esakal | Ganesh Festival 2021 : ‘घालीन लोटांगण‘ ही रचना कोणी केली? त्याचा भावार्थ काय?
sakal

बोलून बातमी शोधा

‘घालीन लोटांगण‘ ही रचना कोणी केली? त्याचा भावार्थ काय?

‘घालीन लोटांगण‘ ही रचना कोणी केली? त्याचा भावार्थ काय?

sakal_logo
By
टीम सकाळ

‘घालीन लोटांगण ‘ ही प्रार्थनाही सर्वांच्या पाठ असते. या प्रार्थनेत एक लय आहे. शब्दांना मधुर नाद आहे. प्रत्येक आरतीची रचना कोणी केली आहे ते आरतीतील शेवटच्या ओळींवरून सहज लक्षात येते. परंतु ‘ घालीन लोटांगण ‘ ही रचना कोणी केली आहे ते सहसा कोणाच्या लक्षांत येत नाही. कारण त्या पाच कडव्यांमध्ये काही कडवी मराठीत आहेत तर काही संस्कृतमध्ये आहेत. ही प्रार्थना कोणी एका कवींनी केलेली नाही.या पाचही कडव्यांचे रचनाकार हे वेगवेगळे आहेत. तसेच या सर्व कडव्यांच्या रचना वेगवेगळ्या कालखंडात केल्या गेल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीगणेश पूजन व आरती झाल्यानंतर ‘ घालीन लोटांगण ‘ ही प्रार्थना म्हणत असलो तरी या प्रार्थनेतील कोणताही भाग हा केवळ गणेशाला उद्देशून नाही.

‘ घालीन लोटांगण ‘ या प्रार्थनेत एकूण जी पाच कडवी आहेत ती पूर्वी सध्या आपण म्हणतो त्याप्रमाणे एकदम म्हटली जात नसावी. प्रथम पहिले कडवे म्हटले जात असावे. नंतर कालांतराने दुसरे, तिसरे, चौथे व पाचवे कडवे म्हणण्याची प्रथा पडली असावी.

आज आपण ‘ घालीन लोटांगण ‘ या प्रार्थनेतील प्रत्येक कडव्याची रचना कुणी केली, कोणत्या कालात त्याची रचना झाली आणि त्यांचा भावार्थ काय आहे याची आज माहिती करून घेणार आहोत.

हेही वाचा: चित्रकार मस्केने साकारले पडीक जमिनीवर 15 बाय 30 फुटांचे गणराय !

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।

डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।

प्रेमे आलिंगिन, आनंदे पूजिन ।

भावें ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

पहिल्या कडव्याची ही रचना संत नामदेवांची आहे. या पहिल्या कडव्याचा अर्थ आणि शरणागत भाव सांगण्याचीही जरूरी नाही. इतका त्याचा अर्थ सोपा व सहज समजण्याजोगा आहे. संत नामदेव ( इ. सन १२७० —इ. सन १३५० ) हे वारकरी संप्रदायाचे एक महान संतकवी होऊन गेले. संत नामदेवांचे बालपण पंढरपूर क्षेत्री गेले त्यामुळे बालवयातच नामदेवांच्या मनावर विठ्ठलभक्तीचे संस्कार घडले. संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. त्यांची सुमारे २५०० अभंग असलेली ‘ अभंग गाथा ‘ प्रसिद्ध आहे. त्यांनी १२५ पदांची रचना हिंदीमधूनही केली आहे. त्यांच्या ६२ काव्यरचना शिखांच्या गुरू ग्रंथ साहिबात समाविष्ट आहेत.

हेही वाचा: हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक 'सोन्या मारुती गणपती'!

त्वमेव माता पिता त्वमेव ।

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

दुसर्या कडव्याची ही रचना आद्य श्रीशंकराचार्यांची आहे. गुरुस्तोत्रामध्ये गुरूसंबंधी अनेक श्लोक आहेत त्यामध्ये ही रचना अंतर्भूत करण्यात आली आहे. म्हणजेच या कडव्याची रचना सातव्या-आठव्या शतकामधील आहे. शंकराचार्य परब्रह्माला म्हणतात- “हे परमेश्वरा, तूच माझी माता, तूच माझा पिता आहेस, तूच माझा बंधू आणि तूच माझा सखा आहेस. तूच शाश्वत अंतिम असे ज्ञान आहेस. तूच माझे खरे धन आहेस. हे परमेश्वरा, तूच माझे सर्व काही आहेस.’ परमेश्वराच्या ठिकाणी आद्य शंकराचार्य अत्यंत लीन होत असत. अतिशय विनम्र भावाने त्यांनी आपली तळमळ व्यक्त केली आहे. आद्य शंकराचार्य हे महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार धर्मसाम्राज्याचे संस्थापक होते. हे एक महान विभूती होते. अज्ञानाच्या अंधकारात होरपळलेल्या समाजाला त्यांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेक धर्म, पंथ यांनी समाजस्वास्थ्य बिघडवले होते.लोकांच्या मनांत आदर्शाविषयी गोंधळ निर्माण झाला होता. अशावेळी शंकराचार्यांनी धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचे केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: 'सुखकर्ता, दु:खहर्ता‘ आरती सर्वप्रथम का म्हटली जाते?

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।

बुध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।

करोमि यद्यत्सकलं परस्मै ।

नारायणायेति समर्पयामि ॥३॥

हे तिसरे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील आहे. श्रीमद्भागवताचा काळ म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. भागवत पुराणाचे लेखन महर्षी व्यासमुनींनी केले आहे. प्रत्यक्ष परब्रह्म कृष्णरूपाने सगुण रूपात अवतरले आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. म्हणूनच पुराणांचे विभाजन करून त्यांनी आपल्यालशिष्यांकडून अठरा पुराणे तयार करवून घेतली. त्याचप्रमाणे श्रीमद्भागवताचेही नंतरच्या काळात त्यानी लेखन केले आणि कृष्ण चरित्रात मन पूर्णपणे गुंतून गेल्याने त्यांचे मन शांत झाले. ते त्या नारायणाला म्हणजेच श्रीकृष्णाला म्हणतात — “ शरीराने, वाणीने, मनाने आणि सर्व इंद्रियांनी जाणीवपूर्वक किंवा नैसर्गिक स्वभावाप्रमाणे जे जे कर्म मी करतो ते ते मी नारायणाला म्हणजेच श्रीकृष्णाला अर्पण करतो. या समर्पणाच्या भावनेनंतर परब्रह्माच्या सगुण रूपाकडून निर्गुण रूपाकडे भक्त वळावा म्हणून पुढील श्लोक म्हटला जातो.

हेही वाचा: 'लालबाग राजा'च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर

अच्युतं केशवं रामनारायणं ।

कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिम् ।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ।

जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥

हे चौथे कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम् मधील हा पहिलाच श्लोक आहे. अच्युत म्हणजे आपल्या सच्चिदानंद स्वरूपापासून कधीही भ्रष्ट न होणारा परिपूर्ण परमात्मा ! त्याने विश्वाच्या कल्याणासाठी विष्णू, शिव , राम, कृष्ण वगैरे सगुण रूपे धारण केली. म्हणून या सगुण परमेश्वराला विष्णू, कृष्ण, राम या सगुण रूपात विविध नांवांनी विनम्रपणे साद घालून रक्षण करण्याची , कृपा करण्याची प्रार्थना केली आहे. ही सर्व एकाच परब्रह्माची विविध रूपे आहेत. हा सुंदर श्लोक सर्वतोमुखी आहे. शंकराचार्यांचा काळ म्हणजे ७-८ शतकामधील आहे. अच्युताष्टकम् स्तोत्रातील आठ श्लोकात नारायणाची नावे असून नववा श्लोक हा फलाविषयीचा आहे. या स्तोत्रात परमेश्वराने दु:खसागरातून आपणास बाहेर काढावे अशी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा: उमेदवाराने येथे नारळ फोडले कि विजयश्री मिळतेच असा 'खांदवे गणपती'

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

हे पाचवे कडवे कलिसन्तरण उपनिषदामधील आहे. म्हणजे ही रचना इसवी सन पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीची आहे. एकूण १०८ उपनिषदे आहेत. कलिसन्तरण हे कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे. ‘ घालीन लोटांगण ‘ या प्रार्थनेतील हा शेवटचा श्लोक आहे. प्रार्थनेचा समारोप करतांना सर्व देवदेवतांना विनम्र होऊन नमस्कार केला जातो. आपल्या भारत देशात त्याकाळी शैव-वैष्णवपंथी यांचे संघर्ष होत होते. बौद्ध, जैन, संप्रदाय आपापली मते लोकांसमोर अगदी ठामपणे सांगत होते. हिंदू धर्मावर संकट ओढवले होते. अशावेळी आपापसातील निरर्थक असणारा वाद शांत करणे आवश्यक होते. विष्णू, शिव, राम, कृष्ण ही सर्व दैवते एकाच परब्रह्माची सगुण रूपे आहेत, म्हणून कोणत्याही सगुण रूपाला शरण जा. त्याची भक्ती करा . ती भक्ती परब्रह्म परमात्म्यापर्यंतच पोहोचणार आहे. हा विचार समाजापर्यंत पोहोचावयाचा असल्याने ‘ हरे राम , हरे राम ‘ हे भजन करण्यात येऊ लागले.हे भजन खूप लोकप्रियही झाले. त्यामुळे या भजनामागचा मूळ हेतूही सफल झाला.

हेही वाचा: 'सुखकर्ता, दु:खहर्ता‘ आरती सर्वप्रथम का म्हटली जाते?

आरत्या म्हटल्यानंतर सश्रद्ध भक्त ‘ घालीन लोटांगण ‘ हे भजन म्हणत असतांना इतके तल्लीन होतात की समोर गणेशाची वा कोणत्याही दैवताची मूर्ती असली तरी त्या परब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. धूप- कापूर- अगरबत्तीचा सुगंध दरवळत असतो.. वातावरण मंगल व प्रसन्न झाल्यामुळे सर्वजण पवित्र आनंदाचा अनुभव घेत असतात. माणसे आपले दु:ख, चिंता, काळजी आणि आपापसातील मतभेद विसरून जातात. वातावरणात भक्ती, श्रद्धा यांचा महासागर दर्शन देत असतो. आनंद, उत्साह याच प्रसादाचा आस्वाद प्रत्येकजण घेत असतो.

loading image
go to top