सीतारामन म्हणाल्या, 'अर्थव्यवस्था संकटात नाही; 'एफडीआय' वाढलाय!'

FM-Nirmala-Sitharaman
FM-Nirmala-Sitharaman

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था संकटात नाही आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या फलिताची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच 'पाच ट्रिलियन' अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (ता.११) संसदेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या उत्तरात दिली.

थेट परकी गुंतवणुकीत वाढ, कारखान्यांच्या उत्पादनात वाढ आणि एक लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटीची प्राप्ती, या गेल्या तीन महिन्यांतील घडामोडी लक्षात घेता अर्थव्यवस्था मार्गी लागण्याची ही चिन्हे आहेत, असा दावाही त्यांनी केला. 

अर्थव्यवस्था पुन्हा मार्गी लागण्याची चिन्हे वर्णन करताना त्यांनी शेअर बाजारातील तेजी आणि परकी चलन गंगाजळीच्या विक्रमी साठ्याचा दाखलाही दिला. जागतिक पातळीवर भारताला अनुकूल अशी लक्षणे आढळून येत असल्याचा दावा करून त्या म्हणाल्या की, परकी गुंतवणूकदार अजूनही भारताला एक विश्‍वासपात्र गुंतवणूक स्थान म्हणून झुकते माप देत आहेत. त्यामुळेच एप्रिल ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत 24.4 अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूक भारतात झाल्याची माहिती त्यांनी दिली.

फॉरेन पोर्टफोलियो गुंतवणूकही 12.6 अब्ज डॉलर्स इतकी झाल्याचे त्या म्हणाल्या. जानेवारी 2020 मधील जीएसटी महसूलप्राप्ती 12 टक्‍क्‍यांनी वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही माहिती देऊन त्या म्हणाल्या की, गेल्या वर्षीच्या अखेरीस नकारात्मक वाढ नोंदविली गेली होती; तरी या वर्षाच्या सुरुवातीपासून वाढीने उचल खाल्लेली आढळते व त्यामुळेच अर्थव्यवस्था मार्गी लागत असल्याची ही चिन्हे मानली जात आहेत. 

खासगी गुंतवणूक, खासगी खप व मागणी, सार्वजनिक गुंतवणूक आणि निर्यात, हे अर्थव्यवस्थेच्या वाढीचे चार प्रमुख घटक असून, सरकारने त्यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. सार्वजनिक गुंतवणुकीचा प्रमुख प्रयत्न म्हणून सरकारने काही महिन्यांपूर्वीच 102 लाख कोटी रुपयांचे राष्ट्रीय पायाभूत प्रकल्प जाहीर केले आहेत. येत्या चार वर्षांत त्यावर काम केले जाणार आहे. मागणी व खपवाढीसाठी रब्बी व खरीप हंगामातील सर्व किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

वित्तीय तुटीचे उद्दिष्ट चुकल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी यूपीए सरकारच्या काळातही असा प्रकार घडला असल्याचा दाखला दिला व वर्तमान वाढत्या वित्तीय तुटीचे समर्थन केले. महसुली टंचाईमुळे वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठता आले नाही, असे त्यांनी सांगितले. 

रोजगारनिर्मितीचे दावे 

बेराजगारीच्या मुद्द्यावर बोलताना निर्मला सीतारामन यांनी विविध रोजगारनिर्मिती योजनांचे दाखले देऊन काही लाख रोजगारांची निर्मिती झाल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर विरोधी पक्षांकडून उपरोधिक टिप्पण्या झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com