INDvsNZ : आता व्हाइटवॉशची नामुष्की टाळा!

Team-India-NZ.
Team-India-NZ.

तौरंगा : एक दिवसीय मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-0 विजयी आघाडी घेतलेली असली तरी तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावणार असल्याचे कानावर आले. तसे करावेच लागणार आहे. कारण टी-20 मालिकेत किवींना व्हाइट वॉश दिल्यावर अत्यंत आत्मविश्वासाने भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी उतरला होता. मात्र, आता तीन सामन्यांच्या मालिकेत भारतावरच व्हाइट वॉशची नामुष्की आली आहे. 

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात केदार जाधवला संघात जागा मिळाली नाही तर मोठा अन्याय ठरणार आहे. केदार जाधवने पहिल्या सामन्यात जी माफक संधी मिळाली त्यात ठसा उमटवणारी फलंदाजी केली तसेच विराटने केदारला गोलंदाजी करण्याची संधी दिलेली नाही. रिषभ पंतही गेले सात सामने संघात असून एकही सामना खेळलेला नाही. त्यालाही शेवटच्या सामन्यात संधी मिळते का हे बघावे लागेल.

भारतीय संघ व्यवस्थापन तौरंगा सामन्यात जोरदार खेळ करून दाखवण्याकरता योजना आखत आहे तर दुखपतीतून सावरलेला किवी कर्णधार केन विल्यम्सन तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाल्याने न्यूझीलंडचा संघ आणखी खुशीत आहे. ''आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना आमच्यासाठी प्रत्येकच सामना महत्वाचा असतो. भारतीय संघाने दोन सामन्यांसह मालिका गमावली असली तरी आम्ही तौरंगाचा सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहोत. दोन्ही सामने एकदम अटीतटीचे झाले. आम्हाला दोन्ही सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही आणि म्हणूनच आमचा पराभव झाला. तिसर्‍या सामन्यात त्याच चुका सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने सांगितले.

संघात केलेले बदल पथ्यावर पडल्याचे या मालिकेचा कर्णधार टॉम लॅथमने सांगितले. तो म्हणाला, ''आम्ही टी20मध्ये पाचही सामने गमाविल्यावर एकदिवसीय मालिकेमध्ये सलग दोन सामने जिंकल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पूर्ण फॉर्मात असलेल्या कोहलीच्या भारतीय संघावर बाजी उलटवण्याचा पराक्रम केल्याने गेल्या काही महिन्यात पराभवाचे धक्के सोसलेल्या आमच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. एकदिवसीय संघात आम्ही बरेच बदल केले आहेत. नव्या दमाचे खेळाडू संघात आल्याने संघाला फायदा झाला आहे.'' तसेच ''आमचा संघ जिंकला तर माजत नाही आणि पराभूत झाला तरी मनातून खचत नाही,'' असे टीम साउदी म्हणाला. 

सामन्यांना प्रतिसाद नाहीच

पाच टी-20 आणि पहिले दोन एकदिवसीय सामन्यात एक गोष्ट चांगलीच खटकली, ती म्हणजे प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांनी एकदम थंड प्रतिसाद दिला आहे. हॅमिल्टनच्या एकदिवसीय सामन्याला फक्त साडे तीन हजार प्रेक्षक हजर होते. ऑकलंडच्या एकदिवसीय सामन्याला प्रेक्षागृह 50% रिकामे होते.

न्यूझीलंड बोर्डाने तिकिटांचे दर जास्त ठेवून पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तिसरा सामना कामाच्या दिवशी दुपारी 3 वाजता रणरणत्या उन्हात चालू होणार असल्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद अजून कमी होणार का याची भीती संयोजकांना वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com