
खरं पुस्तक, खोटं पुस्तक... कसं ओळखाल ?
मुंबई : एका बाजूला दरवर्षी साहित्य संमेलन भरवून दर्जेदार साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिले जाते तर दुसऱ्या बाजूला त्याच लेखक-प्रकाशकांचे व्यावसायिक नुकसान करणारी बनावट पुस्तके मुंबई-पुण्यातील पदपथांवर बिनदिक्कतपणे विकली जातात. बनावट पुस्तकांच्या बाजारावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्त्वात नसल्याने आता वाचकांनीच अशा पुस्तकांवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे; मात्र बनावट पुस्तके ओळखावीत कशी, असा प्रश्न वाचकांपुढे आहे.
हेही वाचा: व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचा पुस्तके! व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचा पुस्तके!
कोणतेही पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याच्या मूळ प्रतीची नक्कल प्रत तयार करून ती विकली जाते. बनावट पुस्तकांसाठी वापरला जाणारा कागद पिवळसर आणि हलक्या दर्जाचा असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचे वजन कमी असते. अशी पुस्तके प्लास्टिकबंद स्थितीत विकली जात असल्याने त्यांची अंतर्गत स्थिती वाचकांना खरेदीवेळी समजू शकत नाही.
हेही वाचा: प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी
बनावट पुस्तकांची बांधणी कमकुवत असते. त्यामुळे पाने लवकर निखळतात. काही पाने कोरी असतात. छपाई चांगल्या दर्जाची नसते. ही पुस्तके तयार करणाऱ्याला लेखक आणि प्रकाशकांना मानधन द्यावे लागत नाही. त्यामुळे निर्मिती खर्च कमी असतो. परिणामी, ही पुस्तके स्वस्त दरात विकणे सहज शक्य होते.
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर, पुण्यातील संभाजी पूल, इत्यादी ठिकाणी पुस्तकांच्या बनावट प्रती मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. स्वस्त किंमतींमुळे वाचकांचा चांगला प्रतिसाद या पुस्तकांना मिळतो. व. पु. काळे, सुधा मूर्ती यांची पुस्तके तसेच श्रीमानयोगी, ययाति, इत्यादी गाजलेल्या पुस्तकांच्या बनावट प्रती मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध आहेत.
हेही वाचा: वाचाल तर वाचाल; लॉकडाउननंतर पुस्तक विक्री येतेय पूर्वपदावर!
बनावट पुस्तके का खरेदी करू नयेत ?
एखादे पुस्तक बाजारात येते तेव्हा त्यामागे लेखक, प्रकाशक, मुद्रीतशोधक, संपादक, इत्यादी अनेक घटकांची मेहनत असते. पुस्तकांची विक्री झाल्यावर लेखकांना स्वामित्वधन (royalty) मिळते. तसेच इतर घटकांनाही त्याचा मोबदला मिळतो. चांगला वाचक बनावट पुस्तकांकडे वळल्यास पुस्तकांच्या अस्सल प्रतींचा ग्राहक कमी होतो. परिणामी लेखकांसह संपूर्ण प्रकाशन व्यवसायाचे नुकसान होते. सरकारला GSTही मिळत नाही. त्यामुळे अशा पुस्तकांवर वाचकांनीच वचक ठेवण्याची गरज 'अखिल भारतीय प्रकाशक संघा'च्या कार्यकारिणी सदस्य शशिकला उपाध्ये यांनी व्यक्त केली. 'ग्रंथाली'चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात या प्रश्नावर आवाज उठवला होता.
हेही वाचा: 'पुस्तकांच्या गावाचा' प्रस्ताव अंतिम टप्प्यात
स्वामित्वहक्काबाबत जागरुकता नाही
केवळ बनावट पुस्तकेच नव्हेत तर पुस्तकांच्या पीडीएफ प्रती तयार करून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हाही गुन्हाच आहे. या दोन्ही गैरप्रथांविरोधात अनेकदा प्रकाशक तक्रारी करत असतात; मात्र त्यावर नियंत्रण ठेवणारी विशिष्ट यंत्रणा अस्तित्त्वात नाही. त्यामुळे त्यांचा स्रोत कळू शकलेला नाही. तसेच पोलिसही स्वामित्वहक्क कायद्याबाबत (copyright act) जागरूक नाहीत, अशी खंत 'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे अनिल मेहता यांनी व्यक्त केली. एखादा लेखक वारल्यानंतर ६० वर्षांनी त्याची पुस्तके कोणीही प्रकाशित करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: How To Indentify Fake Books Why Should We Purchase Only Original Books
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..