
लेखिका: डॉ. निवेदिता पागे
Abdomen Pain : स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर ओटीपोटाकडील भागात होणाऱ्या तीव्र वेदना हे एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे आणि त्याबाबतीत अनेकदा गैरसमज होतात. ओटीपोटाकडील भागात सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ टिकणारी अस्वस्थता म्हणजे जगभरातील स्त्रियांसाठी एक मोठी समस्या आहे. तीव्र वेदना अचानक होतात आणि नाहीशा होतात. ओटीपोटात होणाऱ्या जुनाट वेदना दीर्घकाळ राहतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावर देखील परिणाम होतो.
ओटीपोटाकडील भागात रुजलेल्या ह्या तीव्र वेदना विविध स्त्रोतांमधून उद्भवू शकतात. गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन नलिका यांसारखे पुनरुत्पादक अवयव, मूत्राशय आणि आतडे, हे सगळे अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. स्त्रियांच्या जीवनातील चढ उतारादरम्यान ह्या वेदना सतत उद्भवू शकतात. त्यांचे अनुभव खूप बदलू शकतात. ह्या वेदना तीक्ष्ण वार झाल्यासारख्या किंवा मंद असतात. कधी ह्या वेदना पेटके किंवा सतत जळजळ होण्याच्या स्वरूपात होऊ शकतात. प्रत्येक स्त्रीचा प्रवास वेगळा असला तरी समान धाग्याने बांधलेला असतो.
ओटीपोटाकडील भागाच्या ह्या तीव्र वेदनांचा त्रास शरीरापलीकडे वाढतो. स्त्रीचे मानसिक आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीवर सुद्धा ह्या वेदनांचा परिणाम होतो. सततची अस्वस्थता अगदी साध्या गोष्टी करताना सुद्धा जाणवत राहते. नातेसंबंध, काम आणि वैयक्तिक क्रियाकलापांवर सुद्धा ह्याचा परिणाम होतो.
ह्या बदलाचा फक्त शरीरावर परिणाम होत नाही तर स्त्रीचे विचार, भावना आणि तिच्या अस्तित्वाचे सार ह्यावर सुद्धा ह्या वेदनांचा परिणाम होतो. अशा मुद्द्यांवर समाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळे भावनिक आरोग्यावर परिणाम होऊन एकटे राहण्याकडे कल वाढतो. येथेच वैद्यकीय हस्तक्षेप, मानसिक आरोग्य समर्थन आणि जीवनशैलीतील समायोजने ह्यांची गरज भासते. त्यामुळे उपचार होऊन आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग मिळतो.
स्त्रियांना होणाऱ्या ओटीपोटातील वेदनांमुळे शारीरिक अस्वस्थता तर येतेच पण त्यासोबत स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि त्यामुळे स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो.
मानसिक आरोग्यावर परिणाम
ओटीपोटाकडील भागात होणाऱ्या अखंड वेदनांचा त्रास हा फक्त शरीराला होत नाही तर अनेकदा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा सततचा साथीदार बनतो. सततच्या वेदनांमुळे निराशा, असहायता आणि अगदी नैराश्याची भावना येऊ शकते. वेदनांच्या त्रासातून सुटका न झाल्यामुळे निराशा उद्भवते, तर ह्या वेदनांवर प्रभावी उपचार शोधताना येणाऱ्या अडचणींमधून असाह्यतेची भावना निर्माण होते. जसजसा दिवस संपून रात्रीची अस्वस्थता वाढते तसतसे झोप नीट न झाल्यामुळे चिडचिड आणि चिंता वाढू शकते.
ओटीपोटाच्या तीव्र वेदनांशी लढा देणाऱ्या स्त्रिया समाजापासून दूर राहू लागतात, कारण त्यांनी आनंद घेतलेल्या क्रियाकलापांमध्ये भाग घेणे त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक होते. या स्थितीचा भावनिक परिणाम गंभीर असू शकतो, कारण स्त्रिया एकाचवेळी शारीरिक वेदना आणि त्यामुळे येणार भावनिक ताण या दोन्हींचा सामना करत असतात.
जीवनशैली बदलणे
ओटीपोटाकडील भागातील तीव्र वेदनांमुळे स्त्रीच्या जीवनशैलीमध्ये बदल होतात. दैनंदिन दिनचर्येदरम्यान वेदना होत असल्याने त्या व्यवस्थापित करण्याबाबत विचार सुरु असतात.. शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतण्याचा आनंद कमी होऊ शकतो कारण वेदना वाढण्याची भीती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आवश्यक असलेली विश्रांती आणि उपचार घेत असल्यामुळे ठरलेली कामे करताना आणि सामाजिक बांधिलकी जपताना दमछाक होऊ शकते.
जवळीक आणि नातेसंबंध जपताना सुद्धा त्रास होऊ लागतो कारण वेदनांमुळे शारीरिक जवळीक आणि भावनिक संबंधात अडथळा निर्माण होऊ लागतो. या बदलामुळे निराशा, गैरसमज आणि पुढील भावनिक ताण येऊ शकतो. याव्यतिरिक्त, वेदना कमी करण्याचा सतत प्रयत्न केल्याने डॉक्टरांच्या भेटी, उपचार आणि औषध व्यवस्थापनाचे चक्र सुरु होऊ शकते. आधीच व्यस्त असलेल्या जीवनात आणखी एक काम वाढते.
ओटीपोटात होणाऱ्या तीव्र वेदनांचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि जीवनशैली बदलते, सर्वसमावेशक उपाय शोधणे अत्यावश्यक बनते. वैद्यकीय हस्तक्षेप, मनोवैज्ञानिक समर्थन आणि जीवनशैलीशी जुळवून घेणारा एक समग्र दृष्टीकोन असल्यास तो चांगल्या आयुष्यासाठी मार्ग मोकळा करू शकतो.
वेदना व्यवस्थापन धोरणांमध्ये औषधोपचार, शारीरिक उपचार किंवा अगदी शल्यक्रिया पर्यायांचा समावेश असू शकतो, या सर्वांचा उद्देश वेदनांची तीव्रता कमी करणे आहे. माइंडफुलनेस तंत्र आणि समुपदेशन यांचा समावेश केल्याने महिलांना भावनिक त्रासाचे व्यवस्थापन आणि सामना करण्यासाठी यंत्रणा मिळू शकते.
आहारातील समायोजन आणि तणाव कमी करण्याच्या पद्धती इत्यादी जीवनशैलीतील बदलांमुळे वेदना व्यवस्थापित करण्यासाठी आणि नियंत्रणाची भावना पुनर्संचयित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
प्रगत वेदना व्यवस्थापन तंत्र
ज्या केसेस मध्ये पारंपारिक उपचार कमी पडतात, तिथे प्रगत वेदना व्यवस्थापन पर्याय वापरल्यास बरे वाटू शकते. हे उपचार, वेदना व्यवस्थापन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. विशिष्ट वेदना स्त्रोत ओळखून सततच्या अस्वस्थतेपासून सुटका होण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. येथे वेदना व्यवस्थापनासाठी काही पर्याय दिलेले आहेत
1. सुपीरियर हायपोगॅस्ट्रिक प्लेक्सस अॅब्लेशन: ही प्रक्रिया ओटीपोटाकडील भागातून उद्भवणाऱ्या वेदनांसाठी केली जाते. वेदना प्रसारित करण्यासाठी जबाबदार मज्जातंतू सिग्नलमध्ये व्यत्यय आणून, हे तंत्र एंडोमेट्रिओसिस-संबंधित वेदनांपासून आराम देते.
2. गॅन्ग्लिओन इम्पार अॅब्लेशन: पेरिअनल, योनी किंवा गुदद्वाराच्या भागातील स्थानिक वेदनांसाठी, गॅंग्लियन इम्पार अॅब्लेशन प्रभावी ठरू शकते. या पध्दतीमध्ये टेलबोनजवळील गॅंग्लियन इम्पार नर्व्ह क्लस्टरला अवरोधित केले जाते. त्यामुळे कोकिडायनिया सारख्या परिस्थितीपासून आराम मिळतो.
3. व्हल्वोडायनियासाठी बोटॉक्स इंजेक्शन्स: बोटॉक्स हे सामान्यतः कॉस्मेटिक हेतूंसाठी ओळखले जाते. व्हल्वोडायनियामध्ये देखील ते मदत करू शकते. ओटीपोटाच्या भागातील स्नायूंमध्ये बोटॉक्स इंजेक्शन देऊन, व्हल्व्हर स्नायू-संबंधित वेदना कमी करता येतात.
4. स्टिमोपॉड उपचार: श्रोणि किंवा जननेंद्रियाच्या क्षेत्रातील मज्जातंतू-संबंधित वेदना दूर करण्यासाठी डिझाइन केलेले, स्टिमोपॉड प्रभावित नसांना लक्ष्यित विद्युत उत्तेजन देते. हे विशेषतः पुडेंडल न्यूराल्जिया सारख्या परिस्थितीसाठी फायदेशीर आहे.
5. स्नायुदुखीसाठी कोरडी सुई/आयएमएस: इंट्रामस्क्युलर स्टिम्युलेशन (आयएमएस) किंवा कोरडी सुई स्नायूंमधील ताण सोडवून स्नायूंच्या वेदनांना लक्ष्य करते. हे तंत्र मायोफेसियल पेन सिंड्रोम सारख्या परिस्थितींमध्ये योगदान देणारे स्नायू वेदना कमी करू शकते.
ज्यांनी अधिक पारंपारिक उपचारांना चांगला प्रतिसाद दिला नाही अशा दीर्घकालीन वेदनांशी झुंज देणाऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रगत वेदना व्यवस्थापन पर्याय आशा निर्माण करतात. या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी आणि सर्वात योग्य दृष्टीकोन निश्चित करण्यासाठी वेदना व्यवस्थापन तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रक्रियेची उपयुक्तता मूळ स्थिती, वेदना वैशिष्ट्ये आणि व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असते.
जर तुम्हाला सतत ओटीपोटात वेदना होत असतील तर, उशीर न करता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. डॉक्टर ह्या वेदनांमागचे मूळ कारण शोधू शकतात आणि तुम्हाला आराम मिळण्यासाठी योग्य उपचार करू शकतात. दरम्यान, बरे वाटण्यासाठी तुम्ही घरी करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत (Lifestyle)
ओव्हर-द-काउंटर वेदना कमी करणारी औषधें: औषधांच्या दुकानात मिळणारी वेदनाशामक औषधे जसे कि आयबुप्रोफेन (ऍडव्हील, मॉर्टिन) किंवा अॅसिटामिनोफेन (टॉयलेनॉल) पासून सुरुवात केल्याने ओटीपोटाच्या तीव्र वेदनापासून आराम मिळू शकतो. शिफारस केलेला डोस घेतल्यास ज्या त्रासामुळे सतत अस्वस्थता वाटत राहतो तो त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
हालचाल करा: ओटीपोटाच्या दुखण्यातील आव्हाने असूनही, व्यायामाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. नियमित शारीरिक हालचाली रक्ताभिसरण वाढवतात आणि तुमच्या शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक एंडोर्फिन सोडण्यास प्रवृत्त होते. आठवड्यातील बहुतेक दिवसांमध्ये सुमारे 30 ते 45 मिनिटे वेगवान चालण्यासारख्या व्यायाम करणे खूप उपयुक्त ठरू शकते.
उष्णता: आपल्या वेदना व्यवस्थापित करण्यासाठी उबदारपणा हा एक मौल्यवान उपचार असू शकतो. गरम पाण्याने अंघोळ करणे किंवा गरम पॅड अथवा उबदार कॉम्प्रेस आपल्या ओटीपोटाला लावल्याने रक्त प्रवाह वाढतो आणि वेदनांपासून आराम मिळतो. (Health)
जीवनशैली: काही सवयींमध्ये बदल केल्याने देखील सकारात्मक परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही धूम्रपान करत असाल, तर ते सोडणे महत्वाचे आहे कारण निकोटीन मुळे वेदना वाढतात. जास्त वजन कमी केल्याने मज्जातंतूचा दाब कमी होतो. त्यानंतर वेदना कमी होतात. निरोगी जीवनशैली अंगीकारल्याने खूप बदल होऊ शकतात.
पूरक औषधे: कधीकधी, मुख्य जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकतात. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम सारख्या सप्लिमेंट्समुळे आराम मिळतो. ओव्हर-द-काउंटर सप्लिमेंट्सबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोंग क्वाई, लिकोरिस, इव्हनिंग प्राइमरोज ऑइल आणि विलो यासारख्या काही औषधी वनस्पतींमध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तसेच, आपल्या पथ्यांमध्ये औषधी वनस्पतींचा समावेश करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.
विश्रांती: आपल्या दिनचर्येमध्ये विश्रांती घेणे खूप फायदेशीर ठरू शकते. ध्यान, योग आणि खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम यासारख्या क्रियाकलापांमुळे तणाव कमी होतोयाव्यतिरिक्त, विश्रांती घेतल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यात सुद्धा मदत होऊ शकते.
जरी हे घरगुती उपाय चांगले असले तरीही वैयक्तिक वैद्यकीय मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात ठेवा. वैद्यकीय तज्ञांचे सहकार्य घेतल्यास ते तुम्हाला दीर्घकालीन ओटीपोटाच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी तसेच निरोगी आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.