जय हो! १९ जानेवारी आणि टीम इंडियाचं विजय हा फॉर्मुला फिक्स

Team_India
Team_India

INDvsAUS : नवी दिल्ली : टीम इंडियाने १९ जानेवारी २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आणि याची जगभरात सगळीकडं चर्चा झाली. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सने हरवत २-१ने मालिका खिशात घातली. आणि पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. 

१९ जानेवारी हा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात खूप खास राहिला आहे. विशेष म्हणजे या दिवशी टीम इंडियानेच सगळे सामने जिंकले आहेत. अशाच सामन्यांविषयी आपण जाणून घेऊया. 

१९ जानेवारी २०२१ 
टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत सामन्याच्या शेवटच्या दिवशी (मंगळवार, १९ जानेवारी २०२१) ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये झालेला कसोटी सामना ३ गडी राखून जिंकला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून ३६९ धावा केल्या आणि त्यानंतर भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर आटोपला. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर रोखला आणि टीम इंडियाला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले.

भारताने हे लक्ष्य शुभमन गिल (९१), विकेटकीपर ऋषभ पंत (नाबाद ८९) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या चिवट खेळीच्या जोरावर पूर्ण करत ब्रिस्बेनमध्ये तिरंगा फडकवला. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाच्या पेसर पॅट कमिन्सने ४ गडी बाद केले. मात्र त्याला त्याच्या टीमला विजय मिळवून देता आला नाही. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकली.

१९ जानेवारी २०२०
गेल्या वर्षी याच दिवशी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने बंगळुरूमधील तिसर्‍या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला ७ विकेट्सने पराभूत केले आणि ३ सामन्यांची मालिका २-१ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सच्या बदल्यात २८६ धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्माच्या (११९) आणि विराट कोहली (८९)च्या दमदार खेळीमुळे भारताने ४७.३ षटकांत ३ विकेट गमावत हे लक्ष्य गाठले. 

१९ जानेवारी २००८
याच दिवशी २००८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवले होते. त्यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व अनिल कुंबळे करत होते आणि मालिकेतील तो तिसरा कसोटी सामना होता. याचवेळी हरभजन सिंगला मंकीगेट प्रकरणामुळे प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. १९ जानेवारी रोजी संपलेल्या या कसोटी सामन्यात भारताने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियावर ७२ धावांनी विजय मिळवला होता.

पहिल्या डावात भारताने ३३० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २१२ धावांवर रोखले. त्यानंतर भारताने दुसर्‍या डावात २९४ धावा करत यजमानांसमोर ४१३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ ३४० धावांवर गारद झाला. त्या मालिकेत हा भारताचा एकमेव विजय होता. सामनावीर इरफान पठाणने एकूण ५ गडी बाद केले आणि भारताच्या दुसर्‍या डावात ४६ धावा ठोकल्या होत्या.

- क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com