Happy Birthday Lata Mangeshkar : माझ्या दीदीचं गाणं...

मीना खडीकर
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

लता मंगेशकर नावाच्या दैवी सुराला वयाचं बंधन अजिबातच नाही. लता मंगेशकर या व्यक्तिमत्त्वाचं वय वाढत गेलं असलं, तरी त्यांच्या सुराला मात्र वयाची कसलीही बंधनं असल्यासारखी वाटत नाही. म्हणूनच, त्यांच्या गाण्याबद्दल बोलताना आजच्या गायक-गायिकांनाही अजून काही बोलावं, असंच वाटत राहतं. हा सूर आपल्या कानी आला, हे आपल्याला लाभलेलं भाग्यच आहे, असंच त्या म्हणतात. त्यांच्या लताप्रेमातून आलेले हे काही सूर.

लता मंगेशकर नावाच्या दैवी सुराला वयाचं बंधन अजिबातच नाही. लता मंगेशकर या व्यक्तिमत्त्वाचं वय वाढत गेलं असलं, तरी त्यांच्या सुराला मात्र वयाची कसलीही बंधनं असल्यासारखी वाटत नाही. म्हणूनच, त्यांच्या गाण्याबद्दल बोलताना आजच्या गायक-गायिकांनाही अजून काही बोलावं, असंच वाटत राहतं. हा सूर आपल्या कानी आला, हे आपल्याला लाभलेलं भाग्यच आहे, असंच त्या म्हणतात. त्यांच्या लताप्रेमातून आलेले हे काही सूर.

दीदींची सर्वच गाणी आम्ही ऐकतो आणि मला सर्वच गाणी आवडतात. दीदींच्या गाण्याविषयी बोलणं एकूण कठीणच. मी जरी तिची बहीण असले तरीही... आकाशाची उंची, पाण्याची खोली जशी आपण मापू शकत नाही तसंच काहीसं आहे तिच्या गाण्याचं. आम्ही पाचही भावंडं गातो. पण, दीदीचा आवाज आणि दीदींचं गाणं हे वेगळंच आहे. खूप ऊर्जा देतं तिचं गाणं. 

आज इतकी वर्षं आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे बहिणीचं प्रेम कायम माझ्यासोबत आहे. आम्ही धाकट्यांनी दंगा केला, तर तिनं प्रत्येक वेळी सांभाळून घेतलं आहे. आई-वडील या दोन्ही भूमिका तिनं आम्हा भावंडांसाठी उत्तम साकारल्या. चुका झाल्यावर आईच्या प्रेमानं समजावून पण सांगितलं आहे आणि वडिलांप्रमाणे दटावूनही सांगितलं आहे. दीदींच्या गाण्याबरोबरच ती खूप चविष्ट जेवणही बनवते. मला तिच्या हातचा वरण-भात फार म्हणजे फारच आवडतो, तर दीदीला माझ्या हातचा शिरा खूप आवडतो. शिवाय, तिखटात मटण फार आवडतं.

दीदी म्हणजे ईश्वरानं या जगाला दिलेली एक सुंदर भेटवस्तू आहे. तिचं प्रत्येक गाणं हे नव्यानं ऐकलं की ते नवीनच वाटतं.

दीदीनं तिच्या प्रत्येक गाण्याला योग्य न्याय दिला आहे, असं मी म्हणेन. कोणत्याच गाण्यात ती कुठं कमी पडली नाही. आम्ही घरात एकत्र बसलो की संगीताबद्दलही बोलतो. मात्र, कधीच विषय ठरवून आम्ही बोललो नाही. दीदीनं कधीच व्यावसायिक विषय घरात काढले नाहीत अथवा आमच्या घरात ते बोलले जात नाहीत. त्यामुळे अगदी खेळकर वातावरण आमच्या घरी असतं. एवढं नावाजलेल्या लोकांचं घर जरी असलं, तरी अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच राहणं आम्ही पसंत करतो. एकमेकांच्या टिंगल, नकला किंवा खोड्या काढायलाही आम्हाला आवडतात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांची चौकशी करतो, माझ्या मुलांनाही तिनं सांभाळलं आहे.

दीदीला हिंसक-मारधाड करणारे चित्रपट आवडत नाहीत. आशयघन चित्रपट आवडतात किंवा त्यात म्युझिकल अंदाज असेल, तर ती आवडीनं पाहते. ‘तुकाराम’, ‘ज्ञानेश्वर’ या चित्रपटांतील गाणी तिला आवडतात. एकत्र बसून आम्ही घरीच चित्रपट पाहतो. चित्रपटांपैकी जुने चित्रपट पाहायला आम्हाला जास्त आवडतं. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळाही द्यायला मिळतो. तसेच, दीदीला सैगलसाहेबांची गाणी अतिशय आवडतात. आवडीच्या गायकांपैकी ते एक आहेत. दीदी एक उत्तम छायाचित्रकारही आहे. तिला छायाचित्रं काढायला खूप आवडतं. खरं सांगायचं तर दीदींच्या मनाला पटतील अशाच गोष्टी ती करते, तिला कोणत्याच गोष्टींच प्रदर्शन करायला आवडत नाही. 

तिचं एक गाणं आवडलं असं म्हटले की दुसरं गाणं समोर दिसतं. तिचं एक आवडणारं गाणं सांगणे फारच कठीण आहे. माझ्याकडं तिच्या गाण्यासाठी शब्दच नाहीयेत. माझ्या वडिलांकडून थोडं फार गाण्याबद्दल ज्ञान दीदीला मिळालं. दीदीचा आवाज सगळ्यांपेक्षा वेगळा होता आणि त्यामुळे सर्वांनाच तो भावला. दीदी म्हणजे ईश्‍वरानं दिलेली दैवी देणगी आहे.

 

***************************************

Happy Birthday Lata Mangeshkar : मस्ती... दीदीची आणि माझी

Happy Birthday Lata Mangeshkar : विश्‍वकुटुंबिनी

Happy Birthday Lata Mangeshkar : एक शाश्वत स्वर

Happy Birthday Lata Mangeshkar : कृपाप्रसाद 

Happy Birthday Lata Mangeshkar : अलौकिक 

Happy Birthday Lata Mangeshkar : विद्यापीठ

Happy Birthday Lata Mangeshkar : चमत्कारच!

***************************************

इतर ब्लॉग्स