सोलापूरच्या तरुणांची "जवानी' होणार का "झिंदाबाद'? 

सोलापूरच्या तरुणांची "जवानी' होणार का "झिंदाबाद'? 

सोलापूर : येथील स्ट्रगलर "थ्री आर्टिस्टां'ची मदार त्यांच्या "जवानी झिंदाबाद'वर आहे. त्यांची "जवानी' "झिंदाबाद' होण्यासाठी सोलापूरसह राज्यातील प्रेक्षक "जवानी झिंदाबाद'ला डोक्‍यावर घेतील, अशी आशा या "थ्री आर्टिस्ट'ना लागून राहिली आहे. 

सोलापूरच्या गीत व पार्श्‍व संगीतकारांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारा "जवानी झिंदाबाद' हा मराठी चित्रपट उद्या (शुक्रवारी) महाराष्ट्र राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या "जवानी झिंदाबाद' या चित्रपटातील "मौसम उधाणलेला, ऑसम बहारलेला, हर पल महकतीसी बेधुंद ही नशा' हे शीर्षक गीत सोलापूरच्या केदार कोतकुंडे या तरुणाने लिहिले असून, गायक जसराज जोशी व दीपांशी नागर यांनी हे गीत गायिले आहे. चित्रपटातील गीतांना सोलापूरच्याच साहिल कुलकर्णी याचे पार्श्‍वसंगीत लाभले आहे. तर सोलापूरच्या विशाल सदाफुले याचे पार्श्‍वसंगीत संयोजन आहे. या चित्रपटातील गाणी सध्या विविध वाहिन्यांवर गाजत आहेत. 

"जवानी झिंदाबाद'चे लेखक- दिग्दर्शक शिव कदम असून नितीन साठे निर्माते आहेत. यात अभिषेक साठे, केतकी कुलकर्णी, यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर तसेच मानसी नाईक यांच्या भूमिका असून, सुंदर नृत्य व सोलापूरच्या गीत-संगीतकारांमुळे बहरलेल्या गीतांमुळे सोलापूरकरसह राज्यभरातील प्रेक्षकांची या चित्रपटाला पसंती मिळेल, अशी अपेक्षा साहिल, केदार व विशाल यांनी व्यक्त केली. 

असा केला या "थ्री आर्टिस्ट'नी संघर्ष 
साहिल नऊ वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास आहे. तेथे गाणे म्हणणे व गिटारवादनाचे शो केले. निर्माता व लेखक शिवदर्शन कदम यांच्याशी ओळख झाली अन्‌ त्यांनी त्याला 2013 मध्ये "कॅफे चिनो' या मराठी चित्रपटात गाणे कंपोज करणे व गाण्याची पहिली संधी दिली. 2017 मध्ये "टीटीएमएम' चित्रपटात "साजिरी गोजिरी' हे गाणं त्यानं म्हटलं. गिटारवादन करत असताना साहिलची ओळख केदारशी झाली. 

विशाल हा सोलापुरातील लष्कर परिसरातील. यानेही पुणे येथे साउंड इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. पुणे येथेच स्ट्रगल करत असताना साहिल व केदारशी त्याची ओळख झाली. एका गाण्यासाठी संगीत संयोजकाची गरज होती, ती विशालमुळे पूर्ण झाली. त्यानंतर विशालला "जवानी झिंदाबाद'च्या पार्श्‍वसंगीत संयोजनाची संधी मिळाली. ती त्याने उत्कृष्टपणे पार पडली. याआधी सोलापूरच्या "महासूर्या' चित्रपटालाही विशालने पार्श्‍वसंगीत दिलं होतं. 

केदारला गिटार वाजवण्याचा छंद होता. त्याने मित्रांबरोबर पुणे येथे 350च्या वर गिटारवादनाचे शो केले. तसेच पुणे येथे साउंड डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्याला चित्रकलेचीही आवड आहे. प्राथमिक शिक्षण घेताना त्याची चित्रे सोलापूर "सकाळ'च्या "बालमित्र'मध्येही प्रसिद्ध झाली आहेत. 

माझ्या करिअरसाठी खूप मोठी गोष्ट 
लहानपणापासून कविता करायची आवड होती. माझ्या गीताचा हा पहिलाच चित्रपट आहे. जसराज जोशी यांच्यासारख्या मोठ्या गायकाने हे गीत गायल्याने ही माझ्या करिअरसाठी खूप मोठी गोष्ट आहे. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये साहिल कुलकर्णीच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. आणखी तीन चित्रपटांसाठी गीते लिहून दिली आहेत. तीन मराठी चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. तसेच "एक बॉल 12 रन' या आगामी चित्रपटासाठी संवाद लिहीत आहे. 
केदार कोतकुंडे, गीतकार, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com