारांकडे गायल्या, त्या संगीतकारांच्या temparament मध्ये जाऊन त्यांनी ती गाणी गायली.. म्हणून हा आवाज एकसारखा, monotonous वाटला नाही. त्या भावनेत भिजूनच तो आला. लताबाईंनी आवाजातून साकारल्या वेगवेगळ्या नायिका, त्यांपैकी कुणी अनुरागिता होत्या... कुणी मुग्धा होत्या... व्यथिता, विरहिणी, अभिसारिका होत्या. लताबाईंनी त्या संगीतकाराची शैली तर आपल्या आवाजानं अधिक खुलवलीच; पण स्वतःच्या आवाजातून, modulation च्या सहाय्याने त्या भूमिकासुद्धा एका उंचीवर नेऊन ठेवल्या...

********************************************
अनुरागिता

रजनीगंधा फूल तुम्हारे
(चित्रपट- रजनीगंधा, गीत- योगेश, संगीत- सलील चौधरी)

सलील चौधरीचं सांगीतिक मन हे गुंतागुंतीचंच, तरीही त्यातल्या त्यात कमी गुंतागुंत असलेलं हे गाणं! संपूर्ण गाण्याला व्यापून उरलाय तो निशिगंधाचा प्रमाथी सुगंध... पण ही प्रेमाची अगदी सुरवातीची अवस्था. सर्वस्व त्याच्या अस्तित्वात विरघळून टाकावं असा कोणीतरी भेटलाय तिला... आणि हे सगळं ती फक्त एका निशिगंधेला सांगतेय... ही कल्पनाच किती romantic...

तिच्या भावविश्वात महत्त्व आहे ते फुलांना, त्या गंधाला. कारण तो गंध त्याची चाहूल घेऊन येतो. त्या गंधाचं आणि त्याच्या अस्तित्वाचं नातं खूप घट्ट आहे, "यूँही महके प्रीत तुम्हारी मेरे अनुरागी मन में...' हे गाताना त्या आवाजात एक आतुरता आहे... कुणाच्या तरी अस्तित्वात स्वतःचं अस्तित्व विरघळून टाकण्याची आस, ऊर्मी. मला हे वेगळेपण, हे स्वातंत्र्य नकोच...

अधिकार ये जबसे साजन का, हर धडकन पर माना मैने !

माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्‍यावर तुझं अस्तित्व दिसू दे, तुझा अधिकार असू दे आणि इथे, अवचित एक गुपित सापडल्याचा भास लताबाई आवाजात देतात...

"मै जबसे उनके साथ बंधी. ये भेद तभी जाना मैने, कितना सुख है बंधन में!'

माहीत नव्हतं हे बंधन किती हवंहवंसं आहे ते. त्यातलं सुख आत्ता समजलं ! ‘रजनीगंधा’ हे संबोधन आहे. इथे लताबाई आपल्या आवाजाचा थ्रो बदलतात... प्रत्येक वेळी लताबाईंचा आवाज इथे बारीक होत जातो आणि ‘रजनी गंधा’चा "नी' म्हणताना तो इतका सुंदर वळवला जातो ‘हॉं यूँही महके प्रीत पियाकी मेरे अनुरागी मनमें’ ही ओळ अगदी आतलं गुपित सांगण्यासाठीच जणू अशी खाली खर्जात जाते. अगदी वेगळ्याच टोनमध्ये गायलेलं गाणं आहे हे.. आणि वाद्यमेळसुद्धा किती मर्यादित... एका गिटारवर सगळं गाणं उभं आहे. गिटार त्या गाण्याला आणखी romantic बनवतं हे खरं असलं, तरी मुळात सगळा अनुराग लताबाईंच्या आवाजात आहे...

********************************************

मुग्धा
कुछ दिल ने कहा
(चित्रपट- अनुपमा, गीत- कैफी आझमी, संगीत- हेमंतकुमार)

काही गाणी लताबाईंनी अगदी वेगळ्या आवाजात गायली. त्याचं कारण पटकथेत दडलेलं असायचं. ज्या भूमिकेला त्या आवाज देत असत, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, गाताना तिची भावनिक अवस्था कशी आहे, हे जाणून त्याप्रमाणे त्या आवाजाचा पोत ठरवत असत. एकाच प्रमुख भावनेच्याही ज्या अनेक छटा आहेत, त्यांचं दर्शन त्यांच्या त्या आवाज लावण्याच्या पद्धतीत होत असे. अनुपमा मधलं ‘कुछ दिल ने कहा’ हे याचं अगदी बोलकं उदाहरण... ती अनुपमा अबोल आहे... मुग्ध आहे. कधीही खुलून न बोलणारी... आक्रमकपणा तर तिच्या स्वभावात औषधालाही नाही... मनातलं सांगताना लताबाई सगळं गाणं कुजबुजत्या आवाजात गायल्या आहेत. गाण्यात काही जागा अशा येतात, की भावनेच्या आवेगात आवाजातली उत्तेजना वाढते; पण किंचीतच. कारण दुसऱ्याच क्षणी ती आवाज लगेच आत घेते. तिला वाटतं की जरा धिटाई जास्तच
झाली की ! बघा... ‘कलियोंसे कोई पूछता, हॅंसती है या रोती है ...़’ हा आवेग जरा जास्त आहे. मग हा मोती हळूच शिंपल्यात स्वतःला मिटून घेतो... तिथे चढलेला आवाज पुन्हा ‘ऐसी भी बातें होती है’ला अस्फुट आणि आत्ममुग्ध होतो. एकाच वेळी ती स्वतःशी बोलते आहे आणि निसर्गाशीही. कारण कैफीच्या शब्दांतला तो भेद त्या स्वरांतून जाणवतो. ‘ऐसी भी’ आणि ‘ऐसे भी’... फरक आहे दोन्हींत. असा संवाद असतो आणि अशा प्रकारेही संवाद होतो, यातला हा फरक आहे... किती सूक्ष्म हा विचार आहे... आणि तितक्‍याच सूक्ष्मपणे लताबाई तो पोचवतात त्यांच्या आवाजातून.

********************************************

व्यथिता
आज सोचा तो आंसू भर आये
(चित्रपट- हसते जख्म, गीत- कैफी आझमी, संगीत- मदन मोहन)

मदन मोहन हा एक जखमीच मन घेऊन आलेला... त्याच्या चाली गाताना तो विशिष्ट दर्द लताबाईंच्या आवाजात दिसला नाही तरच नवल... दर्द दिसला म्हणणंही चुकीचंच. त्या ठसठसत्या वेदनेत भिजून तो आवाज येतो. ‘आज सोचा तो आंसू भर आये...’ कैक वर्षं झाली, मी हसलेच नाही... काय असतं ते? आज त्या विचारानेही डोळे भरून येतायत... यात आयुष्यात एक मोठी पोकळी राहून गेली, हा भाव आहे. कसा व्यक्त होतो हा भाव? ‘आज’ हा शब्द नीट ऐकला तर त्यात लावलेला उतरी कोमल निषाद आपल्याला जाणवतोच. ‘दिल की नाजूक रगें टूटती है, याद इतना भी कोई न आये’...  या ओळी तर अक्षरशः जीव घेतात. यात ‘इतना’ या शब्दाचा उच्चार लताबाई विशिष्ट तऱ्हेने करतात. "त'वर किंचित जोर देऊन. "इत्तना' असा. नको ती तुझी आठवणही. इतका नको छळूस तुझ्या आठवांनी, की काळजाचे धागे तुटून जावेत... आज सोचा तो आंसू भर आये!

********************************************

विरहिणी...
चाँद फिर निकला
(चित्रपट- पेइंग गेस्ट, गीत- मजरूह सुलतानपुरी, संगीत- सचिन देव बर्मन) 


सचिन देव बर्मन खरं तर एक खुशमिजाज हिरवागार संगीतकार... फार कमी गाणी अशी होती त्यांची, की ज्यात तीव्र दुःख आहे. पण हे एक गाणं असं दिलं बर्मन साहेबांनी की काळजाचं पाणी पाणी झालं ऐकताना. कारण लताबाईंनी त्या विरहाला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं त्याला तोड नाही.

चॉंद फिर निकला, मगर तुम न आये,
जला फिर मेरा दिल, करूँ क्‍या मै हाये...

किती विध्द असा आवाज लावलाय लताबाईंनी... काय करू मी? तोच चंद्र... तशीच रात्र... पण तू नाहीच आलास. माझं काळीज

होरपळून निघालं; पण तू नाही आलास. "जला गये तन को बहारोंके साये!... ही बहार मला अंतर्बाह्य जाळून गेली.. तरीही तू नाही आलास. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी.. कान्हो वनमाळी वेगी भेटवा... हीच स्थिती,

आणि ‘सुलगते सीनेसे धुंआ सा उठता है...’ या जळणाऱ्या काळजातून हा भावनांचा निघणारा धूर... गुदमरून टाकणारा... आता तरी ये.. अंत पाहू नकोस...! हा घुसमटलेपणा आवाजातून दाखवणं या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात फक्त एकाच व्यक्तीला शक्‍य आहे... यातल्या त्या ‘दम घुटता है’... आणि ‘हाये’.. या शब्दांवरून किती जीव ओवाळावेत ते कमीच आहेत. लताबाईंमुळे या पातळीला आपलं मन तरी पोचतं... त्या तर जगल्यात ही भावना...

********************************************

अभिसारिका
तू चंदा मैं चाँदनी
(चित्रपट - रेश्‍मा और शेरा, गीत - बालकवी बैरागी, संगी - जयदेव)

जयदेव हा समजायला कठीण संगीतकार. सहज गाता येणार नाहीत अशाच रचना; पण मनातला कल्लोळ शब्दांत आणि स्वरांत अचूक उमटवण्यासाठी लागणारी प्रतिभा ठासून भरली होती जयदेवमध्ये. जयदेवसाठी गाताना लताबाईसुद्धा आवाजाचा थ्रो वेगळा ठेवतात. तू चंदा मै चांदनी गाणारी नायिका ही अभिसारिका आहे. प्रियकराला भेटायला आतुर झालेली. सतत त्याचं आणि

आपलं नातं कसं युगानुयुगांचं आहे हे सांगणारी. अखंड एकत्र राहण्यासाठीच जन्माला आलो... तू बादल, मै बिजुरी...! बिजुरी म्हणताना बिssssजुरी असं गातात त्या... तेव्हाच त्या ढगातच आपलं तेजस्वी अस्तित्व जपणारी सौदामिनी तळपून जाते...

तू पक्षी असशील रे, पण मी तुझे पंख बनून असेन तुझ्याच सोबत... तू वृक्ष असलास तर मी शाखा बनून तुझ्याच अस्तित्वाचा भाग बनून राहीन... आवाजातली ती धार, मिलनोत्सुक भाव कसा गडद होत जातो बघा... पहिल्या अंतऱ्यात ‘कहा बुझे तन की तपन....?’ हे सुचवलंय तेव्हासुद्धा आवाजात अतिधिटाई नाही तर सूचक भाव आहे. नंतर ‘तुझे आंचलमें रख्खुंगी ओ सावरे, काली अलकोंसे बांधूंगी ये पॉंव रे’... अशी आमिषं आहेत. या मोहपाशातून तो निघू शकेल का? लताबाईंचा आवाज या शब्दांवर इतका

मोहक आणि त्याच्यातला प्रियकर जागा करणारा आहे, की त्या सुखाच्या कल्पनेनेच तो धावत आला नाही तरच नवल. आणि तो आल्यावर ‘गल बैय्या वो डालूँ के छूटे नही...’ त्या प्रिय सखीने गळ्यात घातलेले हेच ते चांदण्यांचे हात. या बाहुपाशातून तो सुटणार कसा... आणि का..? या ओळींना बाई ती किंचित जास्त आतुरता दाखवतात आणि हळूहळू हे गाणं द्वैताकडून

अद्वैताकडे जाताना तो आवाजही तसाच... समरस होण्याच्या पातळीवर पोचतो...

ओ मेरे सावन सजन.. ओ मेरे सिंदूर... चार पहर की चॉंदनी मेरे संग बिता..

अपने हाथोंसे पिया मोहे लाल चुनर ओढा.. केसरिया धरती लगे अंबर लालम लाल रे...

बघ सगळं कसं एकाच लाल रंगात न्हायलंय. ही धरती, आकाश, माझी ओढणी... यातच तूपण मिसळून जा... आता दूर राहू नकोस..

‘अंग लगाकर सायबा कर दे मुझे निहाल रे.!’ हा ‘निहाल’ शब्द बाई असा काही उच्चारतात की द्वैतापासून अद्वैतापर्यंतचा हा प्रवास चरम बिंदूला पोचतो... आधी चंद्र- चांदणी, बादल- बिजुरी, पक्षी- पंख, वृक्ष- फांदी... ही प्रतीकं हळूहळू एकाकार होत जातात आणि लताबाई त्यांच्या आवाजातून या सुखबिंदूकडे आपल्याला नेतात... शब्दांची भाषा तर केव्हाच संपली, आता आहे ते एकच अस्तित्व... त्या केसरिया धरेत आणि अवकाशात विरून जाणं. ते क्षितिजही त्याच रक्तिमेत एकरूप होणं! हीच ती मधुरा, हीच मीरा, हेच अद्वैत, हाच मोक्ष... आणि हाच आहे शाश्वत आवाज... सगळ्या निकषांच्याही पलीकडे जाणारा...!

***************************************

***************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com