संजीताचा अर्जुन पुरस्काराने गौरव? उत्तेजक सेवनाच्या आरोपातूनही मु्क्तता

sanjita
sanjita

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने संजीता चानू हिला उत्तेजक वापराच्या आरोपातून मुक्त केले. तिचा नमुना योग्य प्रकारे हाताळण्यात आला नसल्याची कबुली देत आरोप मागे घेण्यात आले. मात्र आता संजीताने नुकसानभरपाईची मागणी केली असून महासंघाने आपली माफीही मागावी, अशीही मागणी केली आहे. या प्रकारानंतर वेटलिफ्टर संजीता चानूचा अर्जुन पुरस्काराने गौरव होण्याची शक्‍यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हा निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

संजीताला 2017 मध्ये अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला. त्याविरोधात तिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. याबाबतची सुनावणी सुरू असताना संजीतावर बंदी आली होती. न्यायालयाने 2018 च्या ऑगस्टमध्ये याबाबतचा आदेश देताना पुरस्कार समितीस संजीताला अर्जुन पुरस्कार देण्याबाबत विचार करण्याची सूचना केली होती. तसेच निर्णय बंद पाकिटात ठेवण्यास सांगितले होते. उत्तेजक आरोपातून मुक्तता झाल्यानंतर तो निर्णय जाहीर करण्यास सांगितले होते.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने संजीताच्या अर्जुन पुरस्काराबाबतचा बंद पाकिटात असलेला निर्णय जाहीर करण्याची विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयास केली आहे. तिला 2017 साठीचा अर्जुन पुरस्कार देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. संजीताबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे क्रीडा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा ः मान्सूनच्या आगमनाने मुंबईकर सुखावले! शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची एन्ट्री

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या शिफारसीनुसार आंतरराष्ट्रीय महासंघाने संजीताविरुद्धचे आरोप मागे घेतले आहेत. आपण निर्दोष आहोत, असे सुरुवातीपासून सांगणाऱ्या संजीताला निर्णय जागतिक महासंघाने कळवला आहे. खेळाडूच्या बाजूनेच कायम जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था असते. त्यांचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय झाला आहे, असे पत्रात म्हटले आहे. संजीताचा नमुना तपासलेल्या प्रयोगशाळेची मान्यता रद्द केल्याचे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने गेल्याच महिन्यात जाहीर केले होते. त्याच वेळी संजीतावरील बंदी रद्द होणार असल्याचे संकेत मिळाले होते. यापूर्वीच तिच्यावरील बंदी तात्पुरती उठवण्यात आली होती.

अखेर माझे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे, याचा मला नक्कीच आनंद आहे; पण त्यामुळे जो काही मानसिक त्रास झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा तिने केली. या चाचणीची प्रक्रिया पूर्ण करताना प्रत्येक टप्प्यावर चूक झाली, त्यास जबाबदार कोण? अंतिम निर्णय देताना खेळाडूस बडतर्फीस सामोरे जावे लागते आणि अचानक एक दिवस त्या खेळाडूला आरोपातून मुक्त केल्याचे कळवण्यात येते, अशी खंत तिने व्यक्त केली. खेळाडूंना स्वप्नापासून रोखण्याचे महासंघाचे काम नसावे. त्यांनी माझी माफी मागायला हवी. मला पटेल असे स्पष्टीकरण द्यायला हवे. यासाठी दोषी असलेल्या संघटनेस अथवा व्यक्तीला शिक्षा द्यायला हवी. आता मी महासंघाकडून नुकसानभरपाईची मागणी करणार आहे, असे तिने सांगितले.

टोकियो ऑलिंपिक पात्रतेची संधीच हुकवली
उत्तेजक चाचणीत दोषी ठरवल्यामुळे संजीताला ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपासून वंचित राहावे लागले. ""खेळाडू सुरुवातीस दोषी आणि काही महिन्यांनी निर्दोष, हा काय जोक आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघास खेळाडूंची कसलीही काळजी नाही. माझे ऑलिंपिक स्वप्न संपवण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते का? ऑलिंपिक पदक जिंकणे हे प्रत्येक क्रीडापटूचे स्वप्न असते. किमान ऑलिंपिक सहभाग हे किमान उद्दिष्ट असते; पण माझी ही संधीच आंतरराष्ट्रीय महासंघाने हुकवली," अशी निराशा संजीताने व्यक्त केली.

प्रकरण काय होते?

  • 2017 च्या जागतिक स्पर्धेच्या वेळी संजीता चानू दोषी असल्याचा आरोप
  • नोव्हेंबरमध्ये झालेल्या चाचणीचा निकाल डिसेंबरच्या अखेरीस जाहीर
  • ब नमुना दोषी, पण त्याच वेळी चानूचे निर्णयास आव्हान
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सहभाग मंजुरी, 2018 च्या स्पर्धेत सुवर्णपदक
  • एकाच नमुन्याला दोन क्रमांक दिल्याने गोंधळ लक्षात
  • आंतरराष्ट्रीय महासंघासमोरील डिसेंबर 2018 मध्ये सुनावणीनंतर बंदी
  • तात्पुरती स्धगित करण्याचा जानेवारी 2019 मध्ये निर्णय
  •  बंदी स्थगित करणे आणि कायम करणे सुरूच, ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपासून दूर
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com