जवान चीनशी वीस तास झुंजले; 21 जवानांची शौर्य पुरस्कारासाठी शिफारस

Abdul-Kalas
Abdul-Kalas
Updated on

शौर्य पुरस्कारासाठी शिफारस
नवी दिल्ली - लडाख सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना सामोरे जाणाऱ्यांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबतच भारत-तिबेट पोलिस दलाचे (आयटीबीपी) जवानही आघाडीवर होते.  सतरा ते वीस तास चाललेल्या या संघर्षात दगडफेक करणाऱ्या चिनी सैनिकांचा त्यांनी कणखरपणे मुकाबला करून त्यांना थोपवले तसेच सीमेवरील परिस्थितीवर नियंत्रणही मिळवले. ‘आयटीबीपी’च्या जवानांनी लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढताना जखमी जवानांना सुरक्षित परत आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीमेवर खंबीरपणे उभे राहून चीनला प्रत्युत्तर देणाऱ्या  या २१ जवानांना शौर्य पुरस्कार देण्याची शिफारस आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान, ‘आयटीबीपी’च्या २९४ जवानांना आज प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

त्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आल्याचे ‘आयटीबीपी’तर्फे जाहीर करण्यात आले. मे, जून या कालावधीत लडाख सीमेवर चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षाचा या निमित्ताने प्रथमच अशा प्रकारे खुलासा झाला आहे.  त्या पार्श्वभूमीवर, ‘आयटीबीपी’चे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी या संघर्षात पराक्रम गाजविलेल्या २९४ जणांना महासंचालक प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांच्या शौर्याचा गौरव करतानाच २१ जणांची शौर्य पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारसही केली. त्याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम राबविणाऱ्या ६ जवानांनाही पुरस्कार देऊन गौरविले. 

कोरोनीशी दोन हात
कोरोनाशी संघर्ष करणारे ३१८ आयटीबीपी कर्मचारी आणि ४० इतर केंद्रीय पोलिस दलाच्या जवानांच्या नावाची गृहमंत्र्यांच्या विशेष कर्तव्य पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आयटीबीपीने देशातील पहिले १००० खाटांचे क्वारंटाइन केंद्र छावला (हरियाना) मध्ये तयार केले. तसेच दिल्लीत १० हजार खाटांचे कोविड केअर सेंटर आणि रुग्णालय देखील सुरू केले आहे.

अब्दुल कलास यांना कीर्तिचक्र
जम्मू-काश्मीर पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद कलास यांना अतुलनीय शौर्याबद्दल मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार अलोककुमार दुबे, मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडर मेजर अनिल आणि  आणि पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल क्रिशनसिंह यांना यंदाचा शौर्यचक्र सन्मान जाहीर झाला आहे.

यासोबतच पाच बार टू सेना पदके (शौर्य), ६० सेना पदके (शौर्य) आणि १९ मेन्शन इन डिस्पॅच (ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन रक्षक मोहिमेतील शौर्याबद्दल) या सन्मानांच्या माध्यमातून लष्करी जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे सन्मान जाहीर करण्यात आले. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १६ जणांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येईल. 

सेनापदक मिळविणाऱ्यांमध्ये मराठा लाईट इन्फन्ट्रीचे हवालदार विकास वसंत पवार, शिपाई विकास तुकाराम पाटील, शिपाई दीपक तुकाराम सकपाळ, शिपाई विकास साईनाथ कापसे या मराठी वीरांचाही समावेश आहे.  फ्लाइट लेफ्टनंट करण रणजित देशमुख यांचा वायूसेना पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. 

दहशतवाद्यांना भिडणारे कलास
हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद कलास यांना मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर झाले असून कलास हे विशेष कृती पथकाचे सदस्य आहेत. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागामध्ये भारतीय सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती, यावेळी दहशतवाद्यांना भिडणाऱ्या जवानांमध्ये कलास यांचाही समावेश होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना कलास हुतात्मा झाले होते. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणारे दहशतवादी या चकमकीमध्ये ठार झाले होते. एका अर्थाने कलास यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. या संघर्षामध्ये सुरक्षा दलाचे पाच कर्मचारी हुतात्मा झाले होते, त्यामध्ये तीन जवान आणि एका मेजरचाही समावेश होता.

जम्मू-काश्मीरमध्ये २२ जून २०१९ रोजी लष्कराने दहशतवाद्यांना शोधण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या राजपूत रेजिमेंटच्या ४४ व्या बटालियनचे हवालदार अलोककुमार दुबे यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला ठार केले होते.  स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी अन्य चौघा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

ऑपरेशन रक्षकमध्ये सहभागी झालेले मराठा लाइट इन्फन्ट्रीचे शिपाई संतोष मनलाल भगत आणि राहुल भैरू सुलगेकर यांचाही सन्मान ‘मेन्शन इन डिस्पॅच’द्वारे करण्यात आला आहे. 

घुसखोरांना रोखले
पॅराशूट रेजिमेंटचे सेना पुरस्कार विजेते लेफ्टनंट कर्नल क्रिशनसिंग रावत यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ताबारेषेवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घुसखोरांना रोखण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमध्ये पराक्रम गाजवला होता. घुसखोरांकडून प्रचंड गोळीबार सुरू असताना लेफ्टनंट कर्नल रावत यांनी सरपटत जाऊन समोरून येणाऱ्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना शौर्यचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.

तोफांना भिडणारे मेजर अनिल
जम्मू- काश्मीरमध्येच नियंत्रण रेषेवर तैनात असताना मराठा लाइट इन्फंट्रीचे कंपनी कमांडर मेजर अनिल यांनी दहशतवाद्यांच्या टोळीशी सामना करताना तिघांना यमसदनी धाडून शौर्याचा परिचय दिला होता. ताबारेषेवर शत्रूकडून तोफगोळ्यांचा मारा सुरू असताना मेजर अनिल यांनी जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या नेतृत्व कौशल्यामुळे उर्वरित दहशतवाद्यांना टिपण्यात लष्कराला यश आले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com