esakal | उत्सव सर्जनशील देखाव्यांचा
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव सर्जनशील देखाव्यांचा

उत्सव सर्जनशील देखाव्यांचा

sakal_logo
By
अभय जेरे, चीफ इनोव्हेशन ऑफिसर, भारत सरकार

गणपती हे बुद्धीचे दैवत, त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्जनशीलतेला जास्तीत जास्त वाव मिळावा. सार्वजनिक देखाव्यांमधूनही नव्या आव्हानांचे, प्रेरणांचे, नव्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पडले पाहिजे.

लोकमान्य टिळकांनी पुण्यात १८९३मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांचा हेतू लोकांना एकत्र आणणे, स्वातंत्र्यलढ्याला विचार पसरवणे हा होता. गेल्या १२० वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव बराच विस्तारला असून देशात लाखो गणेश मंडळे आहेत व त्यात कोट्यवधी लोक सहभागी होतात. मी मुळचा पुणेकर. नारायण पेठ व लक्ष्मी रोडसारख्या भागात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्य केल्याने गणेशोत्सव माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मी आजही मोठ्या उत्कंठेने या महोत्सवाची वाट पाहात असतो. या काळात मी पुण्यात नसलो तर चुकल्यासारखे वाटत राहते. माझ्या या भावनांशी अनेक वाचक सहमत होतील.

हेही वाचा: पारंपरिक गौरींच्या मुखवट्यांना नेहमीच्याच उत्साहात प्रतिसाद!

गणपतीची मूर्ती घरी आणणे व मंदिराची सजावट हा अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येक गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची ‘प्राणप्रतिष्ठा’ कोणी करायची, यावर धाकट्या भावाशी माझा वाद होई व पालकांना मध्यस्थी करावी लागत असे. माझे पालक धाकट्या भावाची बाजू घेत व बहुतांश वेळा हा मान त्यालाच मिळत असे. या उत्सवाच्या काळात धमाल असायची. त्या वेळी अॅनिमेशन, रोबोटिक्स किंवा अॅग्युमेंटेड व व्हर्च्युअल रिअॅलिटीसारखे तंत्रज्ञान नव्हते. साधा हलता देखावाही खूप मोठी गोष्ट असायची व तो आम्ही तासन् तास पाहात असू. मात्र, जाणते-अजाणतेपणे या देखाव्यांचा आमच्यावर खूप मोठा परिणाम झाला. या देखाव्यांतून आम्ही हुंडाबळी, बालविवाह, लोकसंख्यावाढ, जातिव्यवस्था आदींबद्दल संवदेनशील झालो. या देखाव्यांच्या माध्यमातून गणेश मंडळांनी लोकशिक्षणाचे काम केले. सजग नागरिकत्वाचे धडे या देखाव्यांतून मिळत. स्वच्छ भारत, पर्यावरणातील बदल, बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान, ‘मेक इन इंडिया’ यांबद्दल जागरूकता निर्माण केली ती देखाव्यांनी, हेही आपण पाहिले.

हेही वाचा: बाप्पाच्या नैवेद्यासाठी सहा प्रकारच्या ‘फ्लेवर'चे मोदक बाजारात

धोका पत्करण्याचा संस्कार

गणेश मंडळांनी आता भविष्याचा विचार करीत व बदलती जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांचे मानस घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी. आज देशात तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे. ही तरुणाई महत्त्वाकांक्षी आहे व गणेश देखावे या महत्त्वाकांक्षांना पूरक असावेत. देश येत्या पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, तर त्यापुढील ५ वर्षांत १० ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ही ध्येये प्राप्त करायची असल्यास ज्ञानाधारित समाज व अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासाठी नवी दृष्टी विकसित व्हायला हवी. तरुणांना ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करायला, बौद्धिक संपत्तीची निर्मिती करायला व नव्या कल्पनांवर काम करायला सांगावे लागेल. नवकल्पना साजऱ्या करायच्या ही गोष्ट रुजली पाहिजे. त्या कल्पनांचे कौतुक केले पाहिजे व पाठिंबाही दिला पाहिजे. आपल्यातून उद्योजक तयार व्हावेत. नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकऱ्यांची निर्मिती करणारे होण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी इनोव्हेशन्सवर भर द्यायला हवा. इनोव्हेशन्समधून यशस्वी स्टार्टअप्सची निर्मिती केली पाहिजे व त्यातून देशासाठी संपत्तीची निर्मिती केली पाहिजे. जगभरातील लोकांना सहज वापरता येतील, अशी उत्पादने विकसित करावीत. समाजाला भविष्यवेधी विचार करायला आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करावे. गणेश मंडळे या संकल्पना समाजात खोलवर पोचाव्यात यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. लोकांमध्ये ‘थिंक ग्लोबल’ हा विचार रुजवला पाहिजे.

हेही वाचा: Ratnagiri : भालाफेकपटू नीरजच्या रूपात साकारले बाप्पा

‘चीफ इनोव्हेशन ऑफिसर’ या नात्याने जेव्हा मी युवकांना भेटतो, तेव्हा ते स्टार्टअप सुरू करण्यासंदर्भात उत्साही असतात, मात्र त्यांचे पालक, नातेवाईक, जोडीदार अपयश येईल, या भीतीने त्यांना परावृत्त करतात. आपण जाणते-अजाणतेपणे अनेक चांगल्या कल्पना केवळ अपयशाच्या भीतीने मारून टाकतो. त्यामुळेच प्रश्नांची उत्तरे शोधणारा व कल्पना विकसित करणारा समाज तयार होत नाही. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण पाश्चात्त्यांकडे पाहतो. हे चित्र बदलायला हवे. आपण ‘आत्मनिर्भर’ बनायला हवे. इस्राईल हेच करतो. हा देश कायम नवकल्पनांवर काम करतो, अपयश आले तरीही त्यांना प्रोत्साहन देतो आणि पुन्हा प्रयत्न करण्यास प्रेरणा देतो. त्यामुळे इस्राईल ‘स्टार्टअप नेशन’ म्हणून जगासमोर आला. भारतात एखाद्याला अपयश आल्यास आपण त्याला कमी लेखतो, अपयश कलंक आहे असे मानतो आणि त्यांच्यावर अयशस्वी असा शिक्का मारून मोकळे होतो. आपल्याला या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे! आपण आपल्या समाजाला धोका पत्करणे योग्य असल्याचे सांगायला हवे व त्यांना पाठिंबा द्यायला सांगितले पाहिजे. या लोकांना यशस्वी होण्यासाठी समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात दिला पाहिजे. लोकांच्या मनात हेही बिंबवले पाहिजे, की आपल्या स्वप्नातील भारताच्या निर्माणामध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. गणेश मंडळे आपल्या देखाव्यांद्वारे या चर्चेची सुरूवात करण्यास नक्कीच समर्थ आहेत.

हेही वाचा: Pune : अशी करू या घरगुती गणेशोत्सवाची तयारी

रोडमॅप तयार व्हावा..

खरे तर २५ वर्षांपूर्वीच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपण कुठे असू, याचे मंथन व्हायला हवे होते. यापूर्वी आपण भविष्याचा फारसा विचार करीत नव्हतो, मात्र आता त्यात बदल घडावा. स्वातंत्र्याला २०४७मध्ये शंभर वर्षे होतील, तेव्हा देश कसा असावा, या संबंधीचा रोडमॅप तयार करण्यासाठी विचारमंथन लगेचच सुरू करायला हवे. तो तुमच्या शहराचा किंवा राज्याचा असला, तरी हरकत नाही. हे विचारमंथन गणेश मंडळे देखाव्यांच्या माध्यमातून सुरू करू शकतील. मंडळांनी संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या १७ उद्दिष्टांकडे लोकांचे लक्ष वेधायला हवे. त्यामुळे आपण विकासाचा विचार करीत असताना शाश्वत विकासाचीही चर्चा करू व त्यातून पृथ्वीची काळजी घेऊ शकू. या वर्षी गणेश मंडळे आपल्या पारंपरिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन देखाव्यांसाठी नव्या कल्पनांचा व इतर कार्यक्रमांचा विचार करतील व त्यातून उदयोन्मुख भारताशी त्यांची नाळ जोडली जाईल.

(लेखक शिक्षण मंत्रालयामध्ये ‘चीफ इनोव्हेशन ऑफिसर’ आहेत.)

loading image
go to top