पंढरपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान करणार

अभय जोशी
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुट्टपर्थी येथे आपण स्वतः तीन दिवस राहून सेवा केली आहे. तिथे किती भक्तीभावाने लोक सेवा करतात हे आपण पाहिलेले आहे. त्याधर्तीवर पंढरपूर येथे राहून सेवा करण्यास हजारो लोक तयार आहेत. या लोकांकडून कशापध्दतीने व कोणती सेवाकामे करुन घेता येतील. सेवेसाठी आलेल्या लोकांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था कशी व कुठे करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

पंढरपूरः देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून पंढरपूरकडे पाहिले जावे, या दृष्टीकोनातून काम करणार असून पंढरपूर शहराच्या विकासासाठी सीएसआर मधून निधी मिळावा यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. दोन हजार भाविक राहू शकतील अशा भक्त निवासचे आणि उड्डाणपूलाचे उर्वरीत काम येत्या कार्तिकी यात्रेपूर्वी पूर्ण केले जाईल, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या नूतन सदस्यांची पहिली बैठक समितीचे नूतन अध्यक्ष डॉ.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) दुपारी येथील संत तुकाराम भवन मध्ये झाली. या बैठकीनंतर डॉ.भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मंदिर समितीच्या माध्यमातून सुमारे 57 कोटी रुपये खर्च करुन नवीन भक्त निवास बांधले जात आहे. त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये आता पर्यंत खर्च झाले आहेत. उर्वरीत काम वेगाने पूर्ण केले जाईल. उड्डाणपूलाचे उर्वरीत काम देखील पूर्ण करण्यात येऊन दोन्हीचा वापर येत्या कार्तिकी यात्रेमध्ये व्हावा यादृष्टीने आजच्या बैठकीत सूचना दिल्या आहेत.

भाविकांनी दिलेल्या देणगीचा विनियोग योग्य कामासाठी व्हावा आणि सर्व कामे पारदर्शकपध्दतीने व्हावीत अशा स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना कोणीही आपल्याकडे बोट दाखवू शकणार नाही अशा पध्दतीचा स्वच्छ आणि आदर्श कारभार समिती सदस्यांकडून झाला पाहिजे. त्यादृष्टीने सर्वांना शपथ घेण्याचे आवाहन बैठकीत केले असल्याचे श्री.भोसले यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

मंदिरातील कर्मचाऱ्यांना यशदा मध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. कोणत्याही कर्मचाऱ्याकडून चूकीची वागणूक झाली तर त्याची गय केली जाणार नाही. पंढरपूरला येणाऱ्या भाविक भक्ताची सेवा करणे म्हणजेच श्री विठ्ठलाची सेवा करणे आहे. जो पर्यंत कर्मचाऱ्यांना भाविकांमध्ये विठ्ठल दिसत नाही तो पर्यंत विठ्ठलाची सेवा होऊ शकत नाही असे मी मानतो, असे श्री.भोसले म्हणाले.

संतपीठ आमच्यचा काळात पूर्ण झाले पाहिजे असा चंग बांधून आपण पदभार स्विकारला आहे. पंढरपूरला लाखो भाविक येतात त्यांच्यासाठी मंदिर समितीचे सुसज्ज हॉस्पिटल असणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी जागा तसेच सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्‍टरांची गरज लागणार आहे. तिरुपती, शिर्डी , शेगाव या संस्थानांच्या ठिकाणी असलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले जाईल. त्यासाठी आपण स्वखर्चाने सर्व सदस्यांना तिरुपती येथील विश्‍वस्तांशी चर्चा करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे श्री.भोसले यांनी नमूद केले.

आजच्या बैठकीस नगराध्यक्षा साधना भोसले, गहिनीनीथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज , संभाजी शिंदे, सचिन अधटराव, शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेश कदम , प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख, व्यवस्थापक विलास महाजन आदी उपस्थित होते.

सीएसआर साठी प्रयत्न करणार
मंदिर समितीला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते परंतु पंढरपूर शहराच्या विकासासाठी समिती कोणतेही योगदान देत नाही या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ.भोसले म्हणाले पंढरपूरचा विकास करणे हे समितीचे कर्तव्य आहे. काही गोष्टी समितीच्या अखत्यारीत येत नसल्यातरी असंख्य भक्त शहराच्या विकासासाठी, शहर स्वच्छतेच्या कामासाठी हातभार लावू शकतात. नमामि चंद्रभागा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यासाठीही मदत मिळू शकते. सीएसआरच्या माध्यमातून पंढरपूरसाठी पैसे मिळू शकतील परंतु त्यासाठी आपण त्यांच्या पर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: pandharpur news Pandharpur is the first place in the country