'आत्मनिर्भर भारत' म्हणजे काय? पंतप्रधान मोदींनी सांगितला अर्थ

modi 1
modi 1

नवी दिल्ली, ता. १८ : देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि आज आयात होणाऱ्या वस्तूंचेच उद्या आपण सर्वांत मोठे निर्यातदार बनायचे लक्ष्य ठेवणे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या घोषणेचा नवा अर्थ सांगितला. सरकारी निर्बंधांचा अडसर दूर करून खासगी क्षेत्राला मुभा देऊन कोळसा खाणींची खरेदी-विक्री व्यावसायिक पातळीवर सुरू करण्याची सुरवात आज लिलावाद्वारे झाली. 

देशातील ४१ कोळसा खाणींच्या ऑनलाइन लिलावाचे ऑनलाइन उद्‌घाटन पंतप्रधान मोदींनी केले. कोळसा व खाण मंत्रालयाने ‘फिक्की’च्या सहकार्याने ४१ कोळसा खाणींचा लिलाव सुरू केला. यामुळे हे क्षेत्र खासगी उद्योगांसाठीही खुले झाले आहे. जिथल्या वरिष्ठाधिकारीच गंभीर कोरोनाग्रस्त निघाल्याने बंद केलेल्या व दीर्घकाळानंतर पुन्हा खुले झालेल्या राष्ट्रीय माध्यम केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात कोळसा व खाणमंत्री प्रल्हाद जोशी व इतर उपस्थित होते. यामुळे भारताला ऊर्जा क्षेत्रातही जागतिक पातळीवरील निर्यातीची मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाशी लढून आपण जिंकू व या मोठ्या संकटाचे संधीत रूपांतर करून जगाला दाखवू, असा विश्वास व्यक्त करून मोदी म्हणाले की, कोळसा-खाण, कृषी, लघू-मध्यम उद्योग या क्षेत्रात गेल्या महिनाभरात झालेल्या सुधारणा हेच दाखवतात की महामारीच्या संकटाचे संधींमध्ये रूपांतर करण्यात भारत किती कटिबद्ध आहे. 

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, कोळसा खाणींचा व्यावसायिक पातळीवर लिलाव सुरू करून आम्ही या क्षेत्रातील अनेक वर्षांचा लॉकडाउन संपविला आहे. आम्ही २०३० पर्यंत १०० दशलक्ष टन कोळशापासून गॅसनिर्मितीचे लक्ष्य समोर ठेवले आहे. यासाठी चार क्षेत्रांतील उत्पादनांची निवड करण्यात आली आहे. यातून किमान २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. भारतात जगातील चौथ्या क्रमांकाचे प्रचंड मोठे कोळसा साठे असून व दुसरा सर्वांत मोठा कोळसा उत्पादक देश असूनही भारतातून कोळसा निर्यात होणे सोडाच, पण दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आपण आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com