रस्त्यावर नमाज चालतात, तर जन्माष्टमी का नको? - आदित्यनाथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

यदुवंशी म्हणवून घेणाऱ्यांनी पोलिस लाईनमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यावर निर्बंध घातले होते.

लखनौ : "ईदचा नमाज रस्त्यांवर पढण्यापासून रोखू शकत नाही, तर पोलिस ठाण्यांत, पोलिस लाईनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यावर रोख लावण्याचाही हक्क नाही," असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस वसाहतींमधील जन्माष्टमी सोहळ्यांचे समर्थन केले. 

यदुवंशी म्हणवून घेणाऱ्यांनी पोलिस लाईनमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यावर निर्बंध घातले होते, अशा शब्दांत आधीच्या समाजवादी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधत बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरील विधान केले. 

मुख्यमंत्री 'केजीएमयू'च्या वैज्ञानिक परिषद केंद्रात लखनौ जनसंचार तथा पत्रकारिता संस्था व प्रेरणा जनसंचार नोएडा यांच्या वतीने दूरस्थ शिक्षणाबाबत प्रबोधन व केशव संवाद पत्रिकेच्या विशेषांक अंत्योदयच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. 

आदित्यनाथ म्हणाले, "पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पाच दशकांपूर्वी जी मुल्ये आणि मुद्दे पुढे ठेवली त्यालाच अनुसरून केंद्र व राज्य सरकार समर्थपणे पुढे वाटचाल करत आहे."

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news yogi adityanath supports janmashtami in police line