
सावधान! SBI खातं ब्लॉक झाल्याचा मॅसेज तुम्हाला येऊ शकतो, वाचा काय आहे प्रकरण
ग्राहकांची फसवणूक करणारे अनेक प्रकरणे समोर येतात. हल्ली बनावट मेसेज पाठवून त्यांना चुकीच्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकरणात फसणाऱ्यांची वैयक्तिक माहिती हॅक करून त्यांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार घडतात. सध्या एसबीआयच्या (SBI) ग्राहकांसाठी एक मॅसेज व्हायरल होत आहे. या मॅसेजमध्ये एसबीआयच्या नावाचा वापर ग्राहकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला एसबीआयचा कोणता मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा.
या मॅसेजमध्ये एक लिंक दिली असून एसबीआय खाते ब्लॉक करण्यात आले असे सांगितले आहे. कागदपत्र अपडेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे. हा मॅसेज सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र पीआयबीने हा मॅसेज खोटा असल्याची माहिती दिली आहे.
पीआयबीने या मेसेजची सत्यता पडताळून पाहिली. असा कोणताही मेसेज बँकेकडून पाठवण्यात आला नसून हा मेसेज फेक असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे. सोबतच तुमची वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या मेल्स आणि एसएमएसना रिप्लाय देऊ नका आणि तुम्हाला देखील असा मेसेज आला असल्यास report.phishing@sbi.co.in वर तक्रार दाखल करा, असे आवाहन पीआयबीने केले आहे.