मोठ्या लिपीत अडकली न्यायाधीशाची डिग्री....

Divyang Shruti finally got justice in sindudurg kokan marathi news
Divyang Shruti finally got justice in sindudurg kokan marathi news

सावंतवाडी (सिधुदुर्ग) : न्यायाधीश बनण्याच्या इच्छने दहावीत मोठ्या अक्षराच्या प्रश्‍नपत्रिकेसाठी झगडणाऱ्या श्रुती पाटील हिला अखेर न्यायालयानेच न्याय मिळवून दिला. तिच्या स्वप्नानीच आयुष्यातील एका कठीण परिस्थितीतुन बाहेर काढत तिच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास मार्ग मोकळा करून दिला आहे. येथील अंशतः अंध व सेरेब्रलपालसी असणाऱ्या श्रुतीसह अन्य दृष्टिहीन मुलांनाही आता दहावीच्या परीक्षेला मोठ्या अक्षराच्या प्रश्‍नपत्रिका मिळणार आहेत. "सकाळ'मधील बातमी वाचल्यानंतर वेंगुर्लेतील कायदेतज्ज्ञांनी श्रुतीच्या आई-वडिलांशी संपर्क साधून कायदेशीर सल्ला दिल्यावर श्रुतीच्या वतीने ऍड. प्रॉस्पर डिसोझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

यावर राज्य मंडळाला प्रस्ताव सादर केल्यास मोठ्या अक्षराच्या प्रश्‍नपत्रिका देण्याची हमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे न्यायालयात देण्यात आली. श्रुतीच्या आई-वडिलांनी याचे श्रेय न्यायव्यवस्थेबरोबरच "सकाळ'च्या वृत्तालाही दिले आहे. शासन निर्णय असतानाही दिव्यांग असलेल्या श्रुतीला शासनाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या अक्षराच्या प्रश्‍नपत्रिका देण्यास टाळाटाळ केली होती. अखेर श्रुतीच्या आईवडिलांनी दैनिक सकाळ समोर आपली कैफियत मांडल्यानंतर "दिव्यांग मुलीचा परीक्षेसाठी यंत्रणेशी झगडा' अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले.

दिव्यांग श्रुतीला अखेर मिळाला न्याय

श्रुतीचे न्यायाधीश बनण्याच स्वप्न आहे. यासाठीच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी वेंगुर्ले येथील न्यायालय पाहण्यासाठी गेलेल्या श्रुतीची ओळख वेंगुर्ले न्यायाधीश विनायक पाटील व उपस्थित सर्व वकीलांशी चर्चा झाली होती. यावेळी सर्वांनी तिला दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 
त्यानंतर 11 ला दैनिक सकाळमधील "दिव्यांग मुलीचा परीक्षेसाठी यंत्रणेशी झगडा' या मथळ्याखाली आलेली बातमी यातील काही कायदेतज्ञांच्या वाचनात आली. त्यांनी श्रुतीच्या पालकांना सर्व कागदपत्रांसहीत भेटण्यास सांगितले.

प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांनी श्रुतीची समस्या जाणून तिला न्याय मिळण्यासाठी कायदेशीर सल्ला दिला. विधी सेवा समिती वेंगुर्ले व विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांची माहिती दिली व त्यांनी स्वतः विधी सेवा समिती वेंगुर्ला व विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याशी चर्चा करून उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत याचिका दाखल करण्याविषयीचा कायदेशीर सल्ला दिला. ही याचिका विनामूल्य तसेच दहावीची परीक्षा जवळ आल्याने त्वरित निर्णय मिळेल, असे यावेळी आवर्जून सांगितले.

न्यायाधीश बनण्याच तिचे स्वप्न होणार पूर्ण

त्यामुळेच श्रुतीच्या पालकांनी उच्च न्यायालय मुंबई येथे 18 ला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्यामार्फत याचिका दाखल केली. याकामी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबईचे सेक्रेटरी तथा न्यायाधीश शिवाजी साळुंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. यासाठी त्यांनी ऍड. प्रॉस्पर डिसोजा या उच्च न्यायालयातील वकीलांची नेमणूक केली. 

मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका ​

न्यायालयाने तात्काळ सुनावणी ठेऊन निर्णय दिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर अंशतः दृष्टिहीन असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रश्‍न अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याच्या मुद्‌द्‌यावर आपल्या पुर्वीच्या भूमिकेबाबत माघार घेतली. यापुढील परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाला प्रस्ताव सादर केल्यास त्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्यात येतील, अशी हमी शिक्षण मंडळाने यावेळी न्यायालयात दिली. त्यामुळे अंशता दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व श्रुती पाटील हिच्या सोबत सर्वच अंशतः अंध अंदाजे 5 हजार दिव्यांग विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. 

हेही वाचा-  धक्कादायक : रत्नागिरीत सातशे रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या..

परिश्रमाचे चीज 
श्रुतीच्या आईवडिलांनी श्रुतीला दहावीच्या परीक्षेला मोठ्या अक्षराच्या प्रश्‍नपत्रिका मिळाव्यात, यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, शिक्षण मंडळ यांच्याकडे प्रत्यक्ष भेट पत्रव्यवहार याद्वारे पाठपुरावा केला होता. यामध्ये श्रुतीच्या पालकांचा, वेंगुर्ले हायस्कूल, साहस प्रतिष्ठान यांच्याद्वारेही पत्रव्यवहार करण्यात आला होता. यासर्व कष्टाचे चीज झाले असल्याची प्रतिक्रिया श्रुतीचे आई-वडिलांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली. त्यांनी श्रुतीच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इतर माध्यमांसह दैनिक सकाळचे ही आवर्जून आभार मानले आहेत. 

उपोषण मागे 
पुढील महिन्यातील 3 मार्च 2020 पासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी श्रुती पाटील या विध्यार्थींनीला सर्व विषयांच्या प्रश्‍नपत्रिका मोठ्या अक्षरात उपलब्ध होणार असल्यामुळेच श्रुतीची आई तथा साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांनी आज छेडण्यात येणारे कोकण बोर्ड रत्नागिरी समोरील बेमुदत उपोषण मागे घेतलेले आहे. तसे पत्र त्यांनी बोर्डास पाठवले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com