देशाची राजधानी कोरोनाच्या चक्रव्यूहात, कशी बाहेर पडणार?

delhi india
delhi india

नवी दिल्ली - देशाची राजधानी कोरोनाच्या चक्रव्यूहात सापडली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील स्थानीय सरकारने कोरोनाच्या रुग्णांचे संभाव्य संकट पाहता, मिळेल ती जागा रूग्णांच्या विलगीकरणासाठी तयार ठेवण्याचे काम चालविले आहे. काल आनंद विहार रेल्वेस्थानकावर "कोविद-19 आयसोलेशन कोच" असा फलक असलेली 270 डब्यांची अख्खी रेलगाडी स्थानकावर तैनात केली. तीवर जंतुनाशकांचा फवारा मारतानाचे छायाचित्र "दै. हिंदुस्तान टाईम्स"ने आज पहिल्या पानावर छापले आहे. ""राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांसाठी उभारण्यात आलेली इंदिरा गांधी संकुल, जवाहरलाल नेहरू संकुल, तालकटोरा संकुल, त्यागराज संकुल, प्रगती मैदान, 77 विवाह घरे, आदी देखील वापरली जातील,"" असा इशारा दिलाय.

दिल्लीपुढे करोनाचे संकट येत्या काळात किती गंभीर होणार आहे, याची पूर्वसूचना उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी 10 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांच्यानुसार, जुलै अखेर कोरोना -पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या तब्बल साडे पाच लाख होण्याची शक्‍यता आहे. 15 जून अखेर कोविद -19 चे 44 हजार., 30 जून अखेर एक लाख., 15 जुलै अखेर सव्वा दोन लाख व 31 जुलै अखेर साडे पाच लाख केसेस(रुग्ण) असतील. त्यांची शुश्रुषा करण्यासाठी किमान 80 हजार खाटांची आवश्‍यकता भासणार आहे. तेवढी जागा उपलब्ध नसल्याने दिल्लीतील अनेक हॉटेल्सचे (हॉटेल क्राऊन प्लाझा, हॉटेल सूर्या, हॉटेल जिवितेष, शेरेटन साकेत) रूपांतर कोरोना मेडिकल वॉर्डसमध्ये करण्यात आले आहे. दिल्ली व राजधानी लगतच्या प्रदेशाची (नॅशनल कॅपिटल रिजन) लोकसंख्या दोन कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढल्याने दिल्लीला लागून असलेल्या सीमा उत्तर प्रदेश व हरियानाने बंद केल्या होत्या. त्यामुळे लोकांचे बरेच हाल झाले. असे दिसते, की सरकारने कितीही तयारी केली, तरी सिसोदियांनी दिलेल्या आकड्यांकडे पाहता, ती अपूरी पडणार आहे."जशास तसे" म्हणून केजरीवाल यांनी उप्र व हरियाना राज्यातून येणाऱ्यांसाठी दिल्लीच्या सीमा बंद केल्या व ""दिल्लीतील रूग्णालये केवळ दिल्लीकरांसाठीच वापरली जातील,"" असेही जाहीर केले होत. तथापि, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी त्यांचा आदेश धुडकावून "" आरोग्यसेवा देशातील सर्वांसाठी खुल्या राहतील,"" असे जाहीर केले. उच्च न्यायालयानेही आदेश अमान्य केला. ""भारतीय नागरिकाला औषध-पाण्यासाठी देशाच्या कोणत्याही शहरात जाण्यापासून मज्जाव करता येणार नाही,"" असे खरमरीत मत व्यक्त केले. केजरीवाल यांचे काही चालले नाही. 

दिल्लीत रोज अंदाजे दोन हजार कोरोना बाधित रूग्णांची भर पडत आहे, तीकडे पाहता दिल्ली " कोरोना कॅपिटल ऑफ इंडिया " होण्याची शक्‍यता अधिक. काही वर्षांपूर्वी निर्भयाचे प्रकरण झाले,तेव्हा दिल्ली "क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया" बनली होती. गेल्या दोन वर्षात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचे वर्णन " पोलूजन कॅपिटल ऑफ इंडिया" असे करण्यात आले होते. राजघानीचे शहर असल्याने जगापुढे एक आदर्श शहर म्हणून दिल्लीची ख्याती असावयास हवी. मुंबई गलिच्छ असली, तरी देशाची आर्थिक राजधानी व चित्रपट नगरी आहे. तिचे आकर्षण वेगळे आहे. दिल्लीहून देशाची राजकीय सूत्रे चालतात, म्हणून तिला वेगळे महत्व आहे. 

राजधानीत भाजप आघाडीचे केंद्र सरकार व आम आदमी पक्षाचे राज्य सरकार अशी दोन परस्पर विरोधी सरकारं आहेत. त्यांच्यात सतत चालू असलेल्या "मै मै, तू तू" च्या संघर्षामुळे स्थानीय प्रशासन खिळखिळे झाले आहे. कोरोनाचे संकटाने त्यात भर टाकल्याने व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाले नाही, तरच नवल. 2 मार्च 2020 रोजी करोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. तेव्हापासून लागण झालेल्यांची संख्या 15 जून अखेर 42,829 झाली असून, 1837 रूग्ण दगावले. 6,427 बरे झाले. 42 हजार 829 पैकी 25002 सक्रीय केसेस आहेत. येथे कोरोनाबाधित लोकांची संख्या वाढण्याचे कारण दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकावरून बिहार व उत्तर प्रदेशला जाणाऱ्या हजारो मजुरांनी सोशल डिस्टंसिंग न पाळता 29 मार्च रोजी केलेली गर्दी, पश्‍चिम निजामुद्दीन परिसरात निजामुद्दीन मरकझ मशिदीत जमलेल्या तीन हजार अनुयायांनी कोणतेही नियम न पाळता केलेला जमाव ही होत त्यातून संसर्ग वेगाने वाढला. एरवी, टाळेबंदीच्या काळात दिल्लीकरांनी बव्हंशी आदेशांचं पालन केलं. 

दिल्लीची करोनाविषयक स्थिती हाताबाहेर जाईल व त्यासाठी केवळ केजरीवाल सरकारला दोष देऊन चालणार नाही, जबाबदारी केंद्रालाही घ्यावी येईल, याची जाणीव झाल्याने की काय, गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री केजरीवाल व नायब राज्यपाल यांची बैठक घेऊन एकत्रित कृती व समन्वय करण्याचे ठरविले. दरम्यान, केजरीवाल यांना ताप आल्याने त्यांच्यावर करोनाची चाचणी करण्यात आली. त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने चाचणी नकारात्मक ठरली. दिल्लीचे आरोग्य मंत्री जितेंद्र जैन यांना कोरोनाच्या शंकेमुळे राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या चाचणीचा निष्कर्षही नकारात्मक होता. 

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मंगळावारी एका दिवसात 93 मृत्यू झाले.करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे देशातील प्रमाण 3.3 ट्‌के आहे, तथापि, दिल्लीचे प्रमाण 4.1 टक्के आहे. चाचणी करण्याचे प्रमाण कमी असल्याने लागण झालेल्यांचे नेमके प्रमाण कळत नव्हते. परंतु, दिवसाकाठी होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण 7786 वर नेल्याने अधिक तपशील बाहेर येतील. टाळेबंदी जवळजवळ उठल्याने लोकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झालेत. मॉल्स व बाजारपेठा सुरू होऊनही त्यात फूटफॉल मात्र नाही. चित्रपट गृहे बंद आहेत. रेस्टॉरन्टस्‌मध्ये तुरळक गर्दी दिसते. दिल्लीची शान असलेल्या कॅनॉट प्लेस बाजारपेठेचा फेरफटका मी काल मारला. तेथेही अनेक दुकाने खुली होती. परंतु, ग्राहक नव्हते. बाजाराच्या कॉरिडॉरमधून "विंडोशॉपिगं" करणारे काही तरूण तरूणी दिसले.

 दिल्ली सरकारने घराबाहेर मुखपट्टी लावणे सक्तीचे केले आहे व ""जो ती घालणार नाही, त्याला पाचशे रूपये दंड होईल,"" असेही जाहीर केले. परंतु, झोपडपट्ट्यातून नियम क्वचितच पाळला जातोय. त्यांच्याकडे पोलीस गेले, तरी ""दंड भरण्यासाठी पैसे नाही,"" असे कारण ते देतात. परिणामतः करोनाची नकळत लागण सुरू आहे. दिवसागत आकडा वाढतोय. दिल्लीत करोना लागणीचे 242 "हॉट स्पॉट्‌स" (कन्टेनमेन्ट झोन्स) आहेत. त्यांची संख्या वाढतेय. ही संख्या सहा आठवड्यात शंभरवरून 242 वर गेली. यावरून संसर्गाचे गांभीर्य ध्यानी यावे. करोनाच्या दुष्टचक्रातून दिल्लीसह देश केव्हा बाहेर येणार, ही चिंता सरकार व प्रत्येक नागरिकाला पडली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com